आपला आहार, झोप, ताण यांसारख्या सगळ्या गोष्टी आपल्या त्वचेवर म्हणजेच आपल्या चेहऱ्यावर दिसत असतात. आहार समतोल किंवा पोषक असेल तर त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. इतकेच नाही तर आपण नियमित व्यायाम करत असलो तरीही चेहऱ्यावर ग्लो येतो. पण सततचा कामाचा ताण, अपुरी झोप, रासायनिक उत्पादनांचा वापर यामुळे त्वचा दिवसेंदिवस निस्तेज होत जाते (Skin care tips). अशावेळी काही ना काही फेसपॅक लावून किंवा बाजारात मिळणारे वेगवेगळे फेसवॉश वापरुन चेहरा धुतल्यास तो उजळेल असे आपल्याला वाटते. मग कधी इंटरनेटवरुन माहिती घेऊन तर कधी मैत्रीणींच्या नातेवाईकांच्या सल्ल्यानुसार आपण काही उपाय करतो. पण त्यापेक्षा चेहरा धुताना घरात सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टींचा वापर केला (Home remedies) तर चेहरा उजळायला तर मदत होतेच पण चेहऱ्यावर काही कारणांनी पुरळ आले असतील तर तेही जातात. पाहूयात अशा कोणत्या गोष्टींचा वापर करुन आपण चेहरा धुवू शकतो...
१. डाळीचे पीठ
डाळीचे पीठ म्हणजेच बेसन हे चेहरा धुण्यासाठी अतिशय चांगला उपाय आहे. अनेकदा वेगवेगळ्या प्रकारच्या फेसपॅकमध्येही आपण डाळीच्या पीठाचा उपयोग करतो. या पीठाने चेहरा १० मिनीटे चांगला चोळा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका. चेहऱ्यावरची मृत त्वचा निघून जाण्यासाठी याचा अतिशय चांगला उपयोग होतो. चेहऱ्याबरोबरच हातांचे टॅनिंग घालवण्यासाठीही आपण बेसन वापरु शकतो.
२. मुलतानी माती
तेलकट त्वचेसाठी मुलतानी माती अतिशय़ उपयुक्त असते. पूर्वीच्या काळी स्त्रिया आपला चेहरा धुण्यासाठी मुलतानी मातीचा उपयोग करत असत. ही माती पाण्यात किंवा दुधात भिजवून ठेवा आणि चेहऱ्याला लावा. त्यानंतर ५ ते ७ मिनीटांनी साध्या पाण्याने चेहरा धुवून टाका. मुलतानी माती लावल्यावर आपली त्वचा जास्त कोरडी झाली असे वाटल्यास चेहरा स्वच्छ पुसून त्यावर कोरफडीचा गर लावा. यामुळे आपली त्वचा केवळ मॉईश्चराईजच होणार नाही तर त्याचा उजळपणा वाढण्यासही मदत होईल.
३. साय किंवा मलाई
आपली त्वचा जास्त कोरडी असेल तर चेहऱ्याला सायीने मसाज करा. सायीमध्ये स्निग्धता असल्याने त्वचेतील आर्द्रता टिकून राहण्यास मदत होते. बऱ्याचदा विविध प्रकारच्या फेसपॅकमध्येही सायीचा वापर करायला सांगितलेला असतो, ज्यामुळे चेहऱ्याची चमक कायम राहते. साय चेहऱ्याला लावून ठेवा, त्यानंतर १० मिनीटांनी मसाज करत चेहरा कोमट पाण्यान स्वच्छ धुवा. चेहरा धुतल्यानंतर तुम्हाला थोडासा तेलकट वाटू शकतो, पण त्यावर काहीही न लावता तसाच ठेवा. त्यामुळे त्वचा चांगली राहण्यास मदत होईल.