डोळ्यांना काजळ लावल्याने डोळे आकर्षक व सुंदर दिसून डोळ्यांच्या सौंदर्यात अधिक भर पडते. डोळ्यांचे सौंदर्य खुलून यावे म्हणून आपण त्यांना वेगवेगळ्या प्रकारची सौंदर्य प्रसाधन लावतो. काजळ, आयशॅडो, आय लायनर यांसारख्या सौंदर्य प्रसाधनांचा आपण रोज वापर करत असतो. आजच्या काळात मुलींसाठी काजळ लावणे हे एक फॅशन स्टेटमेंट बनले आहे. डोळे सुंदर दिसावेत म्हणून काजळ अनेकजणी हमखास लावतात. सध्या बाजारांत आपल्याला काजळाचे अनेक प्रकार अगदी सहजपणे विकत मिळतात. यात वॉटरप्रूफ, २४ तास डोळ्यांवर टिकून राहणारे, न पसरणारे असे असंख्य नवनवीन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात(Side effects of wearing Kajal all day).
काजळ लावल्यानंतर डोळे मोठे आणि अधिक सुंदर दिसतात हे खरंय पण डोळ्यांना सतत चुकीच्या पद्धतीने काजळ लावणं डोळ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरु शकते. सध्या बाजारांत मिळणाऱ्या अनेक काजळांमध्ये अशी काही हानिकारक रसायन असतात, की ज्यामुळे डोळ्यांना ऍलर्जी होते, डोळे रूक्ष पडतात. एवढेच नव्हे तर डोळ्यांना सतत काजळ लावल्याने डोळ्यांचे आरोग्य तर बिघडतेच यासोबतच डोळ्यांच्या आजूबाजूच्या त्वचेवर देखील याचा परिणाम होऊ शकतो. नवी दिल्लीतील पुष्पावती सिंघानिया हॉस्पिटलच्या ऑप्थेमेलॉजिस्ट डॉ. वंदना खुल्लर यांनी याबाबतीत अधिक माहिती दिली आहे(Dose Wearing Kajal For Long Hours Harm Your Eyes).
१. दिवसभर डोळ्यांना काजळ लावून ठेवल्याने नेमके कोणते नुकसान होते ?
डॉ. वंदना खुल्लर सांगतात की, साधारणपणे दिवसभर डोळ्यांना काजळ लावून ठेवण्यास काहीच हरकत नाही. खरं तर तुम्ही काजळ कोणत्या पद्धतीने डोळ्यांवर लावत आहात हे खूप महत्वाचे आहे. काजळ लावल्याने आपल्या डोळ्यांच्या आरोग्याचे किती नुकसान होते हे आपल्या काजळ लावण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. काजळ डोळ्यांच्या जलरेषेच्या आत गेल्यास डोळ्यांमध्ये जळजळ किंवा संसर्ग होऊ शकतो. यामुळे कॉर्नियल अल्सर देखील होऊ शकतो. कॉर्नियल अल्सर हा एक प्रकारचा डोळ्यांना जखमा होण्याचा आजार आहे जो डोळ्यांच्या कॉर्नियावर होतो. याशिवाय काजळ जास्त वेळ लावल्याने पापण्यांवर सूज येऊ शकते म्हणजेच ब्लेफेरायटिस किंवा डोळ्यांखाली काळी वर्तुळे येऊ शकतात.
हेअर रिमूव्हलसाठी वॅक्सिंगचे चटके कशाला सहन करता ? नैसर्गिक पदार्थ वापरुन नको असलेले केस काढा सहज...
२. काजळ खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ?
- नेहमी चांगल्या ब्रँडचे काजळ वापरावे.
- काजळ बनवण्यासाठी वापरले जाणारे घटक आणि त्याची एक्सपायरी डेट तपासून मगच काजळ विकत घ्यावे.
- काजळ विकत घेण्यापूर्वी ते आपल्या डोळ्यांना लावून सूट होते की नाही ते एकदा तपासून पाहावे.
- नॅचरल ऑईल असणाऱ्याच काजळ पेन्सिलचा वापर करावा.
३. काजळ लावताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ?
काजळ लावताना हात नेहमी स्वच्छ ठेवा. घाणेरड्या हातांनी काजळ लावल्याने डोळ्यांमध्ये बॅक्टेरियाचा संसर्ग होऊ शकतो.
डोळ्यांच्या जलरेषेत काजळ लावणे टाळा कारण त्यामुळे डोळ्यांना कोरडेपणा किंवा जळजळ होऊ शकते. त्याऐवजी काजळ फक्त पापण्यांच्या बाहेरील भागावर लावा. याशिवाय डोळ्यांचे मेकअप प्रॉडक्ट्स कोणाशीही शेअर करु नये.
दिवसभर कपड्यांवर गळालेले केस पाहून दु:खहोतं? ‘हे’ खास तेल लावा, केस गळणारच नाहीत...
४. रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांचे काजळ का काढावे ?
बहुतेकजणी रात्री झोपण्यापूर्वी मेकअप न काढता तसेच झोपून जातात. परंतु जोपर्यंत तुम्ही तुमचा मेकअप काढत नाही तोपर्यंत झोपू नका, विशेषतः डोळ्यांचे काजळ काढल्याशिवाय झोपू नका, अन्यथा डोळ्यांना इजा होऊन डोळ्यांच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. काजळ रात्रभर डोळ्यांवर तसेच राहिले तर ते सुकते आणि डोळ्यांवर चिकटते. यामुळे डोळ्यांच्या आजूबाजूच्या संवेदनशील त्वचेचे नुकसान होते. तुम्ही झोपेत असताना मस्करा, काजळ किंवा आयलायनर तुमच्या डोळ्यात येऊन उतरु शकते. यामुळे डोळे कोरडे पडणे, इन्फेक्शन आणि डोळ्यांखालील त्वचा काळी पडणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. याशिवाय, डोळ्यांचे प्रॉडक्ट्स रात्रभर डोळ्यांवर ठेवल्याने पापण्यांच्या केसांच्या छिद्रांमध्ये जाऊन अडकतात आणि पापण्यांभोवती असलेल्या तेल ग्रंथींना अडथळा निर्माण होतो. त्यामुळे पापण्या कमकुवत होऊन पापण्यांवरचे केस पडू लागतात. याला Ptosis असे म्हणतात. झोपताना काजळ किंवा आयलायनर उशीवर घासल्यास डोळ्यांत शिरल्यास डोळ्यांमध्ये जळजळ होऊ शकते किंवा डोळ्यांच्या कॉर्नियाला इजा होऊ शकते. त्यामुळे काजळ किंवा आयलायनर लावून कधीही झोपू नये.