उन्हाळ्याच्या दिवसांत सर्वात जास्त परिणाम कशावर होत असेल तर तो आपल्या त्वचेवर. बरेचदा उन्हामुळे त्वचा कोरडी पडणे, काळी पडणे, निस्तेज होणे अशा समस्या निर्माण होतात. यासाठी पाण्याने वारंवार चेहरा धुणे, भरपूर पाणी पिणे, चेहऱ्याचे सौंदर्य कायम राहावे यासाठी विविध प्रकारच्या सौंदर्यप्रसाधनांचा वापर करणे असे उपाय केले जातात. मात्र तरीही चेहऱ्याची चमक आहे तशी राहत नाही. पण रासायनिक घटक असलेली उत्पादने वापरणे आणि पार्लरमधील महागड्या ट्रीटमेंटस घेण्यापेक्षा घरच्या घरी सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टींपासून चेहरा उजळण्यासाठी काही उपाय केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो (Skin Care Tips). आपल्याला एखाद्या कार्यक्रमाला जायचे असल्यास अगदी झटपट म्हणजे १५ मिनीटांत चेहऱ्यावर ग्लो येऊ शकतो. पाहूयात हा ग्लो येणारा उपाय नेमका कसा करायचा...
असा करा फेसपॅक
१. २ चमचे डाळीचे पीठ म्हणजेच बेसन चांगले चाळून घ्या.
२. त्यामध्ये २ चमचे दही, १ चमचा मध आणि १ चमचा गुलाब पाणी घाला.
३. हे सगळे मिश्रण चांगले एकजीव करुन घ्या.
४. चेहरा क्लिंजरने साफ करा आणि जोरात न पुसता हलक्या हाताने कोरडा करुन घ्या.
५. त्यानंतर चेहऱ्याच्या सगळ्या भागाला गळ्यापर्यंत हा पॅक एकसारखा लावून घ्या.
६. १५ मिनीटे हा पॅक आहे तसाच ठेवा आणि त्यानंतर हाताने रगडून काढून टाका.
७. यानंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून टाका. त्यानंतर लगेचच तुम्हाला चेहरा ग्लो होताना दिसेल.
८. हा फेसपॅक आठवड्यातून दोन वेळा अवश्य लावा. यामुळे त्वचा काळपट, निस्तेज आणि कोरडी झाली असल्यास ती तजेलदार होण्यास मदत होईल.
९. हा पॅक आपण चेहऱ्याबरोबरच हाताला, पाठीला, पायाच्या तळव्यांना असा शरीराच्या सर्व टॅन झालेल्या भागांवर लावू शकतो.
फायदे
१. बेसन - यामुळे चेहऱ्यावरचे टॅनिंग दूर होण्यास तर मदत होतेच पण त्वचेला एकप्रकारचा ग्लो येण्यास बेसन उपयुक्त ठरते. त्वचेवर आलेल्या सुरकुत्या आणि वयस्करपणाच्या खुणा कमी करण्यास याची अतिशय चांगली मदत होते. डेड स्कीन निघून त्वचा नितळ होण्यास बेसनाचा चांगला उपयोग होतो.
२. दही - दह्यातील मॉईश्चरायजिंग घटक त्वचेतील आर्द्रता टिकवून ठेवण्यास उपयुक्त असतात. दह्यामुळे त्वचेला तजेला येण्यासही मदत होते. चेहऱ्यावरील डाग, फोड कमी होण्यासाठी दह्यात असणारे अँटीबॅक्टेरीयल गुणधर्म अतिशय उपयुक्त ठरतात.
३. मध - मधामध्ये असणारे अंटीमायक्रोबियल आणि अँटीइन्फ्लमेटरी गुणधर्म चेहऱ्याचा निस्तजपणा कमी करण्यास मदत करतात. मधातील गुणधर्मांमुळे चेहऱ्यावरचे डाग, खड्डे, सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. त्वचा एक्सफॉलिएट करण्याचे काम मधाद्वारे केले जात असल्याने मृत त्वचा निघून जाण्यासाठी याचा अतिशय चांगला उपयोग होतो.
४. गुलाब पाणी - गुलाब पाण्यात अँटी इन्फ्लमेटरी गुणधर्म असतात त्यामुळे उन्हामुळे किंवा अन्य कारणांनी चेहऱ्याची आग होत असेल तर ती कमी होण्यास गुलाब पाणी उपयुक्त ठरते. फार पूर्वीपासून विविध सौंदर्य उत्पादनांमध्ये गुलाबपाण्याचा वापर केला जात असून चेहऱ्यावरचा लालसरपणा कमी करण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. त्वचेवर तजेला आणण्याबरोबरच वाढलेले वय झाकण्यासाठीही गुलाबपाणी उपयुक्त ठरते.