चेहेर्यावर मुरुम पुटकुळ्या येण्याची अनेक कारणं असतात. पण सर्वात महत्त्वाचं असतं की त्यावर उपाय काय करायचा? मुरुम पुटकुळ्या या किचकट समस्या. कितीही उपाय केलेत तरी पटकन जात नाही. आणि गेल्या तरी पुन्हा येतातच. मुरुम पुटकुळ्या येण्यासाठी अनेक कारणं जबाबदार असतात. हार्मोन्समधील असंतुलन, त्वचेवरील खुली रंध्र, त्वचा नीट स्वच्छ न करणं, अतिरिक्त तणाव, खाणं-पिणं नीट नसणं या अनेक कारणांमुळे मुरुम पुटकुळ्या सतत येतात. या किचकट समस्येसाठी उपाय आपल्या अंगणात किंवा फ्लॅटमधील आपल्या गॅलरीत असतो. तुळसं प्रत्येकाच्या बागेत असतेच आणि नसली तरी ती जवळपास सहज उपलब्धही होते.
तुळशीमधे अँण्टिऑक्सिडण्टस भरपूर प्रमाणात असतात. तसेच तुळशीत असलेले इतर औषधी घटक हे त्वचेसाठी खूप उपयुक्त असतात. चेहेर्यावरील मुरुम पुटकुळ्या घालवण्यासाठी, काळे डाग घालवण्यासाठी तुळस ही खूप उपयुक्त ठरते. काही दिवसातच तुळशीच्या उपचाराचे परिणाम दिसून येतात.
छायाचित्र:- गुगल
तुळशीचा लेप
चेहेर्यासाठी तुळस वापरताना 20-25 तुळशीची पानं, एक चमचा संत्रीच्या सालाची पावडर, एक चमचा चंदन पावडर आणि गुलाबपाणी घ्यावं.सर्वात आधी तुळशीची पानं वाटून त्याची पेस्ट तयार करुन घ्यावी. तुळशीची पानं वाटताना त्यात थोडं गुलाबपाणी घालावं. ही पेस्ट एका वाटीत काढावी. त्यात एक चमचा संत्र्याच्या सालाची पावडर , एक चमचा चंदन पावडर घालावी. यात गुलाबपाणी घालून लेप तयार करावा. तो चेहेर्यावर लावण्याआधी चेहेरा धुवून पुसून घ्यावा. त्यावर तुळशीचा लेप लावावा. तो पंधरा वीस मिनिटं राहू द्यावा. सुकला की पाण्यानं चेहेरा स्वच्छ धुवावा. चेहेर्यावर मुरुम पुटकुळ्यांनी डाग पडलेले असतील तर हे डाग घालवण्याचं कामही हा लेप करतो. तसेच त्वचा जर कोरडी असेल तर या लेपात एक चमचा मधही घालावं. मधामुळे तुळशीच्या लेपातील औषधी गुणधर्म वाढतात आणि ते त्वचेवरील समस्या बर्या करण्यासाठी प्रभावी काम करतात.मधामुळे त्वचेला ओलावा मिळतो. त्वचा मऊ होण्यास मदत होते.
छायाचित्र:- गुगल
तुळशीचा लेप हा मुरुम पुटकुळ्यांसाठी परिणामकारक असतो. त्वचेवरील रंध्रात धूळ, मृत पेशी , तेल आणि घाम जमा होवून त्यात किटाणू तयार होतात. हे किटाणू मुरुम पुटकुळ्यांना कारणीभूत ठरतात. त्यामुळे त्वचा स्वच्छ होणं आवश्यक आहे. तुळशीमधे असणारे जीवाणूविरोधी घटक यावर परिणामकारक ठरतात. हे घटक त्वचेत खोलवर जाऊन त्वचेची रंध्र स्वच्छ करतात तसेच त्वचेच्या पेशींना बरे करतात.