थंडी म्हटली की खाण्यापिण्याची चंगळ आणि छान स्वच्छ हवा. असे असले तरी या ऋतूमध्येही आरोग्याच्या काही ना काही समस्या भेडसावतातच. सगळ्यात महत्त्वाची समस्या म्हणजे त्वचेचा कोरडेपणा. थंडीमुळे त्वचा अतिशय कोरडी आणि रुक्ष होऊन जाते. अशावेळी आपण बाजारात मिळणारे वेगवेगळ्या कंपन्यांचे बॉडी लोशन किंवा मॉइश्चराजयर वापरुन त्वचा चांगली ठेवायचा प्रयत्न करतो. पण त्याचा म्हणावा तसा उपयोग होतोच असे नाही. अनेकदा या मॉईश्चरायजरमुळे त्वचा तात्पुरती चमकदार दिसते पण त्यानंतर ती आहे त्याहून जास्त कोरडी दिसायला लागते. तसेच या मॉईश्चरायजरमुळे चेहऱ्यावर धूळ बसते आणि आपण नेहमीपेक्षा काळपट दिसतो (Skin Care in Winter Season Use of Desi Ghee).
अशावेळी घरच्या घरी करता येतील असे सोपे उपाय आपल्याला माहित असतील तर सगळ्यात चांगले नाही का. पाहूया घरच्या घरी सहज करता येईल असा एक सोपा उपाय. ज्यामुळे तुमची त्वचा बराच काळ चांगली राहण्यास मदत होईल. तूप हा आपल्या सगळ्यांच्या घरात सहज उपलब्ध असणारा पदार्थ आहे. आपण अनेक पदार्थांवर आवडीने तूप घेऊन खातो किंवा काही पदार्थ तर आपण खास तुपातच बनवतो. तूप शरीरासाठी वंगणासारखे काम करते आणि आरोग्यासाठी तूप अतिशय उपयुक्त असते हे आपल्याला माहित आहे. पण केवळ आरोग्यासाठीच नाही तर सौंदर्यासाठीही हे तूप फायदेशीर ठरते. आता हे तूप चेहऱ्यासाठी कोणकोणत्या स्वरुपात आणि कशाप्रकारे फायदेशीर ठरते ते पाहूया...
१. थंडीच्या दिवसांत रुक्षपणामुळे चेहऱ्यावर येणारे डाग दूर करण्यासाठी तूपाचा अतिशय चांगला फायदा होतो. नियमितपणे चेहऱ्याला तूपाने मसाज केल्यास काही दिवसांत हा फरक नक्की दिसून येतो. तसेच त्वचेचे पोषण होण्यासाठीही याचा अतिशय चांगला फायदा होतो.
२. काही वेळा आपल्याला स्कीन इन्फेक्शन होते. त्यामुळे चेहऱ्यावर डाग येणे, फोड येणे किंवा आणखी काही ना काही समस्या उद्भवतात. अशावेळी लोण्यापासून कढवलेले तूप चेहऱ्याला लावल्यास ही स्कीन इन्फेक्शन्स दूर होण्यास मदत होते. काही कारणाने चेहऱ्याला खाज येत असेल तर खाज कमी होण्यासही याचा चांगला उपयोग होतो.
३. त्वचा एकसारखी आणि चमकदार दिसावी असे प्रत्येकीला वाटते. पण काही ना काही कारणाने चेहरा कोरडा पडणे किंवा फोड येणे असे काहीतरी होते आणि आपल्या सौंदर्यात बाधा येते. मात्र रोज रात्री झोपताना चेहऱ्याला तूपाने मसाज केल्यास त्वचा नितळ राहण्यास मदत होते.