कोणतीही गोष्ट जर काळजी घेतली तर चांगली रहाते. तीच बाब त्वचेबाबतचीही आहे. त्वचा ही कोणत्याही प्रकारची असली तरी तिच्याकडे लक्ष देणं, काळजी घेणं, ती चांगली राहाण्यासाठी उपाय करणं महत्त्वाचं असतं. पण जर त्वचा तेलकट असेल तर मात्र त्वचेची काळजी घेण्याबाबत दुर्लक्ष करुन अजिबात चालत नाही. उलट तेलकट त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते.
तेलकट त्वचेवर मुळातच तेलाचं प्रमाण जास्त असतं. अशा त्वचेवर वातावरणातील प्रदूषित घटकांचा परिणाम होतो. त्यामुळे त्वचेची रंध्रं बंद होतात. या कारणांमुळेच तेलकट त्वचेवर मुरुम, पुटकुळ्य आणि फोड येतात. चेहेर्यावर काळे डाग पडतात. या समस्या निर्माण होवू नये म्हणून तेलकट त्वचा असणार्यांनी जर हर्बल स्टीम फेशियल केलं तर त्याचा चांगला परिणाम होतो. हे हर्बल स्टीम फेशिअल दोन प्रकारे करता येतं.
छायाचित्र- गुगल
ग्रीन टी स्टीम फेशियल
तेलकट त्वचेचा पोत सुधारण्यासाठी ग्रीन टी स्टीम फेशियल करावं. यासाठी एक लिटर पाणी चांगलं उकळून घ्यावं. त्यात ग्रीन टी, थोडी दालचिनी आणि हळद घालावी. हे घातल्यानंतर पाणी आणखी पाच मिनिटं उकळू द्यावं. गॅसवरुन भांडं खाली उतरवून घ्यावं. आता डोक्यावरुन रुमाल घेऊन चेहेरा गरम पाण्याच्या भांड्याजवळ नेऊन पाच सात मिनिटं वाफ घ्यावी. वाफ घेतल्यानंतर रुमालानं चेहेरा स्वच्छ पुसावा. ग्रीन टी स्टीम फेशियलमुळे त्वचा चमकते. ग्रीन टीमधे अँण्टिऑक्सिडण्ट असतात. या अँण्टिऑक्सिडण्टसमुळे त्वचेवर चमक येते. शिवाय उन्हानं चेहेर्यावर आलेला काळेपणा कमी होतो. यात घातलेली हळद ही अँण्टिबायोटिकचं काम करते. मुरुम पुटकुळ्या आणणार्या जीवाणुंना हळद अटकाव करते. तर दालचिनीमधील अँण्टिसेप्टिक , बुरशीनाशक, संसर्गविरोधी गुणधर्म या फेशियल दरम्यान त्वचेच्या रंध्रात खोलवर जातात आणि अतिरिक्त तेल निर्मितीस नियंत्रित करतात.
छायाचित्र- गुगल
लवेण्डर स्टीम फेशियल
तेलकट त्वचेची विशेष काळजी घेण्यासाठी लवेण्डर फेशियल करावं. यासाठी एक लिटर पाणी घ्यावं. ते चांगलं उकळावं. पाणी उकळल्यानंतर त्यात लवेण्डर तेलाचे थेंब टाकावेत. त्यासोबतच पुदिन्याची आणि तुळशीची पानं घालावी. ती घातल्यानंतर पुन्हा पाणी पाच मिनिटं उकळू द्यावं. मग भांडं गॅसवरुन खाली उतरवून डोक्यावर रुमाल टाकून चेहेर्यास वाफ घ्यावी. पाच सात मिनिटं वाफ घेतल्यानंतर चेहेरा रुमालानं स्वच्छ पुसून घ्यावा.
लवेण्डरच्या तेलामुळे त्वचा चमकदार आणि मऊ होते. तसेच त्वचेवरील अतिरिक्त तेल निर्मितीसही अटकाव होतो. पुदिन्याच्या पानांमुळे त्वचेला खोलवर थंडावा मिळतो. तुळशीच्या पानांमधे ई जीवनसत्त्व असतं. त्याचा फायदा त्वचेला होतो. तुळशीच्या या गुणधर्मामुळे त्वचेवर लाल चट्टे, मुरुम -पुटकुळ्या असतील तर त्या कमी होतात.