सायली जोशी-पटवर्धन
ऑफीसला, एखाद्या पार्टीला किंवा सणावाराला कोणाच्या घरी जायचे असेल की आपण किमान मेकअप तरी करतोच. यामध्ये काजळ, लिपस्टिक, आयलायनर या गोष्टींचा आवर्जून समावेश असतो. सौंदर्य खुलवणाऱ्या या गोष्टींचा तुम्ही योग्य पद्धतीने कसा वापर करता हे सध्याच्या काळात अतिशय महत्त्वाचे आहे. छोट्या पडद्यावर किंवा ब़लिवूड अभिनेत्री कपड्याचा, दागिन्यांचा किंवा सौंदर्यप्रसाधनांचा कसा वापर करतात ते आपल्यातील अनेक जणी फॉलो करताना दिसतात. मग कधी फॉर्मल लूक, कधी एकदम पारंपरिक तर कधी पार्टीसाठी एकदम हॉट लूक केला जातो. हे सगळे करताना आपण कोणत्या प्रकारची, कोणत्या शेडची लिपस्टिक लावतो हे पाहणे अतिशय महत्त्वाचे असते. कोणत्याही प्रसंगी आपण प्रमाणापेक्षा जास्त मेकअप केला आणि त्यातही सर्वात महत्त्वाचे म्हणजे लाल रंगाची भडक लिपस्टिक Red Lipstick लावली तर आपल्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलतो हे लक्षात घ्यायला हवे.
आता असं का? याला काही ठोस कारण नाही. पण “लाल लिपस्टिक फक्त ‘त्याच’ बायका लावतात”, “तु इतकी गोरी आहेस किंवा तू दिसायला इतकी सुंदर आहेस मग एखादी पिंक शेडची किंवा न्यूड लिपस्टिक शेड तुझ्यावर जास्त खुलून दिसेल”, “तुला का इतकं बोल्ड राहायला आवडतं” असे डायलॉग केवळ पुरुषच नाही तर महिलांमध्येही अनेकदा ऐकू येतात. नावही ठेवली जातात. लाल भडक रंगाची लिपस्टिक समाजातील एक विशिष्ट वर्गाचे प्रातिनिधीत्व करणारी असल्याचे आपल्याकडे दबक्या आवाजात अनेकदा बोलले जाते. आता या बोल्ड किंवा भडक म्हटल्या जाणाऱ्या लिपस्टीकची चर्चा पुन्हा का सुरू झाली तर त्याचे मुख्य कारण म्हणजे काही दिवसांनी प्रदर्शित होत असलेला ‘गंगूबाई काठियावाडी’ gangubai kathiawadi हा चित्रपट. प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भटची Alia Bhat प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या निमित्ताने तिच्या लूकविषयी आणि एकूणच फॅशनविषयी पुन्हा एकदा या चर्चा सुरू झाल्या आहेत. यामध्ये तिने लावलेली लाल भडक लिपस्टीक ‘त्या’ महिलांचे प्रतिनिधित्व करते असे म्हटले जात आहे. आता आपल्याला काय सूट होते, कोणत्या प्रसंगी आपण कशाप्रकारे मेकअप करतो, आपली आवड काय यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. मात्र भडक लिपस्टिक लावणाऱ्यांवर असे ताशेरे ओढणाऱ्यांमध्ये काहींचा हातखंडा असतो. त्यामुळे एखाद्या पार्टीमध्ये किंवा समारंभात तुम्हाला आवडत असेल, सूट होत असेल तर तुम्ही अशाप्रकारे लाल रंगाची डार्क लिपस्टिक लावू शकता. दिपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा, ऐश्वर्या राय बच्चन यांसारख्या अभिनेत्रींनी मोठ्या पडद्यावर आणि प्रत्यक्षातही अनेकदा असा बोल्ड लूक केला आहे आणि त्याची अनेकदा वाहवा केली जाते.
नवऱ्याने विकल्यानंतर कोठ्यावर आलेली गंगा नंतर गंगूबाई झाली. येथील अन्याय, अत्याचारांना धीराने सामोरी गेली. मुंबईतील कामाठीपुरा भागातील कोणत्याही मुलीला तिच्या मनाविरोधात या व्यवसायात आणल्यास गंगू तिला कोठ्यावर ठेवत नसे. वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला आणि त्यांची मुलं, अनाथ मुलं या सर्वांसाठी गंगूनं पुढच्या काळात मोठं काम उभं केलं. कामाठीपुरा मुंबईतून काढून टाकण्याच्या चर्चा होताच त्यालाही गंगूनं तीव्र विरोध केला. इतकंच नाही तर देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरु यांच्यापर्यंत जाऊन पोहोचलेल्या गंगूबाईने त्यांच्यासमोरही अनेक प्रश्न उपस्थित केले. पंतप्रधानांशी थेट बोलण्याचं धाडस असणारी गंगू त्यावेळी खूप प्रसिद्ध झाली. पुढे गंगुबाईनं कामाठीपुऱ्यातील स्थानिक निवडणूक गाजवली. अनेकांच्या रोषाला ती सामोरी गेली, मात्र तिला मानणारा खूप मोठा वर्ग आजही याठिकाणी आहे. आजही तिचे पुतळेही दिसतात. आलिया भटने या चित्रपटात गंगूबाईचा हाच जीवनपट मांडला आहे.