हिवाळा हा आरोग्यवर्धक ऋतू असला तरीही त्वचा आणि केसांच्या दृष्टीनं हिवाळा खूपच त्रासदायक ठरतो. कारण या दिवसांत त्वचा खूप जास्त कोरडी होते. त्यामुळे ती निस्तेज आणि एकदमच डल दिसू लागते. त्वचेची चमक हरवल्यासारखी वाटते. तसंच काहीसं केसांचही होतं.. स्काल्पचा म्हणजेच डोक्याच्या त्वचेचा कोरडेपणा (dryness in winter) खूप जास्त वाढतो. त्यामुळे केसांत कोंडा होतो.. म्हणूनच त्वचेचं आणि केसांचं सौंदर्य टिकवायचं असेल तर थंडीच्या दिवसांत प्या हे स्पेशल ब्यूटी हेल्थ ड्रिंक... आरोग्यासोबतच घ्या त्वचेचीही काळजी....
१. आवळा ज्यूस...(aamla juice)
थंडीच्या दिवसांत बाजारात भरपूर आवळे आलेले असतात.. या आवळ्यांचा उपयोग सौंदर्य आणि आरोग्य या दोन्ही गोष्टींसाठी करून घ्या. आरोग्याच्या दृष्टीने आवळ्याला एकप्रकारचं सुपर फूड मानलं जातं.. आवळ्यामध्ये असणारे पौष्टिक घटक त्वचा डिहायड्रेट होण्यापासून रोखतात.. त्वचेमधली आर्द्रता टिकवून ठेवतात. त्यामुळे हिवाळ्यात त्वचा कोरडी पडू नये यासाठी आवळा ज्यूस प्यावा. आवळा ज्यूस करण्यासाठी आवळे उकडून घ्या. त्याचा गर काढा. त्यात गरजेनुसार पाणी, साखर आणि चिमुटभर मीठ टाका.
२. हळदीचं दूध (haldi milk)
थंडीच्या दिवसांत रोज रात्री हळदीचं दूध घेणं अतिशय आरोग्यदायी मानलं जातं. हळदीमध्ये असणाऱ्या ॲण्टी इन्फ्लेमेटरी आणि ॲण्टी मायक्रोबिअल घटकांमुळे थंडीच्या दिवसांत होणाऱ्या संसर्गजन्य आजारांपासून आपलं संरक्षण होतं.. याशिवाय हळदीचं दूध हे सौंदर्याच्या दृष्टीकोनातूनही अतिशय उपयुक्त आहे. त्वचेवर पुरळं येणं, पिंपल्स येणं अशी समस्या हळदीच्या दुधामुळे कमी होते. हळदीचं दूध बनविण्यासाठी एक कप दूध घ्या. त्यात एक टीस्पून हळद टाका. हे दूध उकळून घ्या. दूध उकळून कपात गाळल्यानंतर त्यात अर्धा टेबलस्पून गूळ टाका. दूध व्यवस्थित हलवून घ्या आणि गरमागरम पिऊन टाका.
३. ग्रीन टी (green tea)
ग्रीन टी देखील आरोग्य आणि सौंदर्य या दोन्हींसाठी अतिशय गुणकारी मानला जातो. ग्रीन टी मध्ये भरपूर प्रमाणात ॲण्टी ऑक्सिडंट्स असतात. जे त्वचेला निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात. ग्रीन टी द्वारे शरीराला व्हिटॅमिन सी देखील मिळते. व्हिटॅमिन सी त्वचेला तजेलदार आणि टवटवीत ठेवण्यास मदत करते.