एप्रिल महिना सुरू असल्याने उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. यामध्ये आपल्याला बाहेरचे काही काम असेल तर बाहेर पडणे म्हणजे दिव्यच. कारण भर उन्हात बाहेर पडल्यावर आपल्या त्वचेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते (Skin Care Tips). उन्हाचा चटका बसल्याने त्वचेवर खाज येणे, रॅशेस येणे, पुरळ येणे अशा समस्या उद्भवण्याची शक्यता असते. तर अनेकदा त्वचा कोरडी पडणे, उन्हामुळे त्वचेची आग होणे अशा समस्या उद्भवतात. या उन्हापासून बचाव करण्यासाठी आपण कधी छत्री वापरतो तर कधी स्कार्फने चेहरा झाकून घेतो. तरीही या झळा इतक्या जास्त असतात की स्कीन खराब झाल्याशिवाय राहत नाही. मात्र कडक उन्हातही तुम्हाला काही कामानिमित्त किंवा सहजच घराबाहेर पडायचे असेल तर काही सोप्या स्कीन केअर टिप्स फॉलो करायला हव्यात. पाहूयात घरच्या घरी कोणते उपाय केल्याने भर उन्हातही आपल्या त्वचेला उन्हाचा त्रास होणार नाही.
१. कोरफडीचा गर
कोरफड़ ही त्वचा, केस यांच्यासाठी सर्वात उत्तम घरगुती उपाय आहे. उन्हामुळे त्वचेची आग होत असेल किंवा त्वचा काळवंडली असेल तर कोरफडीचा गर चेहऱ्याला आवर्जून लावावा. दिवसातील कोणत्याही वेळी हा गर आपण चेहऱ्याला लावू शकतो. रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून कोरफडीचा गर चेहऱ्याला लावल्यास त्याचा त्वचा चांगली राहण्यासाठी अतिशय चांगला फायदा होतो.
२. दही
उन्हाळ्याच्या दिवसांत दही म्हणजे पर्वणीच. हे गारेगार दही खायला जितके छान लागते तितकेच त्वचेसाठीही हे दही फायदेशीर असते. चेहऱ्यावरचे टॅनिंग निघून जाण्यासाठी दह्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. एकावर एक २ थर लावून ३० मिनीटांनी चेहरा गार पाण्याने स्वच्छ धुवून टाकावा. त्यानंतर किमान २ तास तरी चेहऱ्याला काहीही लावू नका. दही नॅचरल क्लिंझिंगचे काम करत असल्याने त्वचेला त्याचा चांगला फायदा होतो.
३. दूध हळद
उन्हामुळे अनेकदा आपली त्वचा टॅन होते. या टॅन झालेल्या ठिकाणी काळे डाग दिसतात. यावर दूध आणि हळद लावल्यास त्वचेचा काळेपणा दूर होण्यास मदत होते. हे दूध कच्चे असेल तर आणखी चांगले. न चुकता दररोज हळद आणि दूधाने चेहऱ्याला मसाज केल्यास चेहऱ्याचा ग्लो वाढण्यास मदत होईल आणि भर उन्हाळ्यातही आपला चेहरा चमकदार आणि नितळ दिसेल.
४. सनस्क्रीन लोशन
भर उन्हात बाहेर पडताना चेहऱ्याला आणि हातांना, मानेला सनस्क्रीन लोशन लावणे आवश्यक आहे. हे सनस्क्रीन लोशन ३० SPF चे असेल याची काळजी घ्यायला हवी. तसेच अगदी बाहेर निघाताना न लावता सनस्क्रीन लोशन घराबाहेर पडायच्या १५ मिनीटे आधी लावा. उन्हाळ्यात दिवसातून ३ वेळा सनस्क्रीन लावले तरी चालेल, त्यामुळे त्वचा चांगली राहण्यास मदत होईल.