पावसाळ्यात तेलकट त्वचा आणखीनच तेलकट होते. या काळात तेलकट त्वचेची काळजी घेणं हे खूप गरजेचं असतं. याकडे दुर्लक्ष केलं तर त्वचा खराब करणार्या अनेक समस्या निर्माण होतात. मुळात तेलकट त्वचा म्हणजे खराब त्वचा नव्हे. फक तेलकट त्वचा असेल तर तिची काळजी घ्यावी लागते. त्याबाबतीत कंटाळा केला तर तेलकट त्वचा खराब होते. तेलकट त्वचेच्या बाबतीत दोन प्रकारे काळजी घ्यावी लागते एक म्हणजे तेलकट त्वचेचं आरोग्य जपणं आणि दुसरं म्हणजे तेलकट त्वचा स्वच्छ ठेवणे. त्वचा तेलकट असते म्हणजे त्वचेत नैसर्गिकपणे निर्माण होणार्या तेलाचं प्रमाण जास्त असतं. जे इतर प्रकारच्या त्वचा असलेल्यांकडे नसतं. फक्त तेलकट त्वचेच्या बाबतीत त्वचेवरील मेणचटपणा नियंत्रित करण्याचं आव्हान असतं.
छायाचित्र- गुगल
त्वचा तेलकट असते म्हणजे अन्य प्रकारच्या त्वचेच्या तुलनेत या त्वचा प्रकारात त्वचेत तेल अधिक निर्माण होतं. आपल्या त्वचेत चरबीयुक्त ग्रंथी ‘सीबम’ नावाचा एक स्त्राव तयार करतो. हा स्त्राव आपल्या त्वचेला ओलसर आणि निरोगी ठेवतो. पण तेलकट त्वचेच्या बाबतीत सीबमची निर्मिती जास्त होते. त्यामुळे त्वचेवरील छिद्रं बंद होतात. ¸म्हणूनच तेलकट त्वचेवर मुरुम पुट्कुळ्या येतात. हे जर टाळायचं असेल तर तेलकट त्वचेची निगा राखणं, ती स्वच्छ करण्यासाठी काही नियम न चुकता पाळणं महत्त्वाचं असतं.
छायाचित्र- गुगल
त्वचा तेलकट असेल तर
1. दिवसातून दोन वेळा चेहेरा नीट धुतलाच पाहिजे. दोन पेक्षा जास्त वेळा चेहेरा धुतल तर मग त्वचा कोरडी होते आणि त्वचेतील चरबीयुक्त ग्रंथी सीबम निर्मितीला अधिक चालना देतात. त्यामुळे चेहेरा पुन्हा तेलकट होतो. त्यामुळे चेहेर्यावर जमा झालेली घाण आणि अतिरिक्त तेल स्वच्छ करण्यासाठी दिवसातून दोन वेळेस फोम किंवा जेल बेस क्लीन्जरने धुवावा.
2. तेलकट त्वचा असेल तर त्वचेची काळजी घेण्यासाठी किंवा मेकअपसाठी जे देखील उत्पादनं निवडायची ती काळजीपूर्वक निवडा. ऑइल फ्री फेस वॉशचा उपयोग करा. तेलकट त्वचा नैसर्गिकपणे स्वच्छ आणि निरोगी राखण्यासाठी मध आणि लिंबाचा रस, गुलाब पाणी, कडुलिंबाच्या पानाची पेस्ट, काकडीचं पाणी आणि हळद हे उत्तम क्लीन्जर म्हणून काम करतात.
छायाचित्र- गुगल
3. चेहेरा स्वच्छ केल्यानंतर तेलकट त्वचा असलेल्यांनी टोनर लावायला हवं. चेहेरा धुतला की आधी टोनर लावून मग काही वेळानं मॉश्चरायझर लावावं. यामुळे चेहेर्याची त्वचा ओलसर आणि निरोगी राहाते. तेलकट त्वचा ओलसर ठेवण्यासाठी आणि चेहेर्यावर सुरकुत्या पडू नये यासाठी अल्कोहोलविरहित टोनर सर्वात उत्तम असतं.
4. तेलकट त्वचेवरील अतिरिक्त तेल रोखण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आठवड्यातून एकदा स्क्रब करायला हवं. स्क्रब केल्यानं चेहेर्याच्या त्वचेवरील तेल नियंत्रित राहातं. शिवाय स्क्रबमुळे तेलकट त्वचेमुळे तयार होणार्या मृतपेशी, ब्लॅकहेडस, व्हाइटहेडस हे निघून जाऊन त्वचा स्वच्छ होते. शिवाय स्क्रब केल्यानं चेहेर्यावरील रंध्रं अर्थात छिद्रं खोलवर स्वच्छ होतात.
छायाचित्र- गुगल
5. आठवड्यातून एकदा चेहेर्यास लेप लावणं तेलकट त्वचेच्या बाबतीत खूप फायदेशीर ठरतं. तेलकट त्वचेसाठी कार्बनिक अर्क स्वरुपात बाजारात लेप मिळतात ते शिवाय हर्बल फेस पॅकही वापरता येतात. नाहीतर स्वयंपाकघरात सहज उपलब्ध होणार्या सामग्रीतूनही परिणामकारक लेप तयार करता येतात. आठवड्यातून एकदा तरी चेहेर्याला लेप लावायला हवा. यामुळे त्वचेचं पोषण होतं.
6 त्वचा तेलकट असली तरी त्वचेसाठी मॉश्चरायझर आवश्यक असतं. कारण तेलकट त्वचा स्वच्छ करण्यासाठी तेल नियंत्रित ठेवणारे घटक आपण वापरतो. त्यामुळे त्वचा कोरडी होते आणि त्वचेतील ग्रंथीकडून सीबम निर्मितीला चालना मिळते आणि त्वचा पुन्हा खूप तेलकट दिसते. याचाच अर्थ तेलकट त्वचेत संतुलन राहात नाही. हे संतुलन ठेवण्याचं काम मॉश्चरायझर करतं. तेलकट त्वचेसाठी जेल बेस्ड किंवा वॉटर बेस्ड मॉश्चरायझर मिळतात ते वापरावेत.