साई पल्लवी जे काही करते त्याची चर्चा होते. तिचा नो मेकअप लूक. तिचे पिंपल्स. अगदी पिंपल्स असतानाही ती शुटिंग करते. एवढंच नाही तर तिच्या कुरळ्या केसांचीही चर्चा होते. तिनं सांगितलं की तिला तिचे केस जसे आहेत तसे आवडतात. फार तर ती त्यांना कोरफड लावते. तिचे लांबसडक, कुरळे केस तिची ओळख बनले आहेत. खरंतर जमाना स्ट्रेटनिंगचा असताना साई पल्लवी आपण आहोत तसे आहोत म्हणून जगाला सामोरी जाते आणि म्हणूनच लोकप्रियही होते. आता जी ती केस सरळ करण्याच्या मागे असताना, इस्त्री केलेले केस नाकारुन आपले कुरळे केस घेऊन साई पल्लवी, कंगना राणावत उभ्या आहेत. त्यांची ओळख आहेत त्यांचे कुरळे केस. सौंदर्याची टिपीकल व्याख्या करणाऱ्या सेलिब्रिटी दुनियेनं त्यांचे केस सुंदर मानले नसले तरी त्या मात्र आपल्या कुरळ्या केसांची ओळख घेऊन आज सिनेजगतावर राज्य करत आहेत.
(Image : Google)
मात्र ही गोष्ट फक्त त्यांचीच आहे का? कुरळे केस एकेकाळी माधुरी दीक्षितचीही ओळख होते. आपले केस कुरळे असावे असं अनेकांना तेव्हा वाटे. मात्र नंतर स्ट्रेटनिंगचा ट्रेण्ड आला. इस्त्री केल्यासारखे केस. जरा हलत नाही. म्हणून मग अनेकजणी केस सरळ करुन घेत सुंदर होण्याच्या पंगतीत जाऊन बसू लागल्या.अजून एका मुलीची गोष्ट अशीच आहे. एक दिवस वाढदिवसाच्या पार्टीला जायचं होतं. पण कुरळ्या केसांचा झाप. तिनं स्ट्रेटनर आणलं, घरीच स्वत:वर प्रयोग केले तर तिचे केसच जळून गेले. आणि मग मात्र तिनं ठरवलं की हे खोटंनाटं काही नको. आपण कुरळे केसच ठेवायचे. चेन्नईच्यादिव्या मदस्वामीची ही २०१४ची गोष्ट. आणि मग तिनं ‘कर्ली इज ब्यूटिफूल’हा उपक्रम सुरु झाला.
(Image : Google)
दिव्यानं स्वत:ही कुरळ्या केसांची काळजी आणखी व्यवस्थित कशी घेता येईल यादृष्टीनं अभ्यास सुरू केला.त्या प्रयोगातील रंजक कहाण्या तिनं आपल्या ब्लॉगवर लिहिल्या. ‘कर्लेशिअस ब्लॉग’ असं त्याचं नाव. हजारो वाचक तिच्या या ब्लॉगला लाभले आहेत. कुरळ्या केसांची निगा, जगभरातील आणि भारतातील उत्पादनांची माहिती, ती वापरावी कशी याची माहिती, कुरळ्या केसांवर प्रेम करून केसात आमूलाग्र बदल केल्याचे फोटो यांचा खजिनाच या ब्लॉगवर सापडतो.२००१ मध्ये ‘कर्ली गर्ल’ या नावानं अशाच स्वरूपाच्या उपक्रमाची सुरुवात लोरियान मॅसे हिनं न्यू यॉर्कमध्ये केली होती. इंग्लंडमध्ये लहानाची मोठी झालेल्या लोरियानला कुरळ्या केसांमुळे सतत अवहेलना सहन करावी लागली होती. कारण तेव्हा अमेरिका असू दे किंवा इंग्लंड महिलांसाठी सरळ केस हा प्रचलित ट्रेण्ड होता. हळूहळू या उपक्रमानं जगभरात चळवळीचं रूप धारण केलं.
(Image : Google)
एकुण काय जगभर महिला आता आपण आहोत तशा स्वत:ला स्वीकारत आहे. बाजारपेठ म्हणाली सरळ केस सुंदर की तसे करा, कुरळे केस सुंदर की तसे करा या भानगडीत न पडता, आपले केस जसे आहे तशी त्यांची निगा राखणं आणि ते सुंदरच आहेत हे मानणं ही या नव्या बदलाची सुरुवात आहे.साई पल्लवी, कंगणा राणावत ही त्याचीच उदाहरणं आहेत.