दिवाळी जवळ आली की थंडी पडायला सुरुवात होते. अशावेळी त्वचा कोरडी पडायला सुरुवात होते आणि तडतडते. यामुले त्वचेला खाज येणे, खाजवल्यानंतर त्वचेची कात पडल्यासारखे होणे अशा समस्या उद्भवतात. ऐन दिवाळीत आपल्याला एकमेकांकडे जायचे असते. मित्रमंडळींना भेटायचे असते. अशावेळी आपली त्वचा अशी कोरडी असेल तर ती वाईट दिसते. अशा कोरड्या पडलेल्या त्वचेवर मेकअपही नीट बसत नाही. त्यामुळे तुमची त्वचा कोरडी पडली असेल तर काळजी करु नका. दिवाळीला आणखी काही दिवस आहेत. आतापासूनच काही घरगुती उपाय केल्यास तुम्हाला त्याचा नक्की फायदा होऊ शकतो. यातही मुख्यत: चेहऱ्याचे सौंदर्य जास्त महत्त्वाचे असल्याने चेहऱ्याची आर्द्रता टिकून राहण्यासाठी तुम्ही घरच्या घरी अगदी सोपे उपाय करु शकता.
१. खोबरेल तेल हे फुटलेल्या त्वचेसाठी अतिशय चांगले असते. रुक्ष झालेल्या त्वचेला मऊपणा येण्यासाठी त्याचा उपयोग होतो. वाटीत खोबरेल तेल घेऊन त्यात बेसन पीठ घाला. ही पेस्ट चेहऱ्याला एकसारखी लावा. अर्धा तासाने चेहरा कोमट पाण्याने धुवा. दररोज एकदा असे केल्याने चेहऱ्याचा कोरडेपणा दूर होण्यास मदत होईल.
२. केळं हे जसे खाण्यासाठी फायदेशीर असते तसेच ते त्वचेच्या आरोग्यासाठीही अतिशय चांगले असते. केळ्यामुळे त्वचेला नैसर्गिक मॉईश्चराईजर मिळण्यास मदत होते. केळ्यात व्हिटॅमीन सी, ए, पॉटेशिअम, कॅल्शिअम, फॉस्फरस आणि कार्बोहायड्रेट्स असे भरपूर गुणधर्म असतात. ज्यामुळे कोरड्या त्वचेची समस्या दूर होऊ शकते. अर्धे केळे स्मॅश करुन त्यात खोबरेल तेल घालून हा गर चेहऱ्याला लावावा. थोडा वाळत आला की धुवून टाकावा. यामुळे चेहऱ्याचा कोरडेपणा दूर होण्यास मदत होते.
३. कॉफी प्यायल्यामुळे आपल्याला तरतरी येते, त्याचप्रमाणे कॉफी चेहऱ्याला लावल्यास चेहराही ताजातवाना होण्यास मदत होते. कॉफीमधील अँटीऑक्सिडंटस चेहऱ्यासाठी उपयुक्त असतात. एक चमचा कॉफी पावडरमध्ये मध, तूप आणि पाणी एकत्र करुन त्याची पेस्ट तयार करावी. ही पेस्ट चेहऱ्याला चोळून लावा. यामुळे चेहऱ्यावर एक वेगळ्याप्रकारची चमक येईल आणि कोरडेपणा दूर होण्यास मदत होईल.
४. मूग, मसूर किंवा हरभरा असे कोणत्याही डाळीचे पीठ घेऊन त्यामध्ये दूध आणि साय घालावी. त्यामध्ये थोडी हळदही घालावी. साय किंवा दूधामुळे चेहरा मऊ होण्यास मदत होते.
५. मोहरीचे तेल हे आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठीही अतिशय उपयुक्त असते. मोहरीमध्ये शरीरासाठी अतिशय चांगेल गुणधर्म असतात. दररोज झोपताना संपूर्ण अंगाला आणि चेहऱ्याला मोहरीचे तेल चोळल्याने त्वचेचा कोरडेपणा कमी होण्यास मदत होते.
६. कोरफड हाही अतिशय उत्तम घटक आहे. कोरफडीचा गर काढून त्यामध्ये मध आणि गुलाबपाणी मिसळा. यामुळे त्वचा कोमल आणि चमकदार होते. कोरफडातील अँटी ऑक्सिडंट गुणधर्म त्वचा कोरडी होण्यापासून बचाव करतात व त्वचेची नैसर्गिक चमकही कायम ठेवतात. मध हे खूपच चांगल क्लींजर आणि मॉईश्चराईजर आहे.
७. मुलतानी माती खुप चांगले काम करते. यासाठी एक चमचा मुलतानी माती, एक चमचा काकडीचा रस आणि दुध यांची पेस्ट तयार करावी, आणि चेहऱ्यावर लावावी. १५ मिनिटांनी चेहरा धुवून टाकावा. हा लेप आठवड्यातून एकदा लावावा.
याबरोबरच चेहरा कोरडा पडू नये म्हणून दिवाळ्यात चेहरा आणि शरीरासाठी जास्त गरम पाणी वापरु नये. आंघोळीनंतर लगेचच मॉइश्चरायझर लावा. चेहऱ्याला सतत पाणी लावणे टाळा. थंडीच्या काळात बाहेरील थंडाव्यापासून बचाव करण्यासाठी चेहरा नेहमी स्कार्फने झाकून घ्या. जास्त केमिकल असलेले साबण, फेसवॉश चेहऱ्यासाठी वापरु नका. सौंदर्यप्रसाधनांचा कमीत कमी वापर करा.