Join us  

चेहऱ्याचा ग्लो वाढवायचा तर दुधाचा असा करा वापर; त्वचा उजळेल-दिसाल सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2023 5:07 PM

Skin Care Beauty Tips Home Remedies : नैसर्गिक गोष्टींचा वापर करुन घरच्या घरी सहज करता येतील असे उपाय..

आपला चेहरा कायम ग्लोईंग आणि सुंदर दिसावा असं प्रत्येकीला वाटतं. मात्र काही ना काही कारणाने त्वचेच्या तक्रारी उद्भवतात आणि चेहरा खराब दिसायला लागतो. पण आपण प्रेझेंटेबल असावं यासाठी मग आपण एकतर मेकअप करुन चेहऱ्यावरच्या गोष्टी झाकायचा प्रयत्न करतो किंवा काही वेळा चक्क पार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रिटमेंटस घेतो. मात्र हे केलिकल प्रॉडक्ट आणि विवध प्रकारच्या ट्रिटमेंटस यामुळे त्वचा खराब व्हायची शक्यता असते. त्यामुळे नैसर्गिक घटक वापरुन केलेले उपाय केव्हाही फायदेशीर ठरतात (Skin Care Beauty Tips Home Remedies). 

दूधात प्रोटीन, कॅल्शियम असल्याने आरोग्यासाठी ते अतिशय फायदेशीर असते हे आपल्याला माहित आहे. पण सौंदर्यासाठीही दुधाचा अतिशय चांगला उपयोग होतो याबाबत मात्र आपल्याला माहिती असतेच असे नाही. बाजारात मिळणाऱ्या ब्युटी प्रॉडक्टमध्ये मलाईचा, दुधाचा वापर केल्याचे म्हटलेले असते. पण त्यापेक्षा नैसर्गिक अशा दुधाचा वापर चेहऱ्याच्या त्वचेसाठी केव्हाही उपयुक्त ठरतो. बरेचदा धूळ, प्रदूषण, सूर्यप्रकाश यांमुळे त्वचा रुक्ष आणि बेजान होते. अशावेळी चेहऱ्याच्या त्वचेसाठी दुधाचा वापर केल्यास त्वचेचा ग्लो पुन्हा येण्यास मदत होते. 

(Image : Google)

१. दूध हळद 

एका वाटीत २ ते ३ चमचे दूध घ्यावे, त्यामध्ये चिमूटभर हळद घालावी. हे दोन्ही एकत्र करुन कापसाच्या बोळ्याने ते चेहऱ्यावर लावावे. वाळल्यानंतर चेहरा पाण्याने धुवावा. यामुळे चेहऱ्याचा कोरडेपणा, निस्तेजपणा कमी होऊन चेहरा उजळण्यास मदत होईल. 

२. हळद - दूध फेसपॅक

चेहऱ्याची गेलेली चमक परत आणण्यासाठी हळद आणि दूध यांचा फेसपॅक उपयुक्त ठरतो. त्वचेवरील घाण निघून जाण्यासाठी आणि चेहऱ्यावरील विषारी कण निघून जाण्यासाठी हा पॅक फायदेशीर ठरतो. यासाठी एका वाटीत १ चमचा चंदन पावडर किंवा मुलतानी माती घ्यायची. त्यामध्ये २-३ चमचे दूध आणि चिमूटभर हळद घालून सगळे चांगले एकजीव करावे. त्यानंतर साधारणपणे २० मिनीटांनी चेहरा साध्या पाण्याने धुवावा. चेहऱ्यावर एकप्रकारचा छान ग्लो येण्यास मदत होते. 

(Image : Google)

३. असा तयार करा स्क्रब

वाटीत १ चमचा ओटमील पावडर घेऊन त्यामध्ये आवश्यकतेनुसार दूध आणि १ चिमूट हळद घालावी. हे मिश्रण फुगून वर येते ते स्क्रबसारखे चेहऱ्यावर वापरावे. त्यानंतर मसाज करुन ५ ते १० मिनीटांनी चेहरा धुवून टाकायचा. यानंतर आठवणीने मॉईश्चरायजर लावायला हवे.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी