लग्नसराई सुरू असल्याने घरोघरी कोणाचे ना कोणाचे लग्न आहेच. अशावेळी या समारंभात उठून दिसण्यासाठी आपल्या चेहऱ्यावर छान ग्लो असायला हवा. उन्हाळ्याच्या दिवसांत सतत येणारा घाम, चेहऱ्यावरचे पिंपल्स आणि तेलकट त्वचा या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी आणि चेहऱ्यावरचा ग्लो टिकून राहण्यासाठी आपल्याला काही बेसिक गोष्टी माहिती असणे आवश्यक असते. चेहरा छान चमकदार दिसावा (Skin Care Tips) यासाठी दरवेळी आपण पार्लरमध्ये हजारो रुपये घालवू शकतोच असे नाही. अशावेळी घरच्या घरी नैसर्गिक गोष्टींचा वापर करुन आपण चेहऱ्यावर ग्लो आणू शकलो तर? पाहूयात चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी घरच्या घरी झटपट कोणते उपाय करायला हवेत, या उपायांनी तात्पुरता परिणाम न होता दिर्घकालिन परिणाम झाल्याने आपल्यालाही सतत तेच तेच करत बसावे लागणार नाही.
१. तोंडात तेल घेऊन त्याने आतल्या आत चूळ भरत राहणे हे चेहऱ्याचा ग्लो वाढवण्यासाठी अतिशय उत्तम टेक्निक आहे. साधारण १५ मिनीटे दररोज आपण हे करायला हवे. त्यामुळे चेहऱ्याचा रक्तप्रवाह सुधारतो आणि नकळत आपला चेहरा ग्लो होण्यास मदत होते. या तंत्राला आधुनिक शास्त्रात स्विश ऑईल असे म्हटले जाते.
२. भरपूर पाणी पिणे हा चेहरा ग्लो करण्यासाठी आणखी एक उत्तम उपाय आहे. पाण्यामुळे शरीर अतिशय चांगल्या रितीने डिटॉक्स होते आणि त्याचा त्वचेवर चांगला परिणाम होऊन नकळत आपली त्वचा ग्लो करायला लागते. त्यामुळे दिवसातून ३ ते ४ लीटर पाणी प्यायला हवे.
३. उन्हाळ्याच्या दिवसांत त्वचा कोरडी पडण्याची समस्या उद्भवते. अशावेळी कोकफड, काकडी, पुदिना या गोष्टींचा आपल्या डेली स्कीन केअर रुटीनमध्ये समावेश करायला हवा. तसेच हरिद्रा, मंजिष्ठा, सारीबा, चंदन या आयुर्वेदीक वनस्पतींचा चेहऱ्याचा नितळपणा वाढण्यासाठी आवर्जून उपयोग करायला हवा. या वनस्पतींची पावडर चेहऱ्याला लावल्यामुळे चेहरा नकळत उजळतो.
४. आहारात फळांचा जास्तीत जास्त समावेश केल्याने त्याचाही त्वचेसाठी चांगला फायदा होतो. त्वचा नितळ आणि चमकदार होण्यासाठी शरीरातील अनावश्यक घटक बाहेर पडणे आवश्यक असते. फळांमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असल्याने शरीरातील अनावश्यक घटक बाहेर पडतात आणि त्यामुळे त्याचा त्वचेवर चांगला परिणाम होतो.
५. अभ्यंगाला आयुर्वेदात मोठे महत्त्व असून आपण त्वचा चांगली राहण्यासाठी नियमितपणे अभ्यंग करायला हवे. चेहऱ्याला तेलाने मसाज केल्याने रक्ताभिसरण क्रिया सुरळीत होते आणि त्वचा डिटॉक्सिफाय होण्यास मदत होते. त्वचेला तेलाने मसाज केल्यास त्वचेचे पोषण होते आणि त्याचा त्वचा उजळ होण्यास अतिशय चांगला उपयोग होतो.