Join us  

तुम्हालाही कपाळावर सतत बारीक पुरळ येते का? 4 सोपे उपाय, पुरळ होईल कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2022 12:12 PM

Skin Care Home Remedies for forehead Bumps : पुरळांमुळे चेहऱ्याला मेकअपही नीट करता येत नाही आणि आपण अस्वच्छ दिसायला लागतो.

ठळक मुद्देआठवड्यातून एकदा चेहरा एक्सफॉलिएट केल्यास त्याचा चांगला फायदा होतो.  सौंदर्यासाठी घरच्या घरी करता येतील असे सोपे उपाय करणे केव्हाही फायदेशीर

चेहऱ्यावर पुरळ येणं ही समस्या सामान्य आहे. त्यामागे अनेक कारणं असल्याचं आपण अनेकदा ऐकतो. पण याबरोबरच अनेकांना फक्त कपाळावर पुरळ येण्याची समस्या असते. कपाळावर बारीक पुरळ आल्याने चेहऱ्याचे सौंदर्य तर बिघडतेच पण हे पुरळ बराच काळ तसेच राहत असल्याने त्याचे काय करावे असा प्रश्नही आपल्यापैकी अनेकांना पडतो. कधी पोट साफ नसल्याने, कधी डोक्यात कोंडा असल्याने तर कधी त्वचा खूप तेलकट असल्याने कपाळावर हे पुरळ दिसतात. कधी हे ब्लॅक हेडसच्या स्वरुपात असतात तर कधी व्हाईट हेडसच्या स्वरुपात. या पुरळांमुळे चेहऱ्याला मेकअपही नीट करता येत नाही आणि आपण अस्वच्छ दिसायला लागतो. आता हे फोड घालवण्यासाठी घरच्या घरी करता येतील असे उपाय कोणते ते पाहूया (Skin Care Home Remedies for forehead Bumps). 

(Image : Google)

१. कोरफड तेल 

कोरफडीला सौंदर्याच्या बाबतीत विशेष महत्त्व आहे. त्वचा, केस यांच्या बऱ्याच समस्यांवर कोरफडीचा गर अतिशय रामबाण उपाय ठरतो. त्याचप्रमाणे कपाळावर येणाऱ्या फोडांसाठीही कोरफड उपयुक्त ठरते. कपाळावर आलेल्या फोडांवर काही दिवस नियमितपणे कोरफडीचे तेल लावल्यास हे फोड कमी होण्यास मदत होते. 

२. लिंबाचा रस

लिंबू हा आपल्या घरात सहज उपलब्ध असणारा पदार्थ आहे. लिंबामध्ये सायट्री अॅसिड आणि सी व्हिटॅमिन असते. याचा कपाळावरील फोड कमी होण्यासाठी चांगला उपयोग होऊ शकतो. लिंबाचा रस या फोडांवर लावल्यानंतर काही वेळ थोडी आग होण्याची शक्यता असते. मात्र ५ मिनीटांनी कपाळ धुवून टाकावे. यामुळे फोडांची संख्या कमी होण्यास नक्कीच मदत होईल. 

३. घरगुती पॅक 

बेसनाचे पीठ, बदामाची पावडर सारख्या प्रमाणात घेऊन त्यामध्ये चिमुटभर हळद आणि पाणी घालून पेस्ट तयार करावी. हा पॅक कपाळावर सगळीकडे एकसारखा लावावा, साधारणपणे १५ मिनीटांनंतर हा पॅक धुवून टाकावा. यामुळे कपाळावरचे पुरळ कमी होण्यास नक्कीच मदत होईल. 

(Image : Google)

४. स्क्रबिंग 

चेहऱ्याला स्क्रबिंग करणे हा कपाळ आणि चेहऱ्यावरचे पुरळ कमी करण्याचा आणखी एक सोपा उपाय आहे. यामध्ये आपण घरात सहज उपलब्ध असणारे कॉफी आणि मधाचे स्क्रब, मसूर पावडर आणि दुध यांचे नैसर्गिक स्क्रब यांचा वापर करु शकतो. आठवड्यातून एकदा चेहरा एक्सफॉलिएट केल्यास त्याचा चांगला फायदा होतो.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी