चेहऱ्यावर पिंपल येणे ही अतिशय सामान्य समस्या आहे. त्यातही आपली त्वचा तेलकट असेल तर ही समस्या जास्त प्रमाणात भेडसावते. प्रदूषण, त्यात चेहऱ्याची पुरेशी काळजी न घेणे आणि आहारातील चुकीच्या सवयी यांमुळे या पिंपल्सचे प्रमाण जास्त वाढते. आपण आपल्या त्वचेकडे योग्य पद्धतीने लक्ष देत नसल्याने आणि स्कीन केअर रुटीनमध्ये काही चुका करत असल्याने या पिंपल्सचे प्रमाण वाढत जाते (Skin Care Tips). प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ डॉ. आंचल पांथ तेलकट आणि पिंपल्स येणारी त्वचा असेल तर टाळायलाच हव्यात अशा ४ गोष्टी सांगतात. पाहू त्वचेवर खूप फोड येऊ नयेत म्हणून काय करायला हवे.
१. केस न बांधता झोपणे
अनेकदा आपण रात्री केस न बांधता झोपतो. मात्र त्यामुळे केस चेहऱ्यावर घासले जातात आणि केसांना असणारे तेल चेहऱ्यावर उतरते. यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची शक्यता वाढते. म्हणून रात्री झोपताना केस हलके बांधून ठेवायला हवेत.
२. उशीचे कव्हर न बदलणे
उशीचे कव्हर दर दोन दिवसांनी बदलायला हवे. कारण चेहऱ्यावर लावलेले क्रिम आणि केसांचे तेल या कव्हरला लागते. तसेच त्यावर धूळ आणि घाण बसते आणि आपण पुन्हा पुन्हा तेच कव्हर वापरल्यामुळे ही सगळी घाण चेहऱ्याला लागून चेहरा खराब होतो. तसेच उशीच्या कव्हरचे कापड सुती आणि मऊ असायला हवे, ज्यामुळे चेहऱ्याला त्रास होणार नाही.
३. हाताच्या त्वचेसाठी क्रिमचा वापर
हातावर लावण्यासाठी क्रिमचा दिवसा वापर करणे ठिक आहे. पण तुम्हाला पिंपल्सची समस्या असेल तर रात्रीच्या वेळी अशी क्रिम टाळायला हवीत. कारण अनेकदा आपण हात चेहऱ्याखाली घेऊन झोपतो, या क्रिममुळे चेहऱ्याच्या त्वचेला त्रास होऊ शकतो. हाताला लावण्याच्या या क्रिम्समध्ये चेहऱ्यासाठी हानिकारक असे घटक असल्याने त्यांचा रात्रीच्या वेळी वापर न केलेलाच चांगला.
४. केस नियमित न धुणे
तुमचे केस खूप तेलकट असतील तर तुम्ही आठवड्यातून किमान ३ वेळा शाम्पू करायला हवा. कारण केस तेलकट झाले की त्याचे तेल नकळत आपल्या कपाळावर आणि चेहऱ्याच्या इतर भागावर येते. त्यामुळे पिंपल्सचे प्रमाण वाढते. म्हणूनच केस नियमित धुतल्यास हा त्रास होत नाही.