आपला चेहरा चांगला दिसावा यासाठी आपण एक ना अनेक उपाय करत असतो. कधी त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी तर कधी त्वचेवरील पुरळ कमी होण्यासाठी आपण पार्लरमध्ये जाऊन नाहीतर घरच्या घरी काही ना काही करत असतो. कधी चेहऱ्यावरचे काळे डाग आपल्या सौंदर्यात बाधा आणतात तर कधी ब्लॅकहेडस चेहरा खराब दिसण्यासाठी कारणीभूत ठरतात. पण या सगळ्या समस्यांसाठी उपाय असतातच. त्या उपायांनी आपण आपले सौंदर्य पुन्हा मिळवू शकतो. वाढते प्रदूषण, वेगवेगळ्या प्रकारचे ताण, जीवनशैलीत वेगाने होणारे बदल यांमुळे आपल्या त्वचेवरही परिणाम होतो आणि पुरळ, डाग, ब्लॅकहेडससारख्या समस्या डोके वर काढायला लागतात. चेहऱ्यावरचे ब्लॅकहेडस काढणे हे एक महत्त्वाचे काम असते. हल्ली आपण घरच्या घरीही हे काम सहज करु शकतो. ब्लॅकहेडस म्हणजे चेहऱ्याच्या त्वचेवर जमा झालेली घाण एकत्रित होते आणि त्याचा ब्लॅकहेड तयार होतो. साधारणपणे नाकावर, कपाळावार, ओठाच्या खालच्या बाजूला, गालावर हे ब्लॅकहेडस येतात. ते वेळीच काढून टाकले नाही तर त्याचा आकार वाढतो आणि ते काढल्यानंतर त्याठिकाणी खड्डा पडल्यासारखे दिसते. या ब्लॅकडेहडसचे प्रमाण जास्त झाले तर संपूर्ण चेहराच विद्रूप दिसायला लागतो. त्यामुळे वेळच्यावेळी ते योग्य पद्धतीने काढणे आवश्यक आहे. पाहूयात ब्लॅकहेडस काढताना कोणत्या चुका टाळायला हव्यात....नाहीतर चेहरा जास्तच खराब होण्याची शक्यता असते.
१. नखांनी ब्लॅकहेडस काढणे
ब्लॅकहेडस काढण्यासाठी काहीवेळा आपण नखांचा वापर करतो. नखांनी दाबल्यानंतर हे ब्लॅकहेडस बाहेर येतील असे आपल्याला वाटते आणि आपण तसे प्रयत्न करतो. मात्र ब्लॅकहेडस अनेकदा आतपर्यंत गेलेले असतात, अशावेळी आपण ते नखांनी काढायचा प्रयत्न केला तर त्वचेला त्रास होऊ शकतो. चेहऱ्यावर ब्लॅकहेडस पाहिले की आपल्याला राहावत नाही आणि आपण त्याच्याशी नखांनी खेळत बसतो, पण काहीवेळा त्यामुळे चेहऱ्यावर डाग पडण्याची शक्यता असते, हा डाग पुढे बराच काळ तसाच राहत असल्याने अशाप्रकारे ब्लॅकहेडस नखांनी काढणे योग्य नाही.
२. ब्लॅकहेडस रिमूव्हलचा चुकीचा वापर
ब्लॅकहेडस रिमूव्हलने ब्लॅकहेड काढणे कधीही फायद्याचे असते. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे मेटल रिमूव्हर मिळतात. पण एकदा ब्लॅकहेडस काढून झाल्यावर ते रिमूव्हर तसेच ठेवले आणि पुन्हा वापरले गेले तर त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येणे किंवा इतर समस्या उद्भवतात. त्यामुळे मेटलचे ब्लॅकहेड रिमूव्हर वापरुन झाल्यावर ते कापसाने किंवा चक्क पाण्याने स्वच्छ धुवून कोरडे करुन ठेवावेत. त्यामुळे योग्य ती स्वच्छता तर राखली जातेच पण त्वचेलाही त्रास होत नाही.
३. सतत स्क्रबिंग करणे
चेहऱ्यावर ब्लॅकहेडस आहेत म्हणून सतत स्क्रबिंग करण्याची चूक काही जण करतात. स्क्रबरने स्क्रब केल्यावर हे ब्लॅकहेडस जायला मदत होईल असे त्यांना वाटत असते. पण असे होत नाही. ब्लॅकहेडस हे त्वचेच्या आतपर्यंत गेलेले असल्याने ते नुसते स्क्रब करुन निघत नाहीत. याउलट जास्त स्क्रबिंग केल्याने त्वचेवर रॅश येण्याची, त्वचा कोरडी पडण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे काही मिनिटे हलक्या हाताने दिवसातून एखादवेळी स्क्रबिंग करणे ठिक आहे. पण सतत केल्यास त्याचा त्रास होऊ शकतो आणि ब्लॅकहेडस तर निघत नाहीतच.
४. तेलकट स्कीनमधून ब्लॅकहेडस काढणे
कोरड्या त्वचेपेक्षा तेलकट त्वचेमध्ये ब्लॅकहेडसची समस्या जास्त असते. चेहऱ्यावरच्या तेलकटपणामुळे घाण चेहऱ्यावर जास्त प्रमाणात चिकटते आणि ती अडकून बसते. तसेच तेलकट त्वचेवर जास्तीचे सीबम पोर्स सहज जमा होतात, ज्यामुळे ब्लॅकहेडस होतात. तसेच चेहरा सतत तेलकट असल्याने कित्येक वेळा ब्लॅकहेडस नीट दिसत नाहीत. त्यामुळे ते काढण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून घेणे फायद्याचे ठरते. तसेच त्वचा खूप कोरडी असेल तर आधी थोडे मॉइश्चरायझर लावून ब्लॅकहेडस काढणे फायद्याचे ठरते.
५. सेफ्टी पीन किंवा रेजरचा वापर
काही वेळा तरुणी ब्लॅकहेडस काढण्यासाठी रेजरचा वापर करतात. पण हा अतिशय चुकीचा मार्ग आहे. असे केल्याने त्वचेची सालपटे निघतात. चेहऱ्याची त्वचा खूप नाजूक असते, त्यामुळे असे कोणतेही प्रयोग चेहऱ्यावर करु नयेत. तसेच असे करताना योग्य ती स्वच्छता पाळली गेली नाही तर त्याचाही त्वचेवर चुकीचा परिणाम होऊ शकतो. याबरोबरच ब्लॅकहेड काढण्यासाठी काही जण सेफ्टीपीनचा वापर करतात. असे घरगुती उपाय करणे त्वचेसाठी धोक्याचे असते. त्यामुळे तुम्हाला ब्लॅकहेड काढण्यात अडचणी असतील तर ब्यूटी एक्सपर्टची मदत घ्या. तसेच एकाचवेळी चेहऱ्यावरील सगळे ब्लॅकहेडस एकत्र काढू नका, त्यामुळे चेहऱ्याची आग होण्याची शक्यता असते.