Lokmat Sakhi >Beauty > तांदूळाचं पीठ आणि बेसन, एवढ्या दोनच गोष्टी देतील छान ग्लो, हिवाळ्यात खास ४ उपाय

तांदूळाचं पीठ आणि बेसन, एवढ्या दोनच गोष्टी देतील छान ग्लो, हिवाळ्यात खास ४ उपाय

चेहऱ्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी घरच्या घरी करता येतील असे सोपे फेसपॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2021 04:18 PM2021-12-18T16:18:22+5:302021-12-18T16:30:32+5:30

चेहऱ्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी घरच्या घरी करता येतील असे सोपे फेसपॅक

Rice flour and gram flour, these two things will give a nice glow, 4 special remedies for winter | तांदूळाचं पीठ आणि बेसन, एवढ्या दोनच गोष्टी देतील छान ग्लो, हिवाळ्यात खास ४ उपाय

तांदूळाचं पीठ आणि बेसन, एवढ्या दोनच गोष्टी देतील छान ग्लो, हिवाळ्यात खास ४ उपाय

Highlightsघरच्या घरी उपलब्ध वस्तूंमधून करता येतील असे सोपे फेसपॅक महागडी सौंदर्यप्रसाधने वापरण्याआधी हे घरगुती उपाय करुन बघा...

तुमच्या सौंदर्यात चेहऱ्यावरचे सौंदर्य तर महत्त्वाचे असतेच पण तुमच्या आतले सौंदर्य सर्वाधिक महत्त्वाचे असते. केवळ मेकअपने झाकलेला जाहिरातीतल्या बाईचा चेहरा म्हणजे सौंद्रर्य नाही. किंवा उंची कपडे आणि दागिने घालून खुलवलेले रुप म्हणजे सौंदर्य नाही. तर ते तुमच्या आत असायला लागते. चेहरा, केस, बांधा यांचे सौंदर्य महत्त्वाचे असेल तरी सुदृढ मन आणि चांगले विचार यांमुळे येणार सौंदर्य सगळ्यात महत्त्वाचे असते. तुम्ही आतून खूश, आनंदी आणि सकारात्मक असाल तर त्याचा तुमच्या चेहऱ्यावर नकळत परीणाम होतो आणि तुमचे सौंदर्य वाढते. तुम्हाला चांगले दिसायचे असेल तर नैसर्गिक उजळपणा मिळवण्यासाठी काही सोपे उपाय करु शकता. सौंदर्यासाठी प्रत्येकीला महागडे उपचार किंवा पार्लरींग करणे शक्य असतेच असे नाही. तसेच हे उपचार प्रत्येकीच्या त्वचेला मानवतात असेही नाही. त्यामुळे घरच्या घरी करता येतील असे काही सोपे उपाय समजून घेणे महत्त्वाचे आहे. 

चेहरा उजळ नसण्याची काही कारणे 

१.    अतिशय तणावपूर्ण आणि चुकीची जीवनशैली
२.    धूम्रपान, अल्कोहोल इं.चे अतिप्रमाणात सेवन
३.    खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी
४.    अपुरी झोप

नैसर्गिक फेसपॅक १ 

१.    हळद – हळद हा भारतीय स्वयंपाकघरातील एक उत्तम पदार्थ आहे. अँटीबायोटीक म्हणूनही हळद अतिशय उपयुक्त असते. विविध प्रकारच्या इन्फेक्शन्सपासून त्वचा चांगली राहण्यासाठी हळदीचा चांगला उपयोग होतो. हळदीचा आपण आहारात आणि चेहऱ्याला लावण्यासाठी अतिशय नियमितपणे वापर करु शकतो, कारण त्यापासून कोणताही तोटा उद्भवत नाही. मात्र ही हळद नैसर्गिक आणि चांगल्या प्रतीची असेल याची काळजी घ्यायला हवी. 

२.    बेसन – बेसन पीठामुळे त्वचेमध्ये जमा झालेली घाण निघून जाण्यास मदत होते. चेहऱ्याचा रफनेस कमी करण्याच्यादृष्टीनेही बेसन अतिशय उपयुक्त असते. बेसनामध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते जे खाण्याच्यादृष्टीनेही चांगले मानले जाते. 

३.    गुलाबपाणी – गुलाबपाणी हे थंड असल्याने ते लावल्याने शांत वाटते. तसेच चेहरा स्वच्छ करण्यासाठी एक उत्तम उपाय मानले जाते. 

