चेहऱ्याचे सौंदर्य आपल्या एकूण सौंदर्यात महत्त्वाची भूमिका बजावत असते. आपली त्वचा कायम चमकदार, सतेज असावी असं प्रत्येकीला वाटतं. पण काही ना काही कारणांनी चेहऱ्यावर येणारे डाग, फोड किंवा त्वचेचा कोरडेपणा यामुळे आपण वैतागून जातो (Skin Care Tips). मग सतत मेकअप करुन चेहऱ्यावरच्या या गोष्टी झाकाव्या लागतात किंवा पार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रिटमेट घ्याव्या लागतात. पण त्यापेक्षा काही सोपे घरगुती उपाय (Home remedy) करुन आपल्या चेहऱ्यावरील त्वचेच्या समस्या दूर झाल्या तर? यामुळे आपले पैसे तर वाचतीलच पण चेहऱ्यावर होणाऱ्या रासायनिक घटकांचे प्रमाणही कमी होईल. पाहूयात घरात सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टींपासून कसे सौंदर्य मिळवता येईल याविषयी...
१. संत्र्याच्या सालांची पावडर आणि कच्चे दूध
त्वचा एक्सफॉलिएट करण्यासाठी किंवा फेसपॅक म्हणून संत्र्याची पावडर अतिशय उपयुक्त ठरते. आपण एरवी संत्री खातो तेव्ही त्याची साले फेकून न देता ती उन्हात वाळवून त्याची मिक्सरमध्ये पावडर करुन ठेवा. संत्र्याची पावडर आणि कच्चे दूध एकत्र करुन ते मिश्रण चेहऱ्याला लावा. १० मिनीटांनंतर चेहऱ्यावर बोटाने गालाकार फिरवत हा पॅक चोळायचा प्रयत्न करा. चेहरा गार पाण्याने धुवा. आठवड्यातून ३ वेळा हा उपाय केल्यास चेहरा ग्लो करण्यास मदत होईल.
२. कोरफड जेल आणि आवळ्याचा रस
हे दोन्हीही घटक औषधी असून आयुर्वेदात आवळा आणि कोरफडीला बरेच महत्त्व आहे. उन्हामुळे चेहऱ्यावर आलेले टॅनिंग कमी करण्यासाठी हा नैसर्गिक फेसपॅक अतिशय उपयुक्त ठरतो. एक चमचा आवळ्याचा रस आणि एक चमचा कोरफड जेल एकत्र करुन ते चेहऱ्याला लावा. १५ मिनीटांनी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून टाका. तुम्ही हा उपाय रोजच्या रोज केला तरी चेहऱ्याची त्वचा ग्लो करेल.
३. दही आणि मध
घरात सहज उपलब्ध असणारे हे घटक सौंदर्य खुलवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. आपली त्वचा तेलकट असेल तर हे मिश्रण अतिशय उपयुक्त ठरते. या दोन्ही गोष्टी एकत्र करुन त्याची पेस्ट ५ मिनीटे बोटाने गोलाकार फिरवत चेहऱ्यावर लावा. १५ मिनीटांनंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे त्वचेचा ग्लो वाढण्यास निश्चित मदत होईल.
४. बटाट्याचा रस
बटाट्याचा रस त्वचेसाठी फायदेशीर असतो हे आपण अनेकदा ऐकले आहे. बटाटा किसून त्याचा रस काढून घ्यावा. हा रस चेहऱ्याला एकसारखा लावावा. यामुळे चेहऱ्यावरचे टॅनिंग कमी होण्यास मदत होते. बटाट्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंटस जास्त प्रमाणात असल्याने चेहऱ्यावरची डेड स्कीन निघून जाण्यास याची मदत होते. हा रस चेहऱ्याला लावताना मसाज करत लावल्यास तो त्वचेत मुरण्यास मदत होईल आणि टॅनिंग निघून जाईल.