- सारिका पूरकर-गुजराथी
जी महिला एनजीओ चालवते पण फाटकी जीन्स घालून गुडघे दाखवत फिरते, ती कोणत्या संस्कृतीचा प्रसार करत असेल ? उत्तराखंडच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या या विधानाने खळबळ उडाली. फाटक्या जीन्सची चर्चा रंगली. सोशल मिडियावर चांगलीच गाजतेय ही रिप्ड जीन्स. परंतु, त्या वादात न पडता फॅशनच्या अंगाने पाहिलं तर लक्षात येईल की ही फाटकी जीन्स एका रात्रीत उदयास आलेली नाही किंवा तिची फॅशनही काल परवा आलेली नाहीये. शतकांचा इतिहास जीन्सला व या फाटक्या जीन्सला लाभलेला आहे.
१८७० मध्ये जीन्सचा शोध अमेरिकेतील उद्योजक लोब स्ट्रॉस यांनी लावला होता. मजुरांच्या गणवेशासाठी गडद निळ्या रंगाचे पोशाख त्यांनी जीन्स कापडापासून बनवले होते. त्यानंतर डिस्ट्रेस्ड जीन्सची बहीण म्हणून ओळखली जाणारी रिप्ड जीन्स ७० च्या दशकात प्रचंड लोकप्रिय झाली. या काळात जगभरात प्रस्थापित व्यवस्थेला, या व्यवस्थेने केलेल्या विविध स्तरावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तरुणाई प्रश्न विचारु लागली होती. त्यासाठी पंक रॉक म्युझिक बॅण्डची संकल्पना जोर धरत होती. मुख्यत्वे करुन ब्रिटन, अमेरिकेत क्रांतीकारक गीते गाऊन युवा पिढी व्यवस्थेला भंडावून सोडत होती. या बॅण्डमधील प्रसिद्ध कलाकार रिप्ड जीन्स घालून जणू सांगत होती की आम्हाला वाटेल तेच आम्ही करणार! तरुणाईने बंड पुकारले होते. त्यासाठी त्यांनी ही जीन्स घातली, म्हणून ती रिप्ड जीन्स म्हणूनच प्रचलित झाली. याच काळात स्वत:ला व्यक्त करण्याचा पोषाख म्हणून युवा वर्ग जीन्सच्या प्रेमात पडला. जॅकेट्स, पॅण्ट्स प्रचंड हिट झाल्या. नंतर हळूहळू जीन्स हा सुटसुटीत पण तरीही दिमाखदार पोषाख म्हणून लोकप्रिय झाला.
९० चे दशक उजाडल्यावर मात्र जीन्सचे नवे रुपडे अर्थात रिप्ड जीन्स युवा, वर्गात बहुढंगी, बहुरंगी म्हणून हिट झाली. हॉलिवूड स्टार्स, रॉक बँड स्टार्स रेड कार्पेटवर रिप्ड जीन्समध्ये दिसू लागले.
भारतात सलमानने या जीन्सला हिट केले. त्याच्या ओ ओ जाने जाना या गाण्यात घातलेली रीप्ड जीन्स गाजली होती. सध्या आलिया भट, दीपिका पदुकोन,सोनम कपूर, जाह्नवी कपूर, सानिया मिर्झा, प्रियंका चोप्रा या दिवा देखील रिप्ड जीन्सच्या प्रेमात पडलेल्या दिसताहेत. बाकी तरुण मुलींच्या जगातही या फाटक्या जिन्सची क्रेझ आहेच.
फाटकी जीन्स कशासाठी?
