जॅपनीज फूल असलेल्या चेरी ब्लॉसमचे नाव आपण सगळ्यांनीच अनेकदा ऐकले असेल. यालाच जपानी भाषेत साकुरा असेही म्हटले जाते. जपानमध्ये वसंत ऋतू म्हणजेच मार्चच्या महिन्यात सगळीकडे पांढऱ्या गुलाबी रंगाच्या चेरी ब्लॉससममुळे अतिशय नयनरम्य वातावरण पाहायला मिळते. ही फुले दिसायला जितकी सुंदर असतात तितकेच त्याचे बरेच उपयोग असतात. परफ्यूम किंवा साबण तयार कऱण्यासाठी तसेच विविध प्रकारची सौंदर्य उत्पादने तयार करण्यासाठी या फुलांचा वापर केला जातो. नितळ त्वचेसाठीही (Skin Care Tips ) या जपानी चेरी ब्लॉसमचा अतिशय चांगला उपयोग होतो. या फुलामध्ये असणारे अँटीऑक्सिडंटस त्वचेसाठी अतिशय चांगले काम करतात. तसेच त्वचेचे विविध बॅक्टेरीयांपासून, सूर्याच्या अतिनील किरणांपासून आणि इतर घटकांपासून संरक्षण करण्यासाठी या फुलातील गुणधर्म उपयुक्त ठरतात.
१. त्वचेचा दाह कमी करण्यासाठी उपयुक्त
त्वचेला होणारे इरीटेशन, लालसरपणा, रॅशेस आणि त्वचेचा होणारा दाह कमी कऱण्य़ासाठी या फुलात अतिशय उत्तम गुणधर्म असतात. हायपरपिगमेंटेशन, पिंपल्स यांसारख्या चेहऱ्यावरील समस्या दूर करण्यासाठी चेरी ब्लॉसम उपयुक्त ठरते.
२. चेहरा नितळ करणारे फॅटी अॅसिडस
चेरी ब्लॉसमच्या फुलाच्या वापराने तुमची स्कीन नैसर्गिकरित्या चांगली होण्यास मदत होते. यामध्ये असणारे फॅटी अॅसिडस त्वचेतील ओलावा टिकण्यास कारणीभूत असतात. त्वचेमध्ये कोलाजेनची निर्मिती होण्यासाठी चेरी ब्लॉसमचा उपयोग होतो. कोलाजेनमुळे त्वचा सुंदर आणि नितळ दिसण्यास मदत होते.
३. अँटीऑक्सिडंटसचे भरपूर प्रमाण
चेरी ब्लॉसम फुलामध्ये अँटीऑक्सिडंटसचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे त्वचेतील घाण स्वच्छ करण्यासाठी आणि प्रदूषणामुळे त्वचेचे होणारे नुकसान भरुन काढण्यासाठी या फुलाचा अतिशय चांगला उपयोग होतो. ही घाण स्वच्छ झाली की आपली त्वचा नितळ होण्यास मदत होते.
४. सुरकुत्या कमी होण्यास उपयुक्त
ज्या टॉक्सिन्समुळे आपले वय वाढलेले दिसते. अशा टॉक्सिन्सना दाबण्याचे काम चेरी ब्लॉसममुळे होऊ शकते. बऱ्याच संशोधनांमध्ये हे सिद्ध झाले आहे की चेरी ब्लॉसम फुलाच्या पाकळ्यांमध्ये अशाप्रकारचे गुणधर्म असतात.
५. वांगाचे डाग घालविण्यासाठी उपयुक्त
अनेकदा विविध कारणांनी आपल्या चेहऱ्यावर वांगाचे डाग येतात. हे डाग घालविण्यासाठी चेरी ब्लॉसमच्य फुलांमध्ये आवश्यक असे गुणधर्म असतात. हे डाग फिकट करण्यासाठी आणि त्वचा एकसारखी करण्यासाठी चेरी ब्लॉसम अतिशय उपयुक्त ठरते. त्वचेतील मेलानिनची निर्मिती कमी करण्यासाठी आणि त्वचा उजळ होणे यासाठी याचा अतिशय चांगला उपयोग होतो.