मेकअपच्या जगात सतत नवीन ट्रेण्ड येत असतात. मेकअपमुळे सौंदर्यात भर पडते, चारचौघात उठून दिसण्यासाठी, प्रभावी आणि आकर्षक दिसण्यासाठी स्त्रियांना मेकअपची भुरळ पडतेच. मेकअपच्या बाबतीत काय नवीन येतंय याकडे स्त्रियांचं सतत लक्ष असतं. आपल्याला जे सूट होईल ते त्यातून पटकन उचललं जातं. सध्या सोशल मीडियावर ‘रिव्हर्स मेकअप’ हा मेकअपचा प्रकार खूप ट्रेण्ड होतोय.
गाडी रिव्हर्स घेणं, फिल्म बघताना ती रिव्हर्स करुन बघणं अशा रिव्हर्सबद्दल आपल्याला माहित असतं. पण हा रिव्हर्स मेकअप काय आहे हे जाणून घेण्याची अनेकींना उत्सुकता आहे. मेकअप नियमित करणार्यांना मेकअपच्या स्टेप्स माहिती असतात. आधी चेहेर्याला प्रायमर म्हणजे मेकअप बेस लावला जातो, मग फाऊंडेशन, त्यानंतर बीबी क्रीम लावलं जातं. त्यानंतर चेहेर्याला शेप देण्यासाठी कॉंन्टेरिंग, तेज येण्यासाठी ब्लश आणि हायलायटर वापरलं जातं. रिव्हर्स मेकअपच्या बाबतीत उलट्या स्टेप्सने मेकअप केला जातो. रिव्हर्स मेकअप पध्दतीनुसार मेकअप करताना पहिले कॉन्टेरिंग मग हायलायटर आणि ब्लश यांचा वापर केला जातो. आणि त्यानंतर बीबी क्रीम किंवा लूज पावडर वापरली जाते.
अनेकजणींना मेकअप तर हवा असतो पण मेकअपमुळे आपला नैसर्गिक लूक हरवता कामा नये ही देखील काळजी असते. नॅचरल लुकच्या प्रेमात असणार्यांनी हा रिव्हर्स मेकअप नक्की करुन पाहायला हवा. नेहेमीच्या पध्दतीनुसार मेकअप करताना मेकअप बेस लावून झाल्यावर आणि मेकअपच्या पहिल्या पायर्या पार केल्यानंतर जेव्हा कॉंन्टूर, ब्लश आणि हायलाइट लावता तेव्हा तुमचा लूक खूपच उठून दिसतो. मेकअप लगेच लक्षात येतो, डोळ्यात भरतो. पण जेव्हा रिव्हर्स मेकअप स्टाइलनं मेकअप केला जातो तेव्हा तुम्ही जास्त नैसर्गिक दिसतात. मेकअप करुनही नो मेकअप लूक हवा असल्यास हा रिव्हर्स मेकअप म्हणूनच उत्तम पर्याय आहे.
रिव्हर्स मेकअप करताना
1. सर्वात आधी चेहेर्यावर सेटिंग स्प्रे मारावा. एरवी मेकअप करताना हा स्प्रे सर्वात शेवटी मारला जातो. रिव्हर्स मेकअप करताना तो आधी मारावा. यामुळे मेकअप जास्त काळ टिकतो.
2. सेटिंग स्प्रेनंतर चेहेर्याला प्रायमर लावावा. यामुळे आपली त्वचा मऊ होते, शिवाय चेहेर्यावरील रंध्र त्यामुळे झाकली जातात. प्रायमरमुळे मेकअप करण्यासाठी चेहेर्यावर एक मऊ मुलायम कॅनव्हास तयार होतो. यामुळे मेकअप प्रोडक्स वापरणं सहज होतं.
3. प्रायमर नंतर फाउंडेशन न लावता कॉन्टूरिंग करावं आणि मग आवडीचा ब्लश आणि हायलायटर लावावं. ब्रशच्या सहाय्यानं ते चेहेर्यावर नीट सेट करावं.
4. रिव्हर्स मेकअप करताना सर्वात शेवटी चेहेर्याला बी बी क्रीम किंवा फाउंडेशन लावावं. हातानं किंवा ब्रशच्या सहाय्यानं सर्व चेहेर्यावर नीट पसरवावं. याचा चेहेर्यावर थर न दिसता ते चेहेर्यात मिसळ्ल्यासारखं दिसायला हवं.
5. बी बी क्रीम किंवा फाउंडेशन लावून झाल्यावर मेकअप सेट करण्यासाठी लूज पावडर लावावी.
या टप्प्यांनी मेकअप केला की नो मेकअप लूक मिळतो. मेकअपच्या आडूनही आपलं नैसर्गिक सौंदर्य दिसून येतं.
हा मेकअप ट्रेण्ड नवीन असल्या कारणानं तो स्वत: करताना आधी सौंदर्यतज्ज्ञांचा सल्ला जरुर घ्यावा.