Join us  

केसांत सतत कोंडा होतो, कितीही उपाय केले तरी कमीच होत नाही? तज्ज्ञ सांगतात त्यामागची २ महत्त्वाची कारणं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2023 1:16 PM

Reasons and types of Dandruff : केसांत कोंडा झाला की आपण अस्वस्थ होतो, मात्र त्याचे कारण आणि प्रकार समजून घेतल्यास उपचार घेणे सोपे होते.

केसांत कोंडा झाला की आपला हात नकळत केसांत जातो आणि आपण हा कोंडा काढत राहतो. तसेच कोंड्यामुळे डोक्यात खाज येत असल्यानेही आपण सतत खाजवत राहतो. हा कोंडा मग आपल्या केसाच्या वरच्या भागात तर दिसतोच पण कपड्यांवरही अगदी स्पष्ट दिसायला लागतो. मग आपण गडद कपडे घालायचे टाळायला लागतो. खाजवल्यानंतर अनेकदा केसांतून पांढरी सालपटं निघतात. इतकेच नाही तर कोंडा झाल्याने केसगळतीचे प्रमाणही साहजिकच वाढते. अशा या कोंड्याची समस्या अनेकांना कधी ना कधी भेडसावतेच. मग आपण एकतर खूप तेल लावतो. केस सतत धुतल्याने ते कोरडे होतात आणि जास्त कोंडा होतो असे म्हणून आपण केस धुणेही टाळतो. नाहीतर बाजरात मिळणारे विविध प्रकारचे शाम्पू, कंडीशनर किंवा आणखी काही लावून हा कोंडा कमी करण्याचा प्रयत्न करतो. पण याने कोंडा कमी न होता तो जास्तच वाढतो (Reasons and types of Dandruff). 

कोंडा होण्याची प्रमुख कारणे...

कोंडा म्हणजे अनेकदा आपल्या केसात असलेल्या तेलकट भागात झालेले एकप्रकारचे फंगस असू शकते. एक्झिमा, सोरायसिस, पुरळ यांसारख्या त्वचेशी निगडीत समस्यांमुळेही कोंडा होऊ शकतो. ताण हेही कोंडा होण्याचे एक महत्त्वाचे कारण असते. नियमित केस न धुणे आणि केसांसाठी सतत रासायनिक उत्पादनांचा वापर करत राहणे ही कोंडा होण्याची आणखी काही महत्त्वाची कारणे असल्याचे प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ डॉ. दिपाली भारद्वाज सांगतात. तसेच ज्यांची प्रतिकारशक्ती खूप कमी असते आणि काही गंभीर आजारांचा जे सामना करत असतात त्यांना कोंड्याची समस्या जास्त प्रमाणात भेडसावते. 

(Image : Google)

कोंड्याचे प्रकार

१. कोरड्या त्वचेचा कोंडा

हा सामान्य प्रकार असून साधारणपणे थंडीच्या दिवसांत अशा प्रकारचा कोंडा अनेकांना होतो. जास्त गरम पाण्याने केस धुतल्यास हा कोंडा वाढण्याची शक्यता असते. केसाला मॉईश्चरायइज करणारे शाम्पू वापरल्यास आणि तेल मालिशसारखे घरगुती उपाय केल्यास हा कोंडा कमी होतो. 

२.  तेलकट त्वचेचा कोंडा

डोक्यातील त्वचेत सिबमची निर्मिती जास्त प्रमाणात झाल्यास केसाची त्वचा तेलकट होते आणि त्यामुळे हा कोंडा होतो. तेलकट त्वचेमध्ये होणाऱ्या कोंड्याचे प्रमाण खूप जास्त असते आणि हा कोंडा थोडा पिवळसर दिसतो. यासाठी नियमित केस धुणे आणि सॅलिसिलिक अॅसिड असलेल्या शाम्पूचा वापर करणे फायदेशीर ठरते. 

३. बुरशीसारखा कोंडा 

माणसाच्या शरीरावर नैसर्गिकरित्या हे फंगस असतेच पण काही जणांमध्ये ते जास्त प्रमाणात असते. अशा लोकांना अक्झिमासारख्या समस्या निर्माण होतात आणि कोंड्यासारखी त्वचा निघते. यासाठी मालासेझिया नावाचा रासायनिक घटक असलेल्या शाम्पूचा वापर करणे फायदेशीर ठरते. 

(Image : Google)

४. आजारांशी निगडीत कोंडा 

सोरायसिस, एक्झिमा किंवा त्वचेशी निगडीत इतर आजार असणाऱ्यांना हा कोंडा होतो. यामध्ये त्वचा लाल होऊन त्याठिकाणची त्वचा निघाल्यासारखी होते. यासाठी ज्या शाम्पूमध्ये झिंक पायरिथिओन आहे असे शाम्पू वापरायला हवेत. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी