आपली त्वचा कायम तजेलदार आणि मुलायम असावी असं प्रत्येक महिलेला वाटतं. चित्रपटातील अभिनेत्रींप्रमाणे नितळ आणि सुंदर त्वचा असावी अशी आपली इच्छा असते. पण कधी चेहऱ्यावर खूप फोड येतात तर कधी डाग. काही वेळा कमी वयातच चेहरा सुरकुततो तर कधी त्वचा खूप रुक्ष होते. अशावेळी त्वचेची काळजी नेमकी कशी घ्यायची आणि कोणत्या गोष्टी नियमितपणे केल्यास त्वचा चांगली राहण्यास मदत होईल हे समजून घ्यायला हवे. प्रसिद्ध सौंदर्य तज्ज्ञ शहनाज हुसैन यांनी ‘हर जिंदगी’ ला दिलेल्या मुलाखतीत या खास टिप्स सांगितल्या आहेत. या टिप्सचा योग्य पद्धतीने वापर केल्यास महागडी ब्यूटी प्रॉडक्ट वापरायची आणि सतत पार्लरमध्ये जायची आवश्यकता राहणार नाही. पाहूयात त्वचा कायम नितळ-मुलायम राहण्यासाठी कोणत्या गोष्टी करायला हव्यात (Skin Care Tips by Beauty Expert Shahnaz Husain)...
१. आंघोळ करताना
थंडीच्या दिवसांत गार पाणी नको वाटते म्हणून आपण जास्त गरम पाण्याने आंघोळ करतो. मात्र त्यामुळे त्वचा जास्त कोरडी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे पूर्ण गार नाही आणि खूप गरमही नाही तर कोमट पाण्याने आंघोळ करायला हवी. या पाण्यात मीठ किंवा बेकींग सोडा घातल्यास त्वचा डीहायड्रेट होऊन कोरडी न होता चांगली राहण्यास मदत होईल.
२. आंघोळीपूर्वी अवश्य करा
आंघोळीच्या आधी शरीराला तेलाने मसाज केल्यास त्वचा तर चांगली राहतेच पण रक्तप्रवाहही सुधारण्यास मदत होते. हा मसाज करण्यासाठी आपण खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑईलचा वापर करु शकतो.
३. आंघोळीनंतर
आंघोळीनंतर आपण घाईघाईने कपडे घालतो आणि घराबाहेर पडतो. पण असे न करता अंग अर्धवट ओलसर असताना त्वचेला न विसरता बॉडी जेल किंवा बॉडी बटर लावायला हवे. यापैकी काही नसेल तर आपण ग्लिसरीनचाही वापर करु शकतो. यामुळे त्वचा दिवसभर हायड्रेटेड राहण्यास मदत होईल.
४. इसेन्शियल ऑईल ठरेल फायदेशीर
आंघोळीच्या पाण्यात काही थेंब लव्हेंडर तेल, दालचिनीचे तेल किंवा रोज ऑईल घालावे. हे सगळे इसेन्शियल ऑईलमध्ये समाविष्ट होतात, त्यामुळे या तेलांचे ५ थेंब घातले तरी आपल्याला त्याचे बरेच फायदे होतात.
५. आहारात घ्यायलाच हवेत असे पदार्थ
त्वचा मुलायम ठेवायची असेल तर आहारातून शरीराचे पोषण होणेही तितकेच महत्त्वाचे असते. त्यामुळे आहारात बदाम, आक्रोड, वेलची, आलं या पदार्थांचा समावेश अवश्य करायला हवा.