पावसाळ्यात केसांना कसं सुरक्षित ठेवावं हा मोठाच प्रश्न असतो. कधी कामानिमित्तानं बाहेर असताना नाईलाजनं केस ओले होतात तर कधी मुद्दाम ठरवून पावसात भिजलं की केस ओले होतात. पावसाळ्याच्या दिवसात घरात असा किंवा बाहेर दमट वातावरणामुळे केस तेलकट आणि चिपकू चिपकू होतात. केसातला ओलेपणा नीट घालवला नाही तर खाज, कोंडा यासारख्या समस्याही निर्माण होतात. केस मोकळे सोडले तरी मोहक दिसत नाहीत आणि बांधून ठेवले तरी नकोसे वाटतात. या समस्यांवर उपाय म्हणून अनेकजणी शाम्पू- कंडीशनर यांच्यावर भरवसा ठेवून त्यांचा उपयोग करुन पाहतात पण पावसाळ्यातील केसांच्या समस्यांवर मात्र नेमकं उत्तर सापडत नाहीच.पावसाळ्यात केस जपण्यासाठी बाजारातले शाम्पू कंडिशनर कामी येत नाही तर फार पूर्वीपासून सांगून ठेवलेल्या आणि अवलंबलेल्या घरगुती उपायांचाच उपयोग होतो असं स्टार आहार तज्ज्ञ ऋजुता दिवेकर म्हणतात. पावसाळ्यात केसांचं आरोग्य जपण्यासाठी आणि दमट वातावरणातही केस मऊ सुळसुळीत ठेवण्यासाठी ऋजुता दिवेकर यांनी एक तेल सूचवलं आहे. वाळा, तुळस आणि गुंजाचं बी यांचा समावेश असलेलं हे तेल पावसाळ्यातल्या केसांच्या समस्यांवर जुना घरगुती इलाज आहे.समाज माध्यमांवर पावसाळ्यातील केसांच्या समस्यांवर एक पोस्ट लिहून या समस्या सोडवण्यासाठी घरच्या घरी तेल कसं करता येईल त्याची कृतीही त्यांनी या पोस्टमधून सांगितली आहे.
ऋजुता दिवेकर म्हणतात की पावसाळ्यात केसांच्या टोकाच्या समस्या जाणवतात. एकीकडे केस ओलसरही राहातात आणि वाळल्यावर कोरडे शुष्कही वाटतात. केसांचं सौंदर्यही हरवतं आणि केसात कोंडा आणि खाजही येते. या सर्व समस्यांवर एकच उपाय म्हणजे घरगुती तेल. हे तेल तयार करण्यासाठी वाळ्याची मुळं, तुळशीच्या मंजुळा ,गुंजाचं बी , मोहरीचं किंवा खोबर्याचं तेल हवं. हे तेल तयार करण्याची कृतीही अगदीच सोपी आहे. तेलासठी पसरट बुडाची एक काचेची बाटली घ्यावी. त्या बाटलीत वाळ्याची मुळं, एक ते दोन गुंजांचं बी आणि दोन ते तीन काड्या तुळशीच्या मंजुळा टाकाव्यात. बाटलीत खोबर्याचं किंवा मोहरीचं तेल भरावं. बाटलीला घट्ट झाकण लावून ठेवावं. पुढचे 48 तास सर्व साहित्य तेलात मुरायला लागतात. आणि मग या तेलानं केसांचा मसाज करावा. हा मसाज स्वत: करण्यापेक्षा कोणा मैत्रिणीकडून किंवा आई, आजी, सासू, नणंद, जाऊ किंवा भावजय यांच्या हातानं छान गप्पा मारत मारत करुन घ्यावा. आणि आपणही त्यांच्या केसांना हे तेल लावून मसाज करावा. सोबत चहा आणि भजी असली तर या तेल मसाजला एक वेगळीच मजा येईल असं ¬जुता दिवेकर म्हणतात.हे तेल केसांना लावलं की ते रात्रभर तसंच राहू द्यावं. आणि दुसर्या दिवशी सकाळी केस धुवावेत. केसांना कंडीशनर करण्याची गरज नसते.
ऋजुता दिवेकर यांनी सांगितलेलं हे घरगुती तेल म्हणजे पावसाळ्यातल्या केसांच्या समस्यांवर रामबाण उपाय आहे. या तेलातील सर्व घटक हे औषधी गुणांचे आहेत. वाळ्याची मुळं हे जीवाणू विरोधक असतात. वाळ्याच्या वापरानं केस पुर्नज्जीवित होतात. केसांच्या मुळांचा रक्तप्रवाह सुधारतो आणि टाळुला होणारा संसर्गही रोखला जातो. गुंजाच्या बिया हे केस गळती थांबवतात. आणि तुळशीच्या मंजुळाही केस गळतीस रोखतात, केसांच्या मुळांचा रक्तप्रवाह सुधारतात. केसातील कोंडा आणि खाजही तुळशीच्या वापरानं निघून जाते. तुळशीमुळे केसातील आद्रता टिकून रहाते. हे घटक खोबरेल तेल किंवा मोहरीच्या तेलात मुरल्यानं त्यांची गुणवत्ता आणखीनच वाढते. असं हे सोपं तेल पावसाळ्याच्या दिवसात करुन ठेवलं तर पावसाळ्यातल्या केसांच्या समस्येची काळजी तरी मिटेल!