फॅशनच्या जगतात सतत नवीन काही ना काही येत असत. एकदा एखादी फॅशन आली की पुढे काही दिवस त्याचा ट्रेंड पाहायला मिळतो. मग अभिनेत्रींपासून कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरुणींपर्यंत ही फॅशन इन राहते. फॅशन डिझायनरने डिझाइन केलेले वेगवेगळ्या प्रकारचे आऊटफिटस तरुणींना भुरळ पाडतात. मागच्या काही दिवसांपासून असाच एक ट्रेंडिमगमध्ये असलेला प्रकार म्हणजे मोनोटोन ड्रेसिंग. प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी हिचे याच आऊटफीटमधले काही फोटो नुकतेच समोर आले आहेत. त्यानिमित्ताने या आऊटफीटची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. श्वेता तिवारीची मुलगी पलक ही नुकतीच ग्रे रंगाचा स्कीने फिट टॉप, त्याच रंगाची जिन्स आणि हाय हिल्समध्ये विमानतळावर दिसली. यामध्ये अभिनेत्री श्वेता तिवारीही तिच्यासोबत होती. तिचा लूकही अतिशय सोबर असल्याचे पाहायला मिळाले. या मायलेकींनी फोटोग्राफर्सना फोटोसाठी छान स्माइलही दिली.
आता या नावावरुनच या ड्रेसिंग प्रकाराचा आपल्याला अंदाज आलाच असेल. एकसारखेच कापड असलेला ड्रेस म्हणजे मोनोटोन ड्रेस. सामान्यपणे आपण जिन्स किंवा पॅंट घातली की त्याच्यावर कॉन्ट्रास्ट होईल असा टॉप घालतो. पण या मोनोटोन प्रकारामध्ये मात्र एकसारख्याच कापडाचा आणि रंगाचा ड्रेस घातला जातो. प्रियांका चोप्रा, दिपिका पदुकोण यांसारख्या अभिनेत्री आपल्याला अनेकदा या अंदाजात दिसतात. यामध्ये साधारणपणे गडद रंगाचे कपडे घालण्याची पद्धत आहे. त्यात एकाच रंगाची पँट, शर्ट आणि कोट किंवा एकाच रंगाचा स्कर्ट आणि टॉप घातला जातो. काही वेळा हा मोनोटोन ड्रेसिंग प्रकार वेस्टर्न कपड्यांमध्ये प्रामुख्याने वापरला जात असल्याने याची फॅशनही त्याच प्रकारची असल्याचे पाहायला मिळते.
तुम्हाला मॅचिंग कपडे शोधत बसायला कंटाळा येत असेल किंवा त्यात तुमचा खूप वेळ जात असेल तर तुम्ही या आगळ्यावेगळ्या फॅशनचा तुमच्या ड्रेसिंगमध्ये नक्कीच समावेश करु शकता. त्यामुळे घाईच्या वेळी तुम्ही अशाप्रकारची फॅशन करु शकता. यावर दागिन्यांची निवड करणेही सोपे जात असल्याने त्यातही तुमचा फारसा वेळ जात नाही. अशाप्रकारचे कपडे काही औपचारिक कार्यक्रमात घातले जातात. याबरोबरच कॅज्युअल वेअर म्हणूनही तुम्ही या कपड्यांचा वापर करु शकता. या कपड्यात तुमची वेगळी छाप पडते हे नक्की. मात्र यामध्ये कार्यक्रमानुसार तुम्हाला कपड्याचा रंग ठरवावा लागतो. इतर रंगांबरोबरच याप्रकारच्या कपड्यांमध्ये काळा आणि पांढरा हे रंगही अतिशय उठून दिसतात.
फॅशनच्या रॅम्पवरही अशाप्रकारच्या ड्रेसिंगला डिझायनर आणि मॉडेलकडून पसंती मिळताना दिसते. वरच्या आणि खालच्या दोन्ही कपड्यांचे रंग एकसारखेच असलेल्या या फॅशनला सुरुवातीला फारशी पसंती मिळत नसली तरी आता मात्र ही फॅशन ट्रेंडमध्ये आहे. यामध्ये पारंपरिक कपडेही हल्ली वापरले जातात. एकाच प्रकारच्या कापडाची सलवार, कुर्ता आणि दुपट्टा यामध्ये येतो. करीना कपूर, प्रियांका चोप्रा, दिपिका पदुकोण, कैतरीना कैफ यांसारख्या बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अशाप्रकारचा मोनोटोन लूक कायम करतात आणि आपल्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात.