‘काश्मिर की कली’म्हणजेच ८० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री शर्मिला टागोर म्हणजेच सैफ अली खानची आई आणि करीना कपूरची सासू. भारतीय सिनेमात आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या अभिनेत्री म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. अतिशय बोलके डोळे आणि रेखीव चेहरा या त्यांच्या सौंदर्यातील जमेच्या बाजू. बॉलिवूडमधील असंख्य चित्रपटात नायिका म्हणून काम केलेल्या शर्मिला यांचे सौंदर्य वयाच्या ७९ व्या वर्षीही तसूभरही कमी झालेले नाही. यामागे नेमके काय कारण असावे याबाबत टाइम्स ग्रुपने त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आपल्या सौंदर्याचे रहस्य सांगितले. इतकी वर्ष त्वचा नितळ राहण्यासाठी आणि नैसर्गिक सौंदर्य टिकून राहण्यासाठी त्या काय करतात याबाबत त्यांनी खुलासा केला. त्यातील काही महत्त्वाचे मुद्दे समजून घेऊया (Beauty Secret Of Sharmila Tagore Skin Care Tips)...
१. त्वचा नितळ राहण्यासाठी आपण खूप फॅन्सी काहीही करत नसून पारंपरिक पद्धतींचा अवलंब करत असल्याचे त्या म्हणाल्या. तसंच एका रात्रीत हे शक्य होत नाही तर त्यासाठी नियमितपणे स्कीन केअर रुटीन फॉलो करावे लागते असे त्यांचे म्हणणे आहे.
२. आपण एकत्र कुटुंबात वाढलेलो असल्याने घरातील वरीष्ठ महिलांनी दिलेले सौंदर्याचे सल्ले आपण कायम फॉलो केल्याचे त्या सांगतात. यामध्ये आपण फुलांचा, वनस्पतींचा आणि विविध प्रकारच्या तेलांचा त्या वापर करतात.
३. नर्गिस, कुमकुमादी तेल, नागरमोथा, बदाम तेल, बहुमंजरी तेल आणि चंदन या गोष्टी आपल्या ग्लोईंग त्वचेचे सिक्रेट असल्याचे शर्मिला टागोर यांचे म्हणणे आहे. आपली आजी त्वचा छान राहावी यासाठी चंदन आणि बदाम तेल यांचा आवर्जून वापर करायची. आपली आजी सौंदर्यासाठी घरगुती उपायांचा अवलंब करायची. नंतर आपली आई आणि मग आपण या उपायांचा वापर करु लागलो. त्यानंतर आता आपल्या मुलीही हे उपाय करतात असे त्या सांगतात.
४. त्वचा चांगली राहण्यासाठी पुरेशी शिस्त, संतुलित आहार, चांगले विचार आणि झोपेचे नियमित रुटीन या गोष्टींची अतिशय आवश्यकता असते. या गोष्टी योग्य पद्धतीने फॉलो केल्या तर त्वचा चमकदार राहण्यास मदत होते. तसेच त्वचेसाठी जास्तीत जास्त नैसर्गिक पदार्थांचा वापर करणे केव्हाही जास्त चांगले आणि फायद्याचे असते असेही शर्मिला सांगतात.