Join us  

त्वचेच्या अनेक समस्यांवर मसूर डाळ हा उत्तम उपाय! मऊ मुलायम उजळ त्वचेसाठी घरच्याघरी 3 उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2022 2:10 PM

उन्हाळ्यात त्वचेला मोकळा श्वास घेता यावा यासाठी करावेत मसुर डाळीचे 3 उपाय!

ठळक मुद्देमसूर डाळीला ' नॅचरल क्लीन्जर' म्हटलं जातं.उन्हाळ्यातल्या टॅनिंगवर मसूर डाळीद्वारे प्रभावी उपाय करता येतो.चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी मसूर डाळीचा उपयोग

मसूर डाळ ही त्वचेसाठी वरदान मानली जाते. त्वचेच्या अनेक समस्या मसूर डाळीच्या उपयोगानं बऱ्या होतात.  मसूर डाळीत  इतर डाळींच्या तुलनेत 25 टक्के जास्त प्रथिनं असतात. तसेच लोह. मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि झिंक ही खनिजं तसेच ब जीवनसत्व असतं. आपल्या शरीराला जशी पोषणाची गरज असते तशीच आपल्या त्वचेलाही मोकळेपणानं श्वास घेण्यासाठी पोषक घटकांची आवश्यकता असते.उन्हाळ्यात मुरुम, पुटकुळ्या, फोड, डाग, त्वचेवर अतिरिक्त तेल निर्माण होणं यासाख्या अनेक समस्या निर्माण होतात. या समस्यांमुळे त्वचा मोकळेपणानं श्वास घेत नाही. पण मसूर डाळीचा योग्य तऱ्हेने त्वचेवर उपाय केल्यास त्वचा मऊ, मुलायम आणि निरोगी होते. मसूर डाळ ही त्वचेसाठी उत्तम एक्सफोलिएटरचं काम करते. मसूर डाळीच्या उपयोगानं चेहऱ्यावरील मृत त्वचा, मृत पेशी निघून जातात. 

Image: Google

त्वचा निरोगी आणि सुंदर होण्यासाठी क जीवनसत्व आवश्यक असतं.  मसूर डाळीतून त्वचेस क जीवनसत्वासोबतच इतर पोषक घटकही मिळतात. मसुर डाळीत क ,ब6, ब2 या जीवनसत्वाचा प्रमुख स्त्रोत आहे. त्याचप्रमाणे मसूर डाळीत फोलिक ॲसिड, लोह, प्रथिनं, कॅल्शियम, झिंक हे महत्वाचे घटक असतात. या घटकांमुळे चेहऱ्याच्या त्वचेवरील घाण, डाग निघून जातात. त्वचेसाठी नित्यनेमानं मसूर डाळ वापरल्यास चेहऱ्यावर मुरुम पुटकुळ्यांची समस्या निर्माण होत नाही. मसूर डाळीला ' नॅचरल क्लीन्जर' म्हटलं जातं.मसूर डाळीचा चेहऱ्यास फायदा होण्यासाठी ती वापरण्याच्या 3 पध्दती आहेत. यामुळे त्वचा उजळ होण्यासापासून चेहऱ्यावरील केसही निघून जातात. 

Image: Google

टमाटा आणि मसूर डाळ

उन्हानं त्वचा काळवंडते. मसूर डाळ जर टमाट्यासोबत वापरली तर त्वचेवरील काळपटपणा दूर् होतो. यासाठी मसूर डाळ पाण्यात भिजवावी. दुसऱ्या दिवशी सकाळी टमाट्याच्या 2-3 फोडींसह मसूर डाळ वाटून घ्यावी. ही पेस्ट आंघोळीआधी चेहऱ्याला लावून 10 मिनिटं ठेवावी. नंतर चेहरा थंड पाण्यानं धुवावा.

Image: Google

मसूर डाळीचा स्क्रब

मसूर डाळीपासून स्क्रब तयार करुन तो चेहऱ्यास वापरल्यास चेहऱ्यावरील मृत त्वचा , घाण स्वच्छ होते. मसूर डाळीचा स्क्रब तयार करण्यासाठी मसूर डाळ रात्री भिजत घालावी. दुसऱ्या दिवशी  सकाळी थोड्याशा दुधात डाळ वाटून घ्यावी.  हे मिश्रण चेहऱ्यास हलका मसाज करत लावावं. 2-3 मिनिटं मसूर डाळीच्या स्क्रबनं चेहऱ्यास मसाज करावा. मसाज झाल्यानंतर 5 ते 7 मिनिटांनी चेहरा थंड पाण्यानं स्वच्छ धुवावा.

Image: Google

चेहऱ्यावरचे केस काढण्यासाठी मसूर डाळ

चेहऱ्यावरचे केस काढून टाकण्यसाठी मसूर डाळीचा उपयोग करता येतो. त्यासाठी 1 चमचा मसूर डाळ, 1 चमचा चंदन पावडर, संत्र्याचं साल आणि दूध घ्यावं. सर्वात आधी मसूर डाळ ही दुधात रात्रभर भिजवावी. त्यातच संत्र्याचं साल घालावं. दुसऱ्या दिवशी सकाळी मिक्सरमधून ते वाटून घ्यावं. त्यात चंदन पावडर घालावी. हे सर्व नीट एकत्र करुन चेहऱ्यास हा लेप लावावा.  10-15 मिनिटांनी चेहरा गार पाण्यानं धुवावा.

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सहोम रेमेडी