मेकअप हलकासा असू देत किंवा बोल्ड. सर्व प्रकारच्या मेकअपमध्ये लिपस्टिकचा वापर होतोच. ओठ सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळ्या शेडच्या, वेगवेगळ्या प्रकारच्या लिपस्टिक आणि लिपग्लाॅस यांचा वापर केला जातो. ओठ मुळातच गुलाबीसर असतील तर ऊठसूठ लिपस्टिक लावण्याची गरज पडत नाही. पण ओठ काळे पडण्यास (reasons for dark lips) वाढतं वय, तीव्र ऊन यांचा परिणाम ओठांवर होतो आणि ओठ काळे पडतात. मग हे काळे ओठ लपवण्यासाठी लिपस्टिकचा वापर केला जातो. ओठ काळे (dark lips) पडण्याला केवळ वाढतं वय, ऊन एवढीच कारणं कारणीभूत नसतात. तर आपण स्वत: करत असलेल्या चुकांचा परिणाम म्हणूनही ओठ काळे पडतात. अशा कोणत्या चुका (mistakes for dark lips) आपण करतो याबाबत सेलिब्रेटी मेकअप आर्टिस्ट आणि स्किन केअर एक्सपर्ट रिया वशिष्ट यांनी सविस्तर माहिती दिली आहे. रिया यांनी सांगितलेली कारणं वाचली तर या चुका आपण सहज टाळून ओठांचा नैसर्गिक गुलाबी रंग जपू शकतो हे लक्षात येईल.
Image: Google
ओठ काळे पडतात..
1. ओठ सुंदर दिसण्यासाठी मेकअपमध्ये लिपस्टिकची भूमिका महत्वाची असते. पण पैसे वाचवण्यासाठी अनेकजणी हलक्या ब्रॅण्डची स्वस्तातली लिपस्टिक वापरतात. हलक्या ब्रॅण्डची लिपस्टिक सतत वापरत राहिल्यास ओठ काळे पडतात. कारण स्वस्तातल्या आणि हलक्या ब्रॅण्डच्या लिपस्टिकमधले घटकही सुमार दर्जाचे असतात. हे टाळण्यासाठी नेहमी चांगल्या ब्रॅंडच्या (भलेही महाग असली तरी) लिपस्टिकचाच वापर करावा. महागड्या लिपस्टिकमध्ये पैसे खर्च करावेसे वाटत नसतील तर सुमार दर्जाची लिपस्टिक वापरण्यापेक्षा घरच्याघरी नैसर्गिक घटकांचा वापर करुन तयार केलेल्या लिप टिंटचा वापर ओठांवर करावा.
Image: Google
2. एकदा घेतलेली लिपस्टिक वर्षानुवर्ष वापरत राहाण्याची सवयही अनेकींना असते. अनेक महिला रोज लिपस्टिक न लावता काही विशेष कारणाप्रसंगीच लिपस्टिक लावतात. त्यामुळे लिपस्टिक लवकर संपत नाही. आपल्याकडे असलेली लिपस्टिक वापरत असताना लिपस्टिकच्या एक्सपायरी डेटकडेही अवश्य लक्ष असायला हवं. एक्सपायर झालेली लिपस्टिक ओठांना लावत राहाणं हे ओठांच्या आरोग्य आणि सौंदर्याच्या दृष्टिकोनातून घातक असतं. एक्सपायर झालेली लिपस्टिक लावत राहिल्यास ओठ काळे पडतात. तसेच लिपस्टिक लावताना घाणेरड्या ब्रशचा वापर केल्यासही ओठ काळे पडतात.
Image: Google
3. मेकअप करुन बाहेर उन्हात जाणं हे देखील ओठ काळे पडण्याला कारणीभूत असतं. लिपस्टिक लावून उन्हात गेल्यास तीव्र उन्हाचा परिणाम ओठांवर होवून ओठ काळे पडतात. लिपस्टिक लावून बाहेर जाताना नेहमी ओठ झाकलेले असावे. यासाठी मास्कचा वापर करता येतो किंवा लिपस्टिक लावण्याआधी ओठांवर सन प्रोटेक्शन अवश्य लावावं.
Image: Google
4. ओठांवर आठवणीनं लिपस्टिक लावली जाते पण ती काढली जाण्याकडे मात्र दुर्लक्ष होतं त्यामुळे ओठ काळे पडतात. रात्री झोपण्याआधी चेहेऱ्यावरचा मेकअप काढणं, ओठांवरची लिपस्टिक काढणं ही चेहेऱ्याची त्वचा आणि नाजूक ओठ जपण्यासाठी अत्यंत आवश्यक असतं. ओठांना लावलेली लिपस्टिक केवळ पाण्यानं धुवू नये. यासाठी कच्चं दूध आणि थोडं गुलाब पाणी एकत्र करुन घ्यावं. हे मिश्रण कापसाच्या बोळ्यानं ओठांना लावावं. यामुळे ओठांवरची लिपस्टिक निघून जाते. ओठांचा मऊपणा जपला जातो, ओठ नैसर्गिकरित्या गुलाबी होण्यास मदत होते. या उपायानं ओठ काळे पडत नाही.