Join us  

डिजिटल फॅशनचं ‘लगाव फिल्टर’ जग, मोबाइलवरुन त्या जगात हरवून जाण्यापूर्वी हे वाचा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 2:55 PM

बीएफएफ म्हणजेच बेस्ट फ्रेंड फॉरेव्हर असा  हिट ट्रेंड असतोच.मग तसे शर्ट्स, गॉगल्स ग्रुप्स आणि बेस्ट फ्रेंड जोड्यांमध्ये हिट होतात.ते ऑनलाइन ऑर्डर करणं, सगळे फोटो, सेल्फी काढून, फिल्टर्स लावून भारी वाटलं, पण पुढे काय?

ठळक मुद्देडिजिटल मॉडेल होणं भारी आहे, पण सोपं नाही.

प्राची पाठक

एखाद्या आर्टिस्टचं एखादं कप साँग येतं. ते जाम हिट होतं. खरं तर त्या व्यक्तीनं नवीन काहीतरी शोधून ते लोकांपर्यंत पोहोचविलेलं असतं. त्यामुळेच त्या कलाकाराला आयडेंटिटी मिळते आणि ती व्यक्ती प्रसिद्ध होते. करिअर बनतं. नवीन कामं, प्रोजेक्ट्स त्यांना मिळायला लागतात, पण बाकीच्यांचं काय?आपल्याला फक्त बसल्या जागी फोटो-शोटो काढायला एक मजा मिळते. आपण लगेच आपले ग्रुप्स बनवून व्हर्च्युअली काहीतरी क्लिकक्लिकाट करून आपल्या ग्रुपचेही असेच शूट करून ठेवतो. आपली धाव कुठपर्यंत? तर घोळक्याने किंवा एकेकटे असे लै भारी फोटो-व्हिडीओ काढेपर्यंत! आपण लै भारी, आपला ग्रुप लै भारी, हे फक्त इतरांना सांगेपर्यंतच हे सगळं..

त्यात भर वेगवेगळ्या डिजिटलफॅशन आणि मेकअप ॲप्सची. मोबाइल कॅमेऱ्यातल्या फिल्टर्सची. डिजिटलफॅशनमध्ये थोडीच आपल्याला करिअर करायचं आहे? करिअर करायचं असेल, तर तो एक भरपूर अभ्यास असलेला सखोल विषय आहे. आपल्याला केवळ याने काय फॅशनचा फोटो उपलोड केला आणि त्याने काय भारी पोझ दिली, अमक्याचा स्पॉट किती भारी, इतक्याच गोष्टी घरात लोळत करायच्या आहेत. वेगवेगळे ड्रेसेस डिजिटली स्वतःला लावून घ्यायचे आहेत. म्हणजे आपण फक्त आपला एक फोटो फोनमध्ये ठेवायचा. त्यावर वेगवेगळे व्हर्च्युअल विग्स, केसांच्या स्टाईल, क्राउन, शिल्ड, ड्रेसेस, लोकेशन्स, आपल्या आजूबाजूला पेट्स वगैरे, भारीतल्या कार, बाइक सगळं व्हर्च्युअली स्वतःवर अप्लाय करून घ्यायचं आहे! सगळ्या ॲक्सेसरीज खोट्या. केवळ फोनमध्ये वेगवेगळ्या ॲप्समधून, फोटो फिल्टर्समधून स्वतःला लावून घेतलेल्या. कोणाला वाटेल तुमच्याकडे खरंच असे ड्रेसेस आहेत. तसे पाळीव प्राणी तुम्ही हातात घेतले आहेत वगैरे.तर तसंही नाही. आपली मजा, टाइमपास इतकाच.कोणाला दाखवायचं असतं आपल्याला हे खोटं जग?

