उन्हाळ्याच्या दिवसांत आपल्याला प्रमाणाबाहेर घाम येतो. त्यामुळे केस पूर्ण चिपचिपे होऊन जातात. अशात आपल्याला कुठे कार्यक्रमाला किंवा अगदी ऑफीसला जायचे असले तरी केसांचे काय करावे ते कळत नाही. केस चिकट झाल्याने आपल्याला ते मोकळे सोडता येत नाहीत, बांधून ठेवले तर त्याची म्हणावी तशी फॅशन करता येत नाही. भर उन्हाळ्यातही आपले केस छान सिल्की आणि शायनी असावेत असे प्रत्येक महिलेला वाटते. मात्र कधी ते चिकट तर कधी खूप भुरकट होतात (Shampoo Hair Spa Treatment at Home).
अशावेळी केसांचा सिल्कीपणा टिकून राहावा यासाठी काय करता येईल असा प्रश्न आपल्याला पडतो. मग आपण कधी पार्लरमध्ये जाऊन स्मूदनिंग, स्ट्रेटनिंग, रीबाऊंडनिंग यांसारख्या ट्रिटमेंटस घेतो तर कधी घरच्या घरी काही उपाय करुन केस सिल्की होण्यासाठी प्रयत्न करतो. आज आपण असाच एक सोपा उपाय पाहणार आहोत, जो केल्याने आपले केस मस्त सिल्की आणि शायनी होण्यास मदत होते. पाहूयात हा उपाय कोणता आणि तो कसा करायचा...
१. आपण नियमितपणे जो शाम्पू वापरतो तो २ चमचे शाम्पू एका छोट्या बाटलीत घ्यायचा.
२. जितका शाम्पू घेतला आहे तितकाच कोरफडीचा गर यामध्ये घालायचा. शाम्पू जितका घेतला तितकाच कोरफडीचा गर घ्यायचा.
३. यामध्ये चांगल्या प्रतीचे गुलाब पाणी घेऊन त्याच प्रमाणात या बाटलीत घालायचे.
४. हे सगळे मिश्रण हलवून चांगले एकत्र करायचे.
५. आता हे मिश्रण आपण डोक्याला शाम्पू लावतो त्याप्रमाणे सगळीकडे व्यवस्थित लावायचे आणि काही वेळ तसेच ठेवायचे.
६. त्यानंतर नेहमीप्रमाणे केस कोमट पाण्याने धुवायचे.
७. कोरफड आणि गुलाब पाण्यामुळे केस छान सिल्की होण्यास मदत होते.