बाहेर जाताना, ऑफीसला जाताना किंवा एखाद्या कार्यक्रमाला जाताना आवरायचं म्हटलं की सगळ्यात आधी आपल्याला आठवतं ते काजळ आणि लिपस्टीक लावतो. या दोनच गोष्टी योग्य पद्धतीने लावल्या आणि बाकी काहीच लावलं नाही तरी नकळत चेहरा उठावदार दिसतो. डोळे छान टपोरे दिसावेत म्हणून आपण निघताना पटकन डोळ्यांच्या कडांवर काजळ पेन्सिल फिरवतो आणि घाईघाईत निघतोही. पण आपल्याला छान लूक देणारे हे काजळ सुरुवातीला काही वेळ छान राहते आणि नंतर ते डोळ्यांखाली उतरायला लागते (Simple Makeup Tips for Applying Perfect smudge Free kajal).
यामुळे नकळत आपल्या डोळ्याखाली खूप काळं होतं. अगदी कोणत्याही कंपनीचे कितीही महागाचे काजळ लावले तरी थोड्या वेळानी ते पसरल्याने आपल्या चेहऱ्याची पार रया होऊन जाते. उन्हाळ्याच्या दिवसांत तर घाम येत असल्याने चेहरा नेहमीपेक्षा लवकर काळवंडतो. अशावेळी आपण आवरलेले दिसण्याऐवजी जास्त अवतारात आहोत असे दिसते. म्हणूनच काजळ पसरु नये म्हणून लक्षात घ्यायला हव्यात अशा ३ महत्त्वाच्या टिप्स आज आपण पाहणार आहोत.
१. डोळ्यांखाली कन्सिलर लावा
डोळ्यांच्या खाली काजळ पसरु नये यासाठी पावडर लावण्याचा सल्ला बरेचदा दिला जातो. पण त्यापेक्षा कन्सिलर लावणे जास्त फायद्याचे ठरते. यासाठी काजळ लावण्याआधीच बोटावर थोडं कन्सिलर आणि लूज पावडर एकत्र करुन ते डोळ्यांच्या खाली एकसारखं लावावं. बोटाने लावल्यानंतर ब्यूटी ब्लेंडरच्या मदतीने हे चांगले ब्लेंड करुन घ्यावे. पुन्हा थोडी पावडर घेऊन त्याने सेट करा. मग वॉटर लाईनवर हलक्या हाताने काजळ लावा.
२. काजळ निवडताना
काजळाची निवड करताना ते शक्यतो चांगल्या ब्रँडचे असेल याची काळजी घ्यावी. याबरोबरच काजळ पसरु नये म्हणून बारीक टोक असलेली काजळ पेन्सिल वापरावी. जाड टोक असेल तर ते पसरण्याची शक्यता जास्त असते.
३. डोळ्यांचा फायनल टच करताना
काजळ लावताना ते काही वेळा पापण्यांवर लागते. त्यानंतर डोळ्यांची उघडझाप झाल्यावर पापण्यांना लागलेले हे काजळ सगळीकडे पसरते. असे होऊ नये यासाठी काजळ लावताना टिश्यू पेपर किंवा कापसाचा वापर करु शकतो. असे केल्याने काजळ पापण्यांना किंवा इतर कुठेही लागणार नाही.