भारतीय संस्कृतीत फाटके कपडे हे दारिद्य्राचे लक्षण मानले जाते. परंतु जीन्सचे फाटके रुप म्हणजेच रिप्ड जीन्स मात्र भन्नाट भाव खाऊन गेले, जातेय. गुडघ्यांवर, गुडघ्याखाली तसेच मांडीवर काही ठिकाणी फाटलेली जीन्स (विविध भागांवर कट देऊन तसे इफेक्ट दिलेली ) म्हणजे आजच्या तरुणाईचा फॅशन मंत्रा बनलाय. आता तर रिप्ड जीन्स घालणं म्हणजे बंडखोरीचे प्रतीक मानले जाऊ लागलीय. स्वत:चा कम्फर्ट, स्वत:ची आवड महत्वाची असं म्हणत रिप्ड जीन्सने फॅशन विश्वात नवा फंडा रुजवलाय. रिप्ड जीन्सचे अनेक डिझाईन्स आता पाहायला मिळू लागले आहेत. पूर्वी फक्त गुडघ्यांपुरतेच फाटलेली वाटेल इतपत आकाराचे कट मर्यादित होते. आता हे कट संपूर्ण पॅण्टवर आढळतात.
कशी वापराल रिप्ड जीन्स
आता सारं जगच रिप्ड जीन्सच्या प्रेमात पडलंय म्हटल्यावर तुम्हालाही मोह होत असेल ट्राय करायचा तर त्यासाठी या टिप्स..
१. रिप्ड जीन्स मुला-मुलींसाठी, दोघांसाठीही फॅशन मंत्रा म्हणून फॉलो होतोय. म्हणून मुलांसाठी रीप्ड जीन्स टी-शर्ट व ब्लेझरच्या कॉम्बिनेशनवर गजब दिसते. ब्लेझर ऐवजी जॅकेटही इनच आहे.
२. नाईट डेट किंवा पार्टीसाठी हा पर्याय झकास ठरतो. कॅज्युअल शर्ट्स म्हणजेच डेनिम शर्ट्स, प्लेन बटन डाऊन शर्ट्स, प्रिंटेड शर्ट्स रीप्ड जीन्सवर कॅरी करुन तुम्ही कूल लूक मिळवू शकता. आणखी कूल लूक हवा असेल तर राऊंड नेकचा ग्रे व्हाईट, काळ्या रंगाचा टी शर्ट घाला फक्त रिप्ड जीन्सवर.
३. वसंत ऋतुची चाहुल लागलीय, या उन्हाळ्यात जीन्सवर बॉम्बर जॅॅकेट घालून जरी मिरवलं तरी मामला जमून जाणार आहे. अनेक पॅटर्न, प्रिंट्स, रंग तुम्हाला ट्राय करता येतील.
४. ऑफिस सोडलं तर रिप्ड जीन्स कोणत्याही प्रसंगासाठी ऑल टाईम हिट ड्रेसकोड ठरलीय. हिवाळ्यातही जीन्सवर ओव्हरकोट, लेदर जॅकेट्स घातले की तुम्ही उठून दिसलेच म्हणून समजा.
५. मुलींसाठी रीप्ड जीन्स कॅरी करण्यासाठीही खूूप चांगले ऑप्शन्स आहेत. कूल लूकसाठी टी शर्ट, ब्लेझर, क्लासिक ओव्हरकोट, बॉम्बर जॅकेट्स यांचे कॉम्बिनेशन करताना रंगसंगती व डिझाईन्सची योग्य निवड केल्यास तुम्ही हटके दिसाल यात शंकाच नाही.
६. ब्लेझर, जॅॅकेट्स निवडताना शक्यतो टी शर्टच्या रंगानुसार निवडावेत. कॅज्युअल लूकसाठी स्टेटमेंट टॉप, शर्टची निवड करु शकता, यासाठी लाईट कट्स असलेली, बॉडी फिट जीन्स निवडा. शिवाय लूझ डाऊन बटन शर्ट्स, प्लेन शर्ट्स, क्रॉप टॉप, बोल्ड रंगसंगतीतील पफ्ड स्लीव्हज टॉप्स, डेनिम शर्ट्स, आकर्षक स्वेटर्स घालून रीप्ड जीन्समधला लूक खुलवता येतो. जोडीला स्निकर्स, शूज, गम बूट्स, साजेशी ज्वेलरी घातली तर मग क्या कहने..
( लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)
queen625@gmail.com