काही जण त्याहून आणखीन एक पाऊल पुढे असतात. ते अशा डिजिटल फॅशन्सचे कपडे, ॲक्सेसरीज वेगवेगळ्या साइटवर शोधतात आणि तिथे ऑर्डर्स करायचा सपाटा लावतात. म्हणजे, खरेदीच्या क्रेव्हमध्ये अडकतात. बीएफएफ म्हणजेच ‘बेस्ट फ्रेंड फॉरेव्हर’ असा सर्वकाळ हिट ट्रेंड असतोच. मग तसे शर्ट्स, गॉगल्स सगळ्या ग्रुप्समध्ये, बेस्ट फ्रेंड जोड्यांमध्ये हिट होतात.पण या ऑर्डर्स करून, सगळे फोटो, सेल्फीज् काढून, सगळे फिल्टर्स स्वतःवर अप्लाय करून, दुसऱ्यांना आपण किती भारी आहोत, हे दाखवून झालं की पुढे काय?पुढे हेच, आणखीन नवीन ॲप्स, साइट्स, फिल्टर्स, फॅशन ट्रेंड्स शोधणं. घरात लोळत पडत नवीन खेळणं शोधत सगळ्यांची वाह वा मिळवायची धडपड. कलर चेंजिंगवाले कपडे खरेदी. तसे पाऊच आणि आउटफिट्स. ट्रेंडी घड्याळं, डायऱ्या, गॉगल्स, स्कार्फ, टोप्या असं बरंच काही खरंखोटं एकीकडे. त्याने आपण डिजिटल सेलिब्रिटी, डिजिटल मॉडेल झाल्याचा फील येत असावा. दुसरीकडे, सेल्फीज्, वेगवेगळ्या डिजिटल क्विझ स्वतःबद्दल बनवून घेणं, मून वॉक करणारे व्हिडीओज् अपलोड करणं, ‘टटिंग’ करणाऱ्या काही बोटांच्या-हातांच्या स्टेप्स अपलोड करणं. अशा टटिंग स्टेप्स म्हणजे आपल्या बेस्ट फ्रेंडसोबत किंवा आपल्या ग्रुपसोबत एक सिग्नेचर मार्क बनवून ठेवायची. त्यांचे फोटो-व्हिडीओज् दिवसेंदिवस बनवत बसायचं. आपल्याला ना डान्समध्ये पुढे जायचं आहे ना टटिंगच्या कलेत. आपल्याला फक्त जरा वेळ लै भारी व्हायचं आहे! तेही दुसऱ्याला दाखवायला.खरं तर टटिंग असो की डिजिटल फॅशन ॲप्स, मेकअप ॲप्स असो की फोटो-व्हिडीओ एडिटिंग आणि मॉर्फिंग... हे कोणाचे करिअरचे, अभ्यासाचे विषय बनू शकतात, पण आपण या सर्व गोष्टी एक मजा म्हणून सुरू करतो आणि त्यात गुरफटत जातोय का, हे प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवे. सगळे करतात, म्हणून आपणपण करावे, असे म्हणून आपण हे करतोय का?आपल्या इतर आवडीनिवडी जोपासत, आपले करिअरचे मार्ग आखत, आपण हे व्हर्च्युअल उद्योग करतोय का? पिकनिक, पार्टीची क्रेझ अनेकांना असते, पण रोज उठून आपण पिकनिकला जात नाही, रोज उठून कुठल्या पार्टीचं प्लॅनिंग करीत नाही. ते रोजरोज घडलं, तर त्यात मजाच राहणार नाही. तसंच रोज उठून आपले सेल्फी कसे भारी येतील, आपली डिजिटल फॅशन कशी भारी येईल, यात दिल-दिमाग खर्ची घालायचा का?आता नवीन काय ट्रेंडी विकत घ्यायचं, नवीन कोणते फिल्टर्स लावायचे आणि मित्रांसोबत नवीन कोणतं टटिंग व्हायरल करायचं, यात गुरफटून प्रत्यक्ष आयुष्यात घरात लोळत पडायचं आहे का? डिजिटल मॉडेल होणं भारी आहे, पण सोपं नाही. ते सगळं आपण स्वतः प्रत्यक्ष आयुष्यात कमवायला शिकणार का?

करा विचार आणि ठरवा तुम्हीच!

आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना शेकडो ॲप्स, फिल्टर्स माहीत आहेत आणि आपल्याला मात्र काहीच माहीत नाही, तर आपण मागे पडू, असं प्रेशर म्हणून आपण हे करतोय का? करून पाहू थोडासा टाइमपास, ‘जस्ट फन’ अशी आपली सवय आहे? बरं, जस्ट फन ही केवळ फन पुरतीच मर्यादित राहते का? जस्ट फन वर आपला किती वेळ जातोय? हे सगळं केलं नाही, तर आपले मित्र छळतील, आपल्याला त्यांच्यात घेणार नाहीत, अशी भीती वाटते का?हे पहा.. पिअर प्रेशर डिजिटलीही आपल्याला छळत असेल, तर ती कसली दोस्ती..?

(लेखिका मानसशास्त्रासह सूक्ष्म जीवशास्त्र आणि पर्यावरणाच्या अभ्यासक आहेत.)

टॅग्स :डिजिटलफॅशन