सारीका पूरकर गुजराथी
लॉकडाऊनमुळे घरात कोंडून राहावे लागत असल्यामुळे नको नको झालंय. कधीकाळी आपण छान नटूनथटून, मेकअप करुन बाहेर जायचो. मित्रमैत्रिणींना भेटायचो हे सारंच भूतकाळात जमा झालं आहे. रोज घरात तेच वर्क फ्रॉम होम, तेच पायजमे, तोच केसांचा बुचडा आणि तोच अवतार.आता यावर उपाय काय? अवतीभोवती इतकी अस्वस्थता असताना छान रहा म्हटलं कुणी तरी अवघड आहे. त्यात केस वाढले, आयब्रोसह चेहऱ्याचा अवतार झाला आहे. एकच प्रश्न पडलाय तो म्हणून सलून कधी उघडणार आहेत? लहान मुलांपासून मोठ्यांचेही केस आता जरा जास्तीच वाढीस लागलेत. त्यात ऊन मी म्हणायला लागलेय. आता केसांचे हे ओझे नकोसे होऊन बसलेय.
कोणी इंटरनेटर वाचून केस कापताहेत, कोणी घरातीलच कात्री व अन्य सामान घेऊन केसं कापताहेत.. काहींनी सरळ वेणी घालायला सुरुवात केली आहे. मध्यंतरी मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची, अष्टपैलू नायिका सोनाली कुलकर्णी ( सिनिअर ) हिने एक फोटो पोस्ट केला होता. त्यात तिने म्हटलं होतं, चला पुन्हा रेट्रो स्टाईल करु या. या फोटोत तिने संपूर्ण केसं एका बाजूला घेत पोनी टेल बांधली होती. आता घरच्या घरी कुणी मिडल पार्टिशन करुन दोन वेण्या घालून पाहतेय. कुणी दोन अंबाडे ( आता त्याला बन म्हणतात ) घालतेय. फक्त हे लो बन असायला हवेत. ही सुद्धा रेट्रोच स्टाईल. सागर वेणी ट्राय करा. खजूर वेणी ( पाच पुडांची ) ट्राय करा ..उंदराच्या शेपट्या सुद्धा ट्राय करा..होय, ही देखील स्टाईल आहे. सर्व केसांची उंच पोनी बांधून छोट्या छोट्या वेण्या घालून त्या एकत्र बांधा. खुबसुरतमध्ये रेखाने घातल्या होत्या तशा दोन वेण्या ट्राय करा. हवं तर त्या तुम्ही मागे क्रॉसमध्ये ( उजवी डावीकडे व डावी उजवीकडे ) बांधू शकता. ( करिश्माने बांधल्या होत्या अनाडीमध्ये )मुद्दा काय जरा, आपल्याला बरं वाटावं म्हणून करा काहीतरी..