आपला चेहरा नितळ, चमकदार असावा असं कोणाला नाही वाटत. मग त्यासाठी वेगवेगळी ब्यूटी प्रॉडक्ट वापरण्यापासून ते घरगुती उपाय करण्यापर्यंतच्या अनेक गोष्टी आपण करतो. एरवी तर आपल्याला चेहरा छान हवाच असतो पण लग्नसराईच्या काळात वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थिती लावण्यासाठी आपली स्कीन ग्लोईंग असावी असे आपल्यातील प्रत्येकालाच वाटते. असे असतानाच आपल्या चेहऱ्याची त्वचा कधी खूप कोरडी पडते तर कधी त्यावर पिंपल्स यायला सुरुवात होते. मात्र स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असणाऱ्या एका गोष्टीचा वापर करुन आपण चेहऱ्याचे गेलेले सौंदर्य पुन्हा मिळवू शकतो.
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटू शकते पण चेहऱ्याला पोषण देण्याबरोबरच या पदार्थांच्या वापराने चेहरा स्क्रबही केला जाऊ शकतो. त्यामुळे चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारची चमक येईल आणि कोणताही खर्च न करता किंवा रासायनिक पदार्थ न वापरता आपले सौंदर्य कायम राहण्यास मदत होईल. तर हा पदार्थ म्हणजे आपल्या घरात सहज उपलब्ध असणारी बेकींग सोडा. मात्र हा पदार्थ वापरताना त्याबाबतची योग्य ती माहिती घेऊनच वापरायला हवा. नाहीतर त्वचा खराब होण्याचीही शक्यता असते. आता बेकींग सोडा वापरायचा हे ठिक आहे, पण तो कधी, कसा आणि कोणत्या प्रकारे चेहऱ्यासाठी वापरायचा याबद्दलची माहिती घेणे आवश्यक आहे.
कृती
१. एका बाऊलमध्ये १ ते २ चमचे बेकींग सोडा घ्या.
२. त्यामध्ये पाणी घालून छानशी पेस्ट बनवा .
३. ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर ज्याठिकाणी काळे डाग आहेत तिथे लावा.
४. हा मास्क आपल्या चेहऱ्याला पूर्णपणे मास्कप्रमाणे लावू नका.
५. काळ्या डागांवर १० मिनीटे ही पेस्ट तशीच ठेवून नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.
६. आठवड्यातून एकदा तुम्ही आपला चेहरा उजळण्यासाठी हा उपाय करु शकता.
बेकींग सोडा चेहऱ्याला लावण्याचे फायदे
१. बेकींग सोड्यामध्ये अँटी इन्फ्लमेटरी घटक असल्याने त्वचेला होणारे इरिटेशन, रॅशेस आणि सूज कमी करण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. यामुळे चेहऱ्याचा कोरडेपणा कमी होण्यास मदत होते.
२. सोड्यामुळे चेहऱ्याचे एक्सफॉलिएशन होत असल्याने त्वचेची रंध्रे मोकळी होण्यासाठी सोड्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. त्यामुळे ब्लॅकडेडस आणि व्हाईटहेडसची समस्या दूर होण्यास मदत होते. तसेच यामुळे पिंपल्सची समस्याही दूर होते.
३. त्वचेतील मॉइश्चर टिकवून ठेवण्यासाठी आणि बॅक्टेरीया किंवा प्रदूषणापासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी सोडा उपयुक्त ठरतो.
४. तुमची त्वचा ऑयली असेल तर तुमच्यासाठी बेकींग सोडा अतिशय उपयुक्त ठरतो. पण तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्हाला बेकींग सोड्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे स्कीन एक्सपर्टच्या सल्ल्याने उपाय करणे केव्हाही फायदेशीर ठरते. तसेच बेकींग सोडा कमी प्रमाणात वापरणे ठिक आहे, तो जास्त वापरला तर त्वचेला त्याचा त्रास होण्याची शक्यता असते.