फेसपॅक – या तिन्ही गोष्टी एका बाऊलमध्ये व्यवस्थित एकत्र करा आणि चेहऱ्याला एकसारखा हा लेप लावा. ३० मिनिटांनी चेहरा हळूवार धुवून टाका. यामध्ये गार पाण्याचा वापर शक्यतो टाळा आणि कोमट पाण्याने धुवा त्यामुळे या घटकांचा चेहऱ्यावर परीणाम टिकून राहण्यास मदत होईल. 

नैसर्गिक फेसपॅक २ 

१.    तांदूळ पीठ – तांदूळाची पिठ पूर्ण बारीक नसते तर ते थोडेसे अर्धे कच्चे असल्याने ते चेहऱ्याला लावल्यास चेहऱ्यावरील खराब झालेली त्वचा निघून जाण्यास मदत होते.
 
२.    चंदन पावडर – सूर्याच्या अतिनील किरणांमुळे काही वेळा त्वचा खराब होऊ शकते. ही खराब झालेली त्वचा पूर्ववत करायची असेल तर चंदन पावडर उपयुक्त ठरते. चेहरा उजळवण्यास त्याचा फायदा होतो. 

फेसपॅक – तांदूळ पीठ आणि चंदन वापडर गुलाब पाण्यात एकत्र करा. योग्य पद्धतीने एकत्र केलेली ही पेस्ट चेहऱ्याच्या सगळ्या भागाला एकसारखी लावा. चेहरा आणि मानेला हा फेसपॅक लावताना हलक्या हाताने मसाज करा. हा पॅक चेहऱ्यावर पूर्णपणे वाळू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. हे करत असताना स्वत:ला अतिशय रिलॅक्स ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुम्ही या संपूर्ण प्रक्रियेचा आनंद घेऊ शकाल. 

नैसर्गिक फेसपॅक – ३ 

१.    कोरफड – कोरफडीचा गर त्वचेसाठी, केसांसाठी आणि इतरही अनेक गोष्टींसाठी अतिशय उपयुक्त असल्याचे आपल्याला माहित आहे. तुम्ही घरात कोरफड लावलीत तर हा गर तुम्हाला अगदी सहज उपलब्ध होऊ शकतो. 

२.    ग्लिसरीन – ग्लिसरीनमध्येही अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात जे त्वचेचा काळपटपणा, डाग निघण्यास मदत करतात. 

३.    बदाम तेल – बदाम आरोग्यासाठी किती फायदेशीर असतात हे आपण नेहमीच ऐकतो आणि वाचतो. पण प्रत्यक्षात त्या गोष्टींचा वापर करणे मात्र राहू जाते. बदाम तेल सहज उपलब्ध होणारी गोष्ट असून त्यामुळे त्वचेचा ग्लो वाढण्यास निश्चितच मदत होते. 

फेसपॅक – कोरफडीचा गर दोन चमचे, अर्धा चमचा ग्लिसरीन आणि अर्धा चमचा बदाम तेल या गोष्टी एकत्र करा. हा पॅक चेहऱ्याला लावताना चेहऱ्याला हळूवार मसाज करा. तसेच हा पॅक चेहऱ्याला लावून तुम्ही ५ ते ६ तासही ठेवू शकता. त्यामुळे हे घटक चेहऱ्यात चांगल्या पद्धतीने मुरण्यास मदत होईल. तसेच य़ा सगळ्या गोष्टी एकत्र करुन तुम्ही नंतर वापरण्यासाठीही त्याचा वापर करु शकता. 

चेहऱ्याला हलका मसाज करायला विसरु नका 

चेहऱ्याला हलक्या हाताने शांतपणे सगळ्याठिकाणी मसाज कऱणे आवश्यक आहे. त्यामुळे चेहऱ्यावर आलेला ताण निघून जाण्यास मदत होते आणि नकळत तुमचा चेहरा ग्लो करतो. अनेकदा आपण मसाज करण्यासाठी पार्लरमध्ये जातो आणि त्यानंतर आपल्याला खूप रिलॅक्स वाटते. मात्र आपण दिवसभरात ५ मिनिटे कपाळ, भुवया, नाक, गाल, हनुवटी, मान, कान अशा सर्व भागांना मसाज केल्यास आपण रीलॅक्स होतो. 
 

Web Title: Rice flour and gram flour, these two things will give a nice glow, 4 special remedies for winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.