आपल्यापैकी अनेकांना त्वचेच्या काही ना काही समस्या असतातच. या समस्यांमुळे आपल्या सौंदर्यात बाधा येते. कधी चेहऱ्यावर येणारे पिंपल्स तर कधी डाग यांमुळे आपम हैराण असतो. तर कधी चेहऱ्यावर सुरकुत्या वाढल्याने आपण अकाली प्रौढ दिसायला लागतो. अशा काही ना काही समस्या असतील की काय करायचे असा प्रश्न आपल्याला पडतो आणि मग आपण पार्लरमधील महागड्या ट्रीटमेंटस घ्यायला लागतो. काहीवेळा हे सगळे झाकण्यासाठी आपण मेकअपचाही पर्याय स्वीकारतो. पण अशावेळी घरच्या घरी काही सोपे उपाय केल्यास त्याचा नक्कीच चांगला उपयोग होऊ शकतो. आपल्या सगळ्यांच्या घरात असणारा फ्रिज आणि त्यामध्ये असलेला बर्फ त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतो. आठवड्यातून ४ वेळा किमान २ मिनीटांसाठी चेहऱ्याला बर्फ लावल्यास चेहरा उजळण्यास मदत होते. पाहूयात कोणकोणत्या समस्यांसाठी बर्फाचा कसा उपयोग होतो (Skin Care Home Remedy Using Ice Is Beneficial for Skin Problems)...
१. डार्क सर्कल
आपल्याला अनेकदा काही ना काही कारणाने डार्क सर्कल्स येतात. यामुळे आपला चेहरा खराब दिसतो. मग त्यावर मेकअप करुन ते झाकण्यापेक्षा ही समस्या मूळापासून दूर करणे जास्त महत्त्वाचे असते. आपल्या डोळ्यांचा खालचा भाग जास्त नाजूक असतो. यावर काही दिवस नियमितपणे बर्फ फिरवल्यास ही समस्या काही दिवसांत कमी होण्याची शक्यता असते.
२. पिंपल्स
पिंपल्स येण्यामागे अनेक कारणे असली तरी पिंपल्समुळे चेहरा खराब दिसायला लागतो. काही वेळा या पिंपल्सला खाज येणे, त्याठिकाणी डाग पडणे, पिंपल्स फुटणे अशाही समस्या निर्माण होतात. या पिंपल्सवर बर्फ लावल्यास ही समस्या काही दिवसांत दूर होण्यास मदत होते.
३. सन बर्न
अनेकदा आपण घाईघाईत स्कार्फ न बांधता किंवा चेहऱ्याला सनस्क्रीन लोशन न लावता बाहेर पडतो. पण त्यामुळे चेहऱ्याची त्वचा बर्न होण्याची शक्यता असते. अशावेळी चेहऱ्याला बर्फ लावणे हा उत्तम उपाय आहे. तसेच काहीवेळा आपल्या चेहऱ्यावर सूज येते ती घालवण्यासाठीही बर्फाचा चांगला उपयोग होतो.