प्रेमात पडणारे, लव्ह मॅरेज करणारे किंवा अरेंज मॅरेज करणारे असोत आपल्याकडे अजूनही लग्नपूर्व वैद्यकीय काऊन्सिलिंग होत नाही. वयात येणाऱ्या, तरुण मुलांनाही सेक्स किंवा सेक्शुअल हेल्थ यासंदर्भात शास्त्रीय माहिती मिळत नाही. त्यामुळे मग मोबाइलवर तसले व्हिडिओ पाहणं, मित्रमैत्रिणींमधील चर्चा, सेक्शुअल हेल्थबद्दल अर्धवट माहिती, पॉर्न साइट्स पाहणं आणि जोडीदाराकडून तशा अपेक्षा ठेवणं, शरीरसंबंधांची भीती किंवा किळस, आकर्षण आणि एक्सपिरीमेण्ट यामुळे अनेकांदा विवाहपूर्व किंवा नात्याच्या सुरुवातीलाच मानसिक-शारीरिक त्रासांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे लग्नापूर्वी किंवा नंतर लैंगिक संबंध ठेवण्यापूर्वी काही गोष्टी माहिती असायला हव्या. स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. पूजा दिवान यासंदर्भात अधिक माहिती देतात.
लक्षात ठेवावं असं..
१. गर्भनिरोधक साधनं वापरणं आणि ती कशी वापरायची याची माहिती करुन घेणं योग्य. असुरक्षित सेक्समुळे अनेक आजारही होऊ शकतात. मुलींना गर्भधारणाही होऊ शकते. त्यानंतरचा ताण,ॲबार्शन, नात्यातले कलह यामुळे अनेकजणी डिप्रेशनमध्ये जातात. कंडोम न वापरता संबंध ठेवून नंतर आयपील घेणंही धोक्याचं. त्यामुळे हार्मेानल त्रास होऊन फर्टिलिटीवरही परिणाम होऊ शकतो. गर्भनिरोधकं वापरणं उत्तम.
२. पहिल्यांदा सेक्स करत असताना प्रत्येकीलाच वेदना होतात असे नाही. प्रत्येक शरीर वेगळे असते, त्यामुळे त्यावर होणारे परिणामही वेगळे असतात. पहिल्यांदा सेक्स करताना हायमेन तुटल्यास रक्तस्त्राव होऊ शकतो. सगळ्यांच्याच बाबतीत असं होतंच असं नाही. अनेकांना असे वाटते की पहिल्यांदा सेक्स करताना रक्तस्त्राव होणे हे कौमार्याचे लक्षण आहे. मात्र यात काहीही तथ्य नाही.
३. बळजबळीला बळी पडू नका. जोडीदारच्या आग्रहास्तव तुम्ही सेक्स करण्यास बळजबळीने हो म्हणत असाल तर याबाबत विचार करा.ब्लॅकमेलिंगला बळू पडू नका. एकाच वेळी तुमचा जोडीदार अनेकांशी तर संबंध ठेवत नाही ना याची खात्री करा.