तेलकट त्वचेचं दुखणं पावसाळ्यात जरा जास्तच वाढतं. तेलकट त्वचा इतर त्वचा प्रकारांच्या तुलनेत खूप अधिक काळ तरुण राहते, तिचा टवटवीतपणा बरेच दिवस टिकून राहतो, हे सगळं अगदी खरं आहे. पण तेलकट त्वचा (oily skin) सांभाळणं हे देखील एक कौशल्याचं काम आहे. त्वचेवर वारंवार व्हाईट हेड्स (white heads) दिसणं, पिंपल्स येणं (pimples), चेहरा तेलकट दिसून तो काळवंडलेला वाटणं, अशा अनेक तक्रारी ऑईली स्किनबाबत (care for oily skin) असतात. आणि पावसाळ्यात तर या तक्रारी खूप जास्त वाढतात. त्यामुळेच तर पावसाळ्यात मुळात आधीच तेलकट असणारी त्वचा आणखीनच चिपचिपित होऊ नये, यासाठी या काही गोष्टींची काळजी घ्यावी. तसेच स्किन केअर रुटीनमध्येही त्यानुसार बदल करावा. (5 tips for oily skin specially in monsoon)
पावसाळ्यात तेलकट त्वचेची काळजी घेण्यासाठी ५ उपाय
१. क्लिजिंग करणे (Cleansing)
त्वचेवरील अतिरिक्त तेलाचा थर काढून टाकण्याचा सोपा उपाय म्हणजे चेहरा दिवसातून ३ ते ४ वेळा पाण्याने स्वच्छ धुणे. यामुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल तर निघून जाईलच पण त्यासोबतच त्यावरची धुळ देखील स्वच्छ होईल आणि यामुळे व्हाईटहेड्सचा त्रासही कमी होईल. ऑईली त्वचा असणाऱ्यांनी पावसाळ्यात ऑईल फ्री जेल बेस किंवा फोमिंग क्लिंजरचा वापर करावा. पण प्रत्येकवेळी चेहरा क्लिंजर लावूनच स्वच्छ करू नये. दिवसातून दोन पेक्षा अधिक वेळा क्लिंजर लावू नका. मेडिकेटेड साबण वापरला तरी चालेल. फक्त क्लिंजर किंवा मेडिकेटेड साबण घेताना त्यात सॅलीसायलिक ॲसिड, टी ट्री ऑईल, नीम ऑईल, टर्मरिक, मध यापैकी बहुतांश घटक असतील याची काळजी घ्या.
२. आठवड्यातून २ वेळा स्क्रब (Scrub)
तेलकट त्वचेसाठी नियमित स्क्रबिंग अतिशय गरजेचं आहे. कारण यामुळे त्वचेवरील अतिरिक्त सेबम आणि डेड स्किन निघून जाते. त्यामुळे पिंपल्स, ॲक्ने, व्हाईट आणि ब्लॅक हेड्सचे प्रमाण कमी होते तसेच चेहऱ्याचा काळवंडलेपणा देखील कमी होतो. फक्त स्क्रबिंग करताना त्वचा खूप जोर लावून रगडू नका. हळूवार स्क्रब करा.
३. आठवड्यातून एकदा फेसमास्क (Facemask)
त्वचेमधलं तेल कंट्रोल करण्यासाठी आठवड्यातून एकदा चेहऱ्याला फेसमास्क लावावा. मुलतानी माती किंवा चंदनाचा फेसपॅक ऑईली त्वचेसाठी सगळ्यात चांगला आहे. बाजारातून इतर दुसरे फेसपॅक घेणार असाल तर त्यामध्ये Kaolin and Bentonite clay असणारे फेसमास्क घेण्यास प्राधान्य द्या. कारण असे फेसमास्क त्वचेतलं अतिरिक्त तेल शोषून घेण्यास मदत करतात.
४. टोनरचा नियमित वापर (Toner)
चेहरा धुतला की तो काही काळ फ्रेश दिसतो. पण नंतर पुन्हा त्यावर तेल जमायला सुरुवात होते. चेहऱ्याला असं अतिरिक्त तेल सुटू नये, यासाठी दररोज टोनर लावणं गरजेचं आहे. रोझ वॉटर म्हणजेच गुलाबपाणी हे तेलकट त्वचेसाठी सगळ्यात योग्य टोनर मानलं जातं. त्याऐवजी जर दुसरं टोनर खरेदी करणार असाल तर ते अल्कोहोल फ्री आहे ना, हे एकदा तपासून घ्या.
५. सनस्क्रिन लावायला विसरू नका (sunscreen)
पावसाळ्यातही तुमच्या त्वचेसाठी सनस्क्रिन अतिशय महत्त्वाचं आहे. अनेक जणी त्वचा आणखीनच चिकट, ऑईली दिसते म्हणून सनस्क्रिन लावणं टाळतात. पण यामुळे त्वचेवर पिंगमेंटेशन येणं, त्वचा काळी पडणं असा त्रास होतो. त्यामुळे सनस्क्रिन लावा, पण त्याची निवड मात्र परफेक्ट करा. ज्या सनस्क्रिनमध्ये अव्होबेंझॉन, ऑक्सीबेन्झोन, ऑक्टिसलेट, ऑक्टोक्रायलीन, होमोसॅलेट आणि ऑक्टिनॉक्सेट असे घटक असतील, ते सनस्क्रिन घेणं टाळा.
२.ज्या सनस्क्रिन लोशनमध्ये झिंक ऑक्साईड किंवा टायटॅनियम डायऑक्साइड आहे, असं सनस्क्रिन लोशन खरेदी करा.