संवेदनशील त्वचा आहे म्हणून निराश होण्याची , घाबरुन जाण्याची गरज नाही. इथे फक्त काळजी घेण्याची, थोडं जागरुक राहाण्याची गरज असते. त्वचा संवेदनशील आहे म्हणून मेकअप करायचाच नाही असं नाही. पण मेकअप करताना अतिशय दक्ष राहावं लागतं.आपण जे काही मेकअप म्हणून चेहेऱ्याला लावणार आहे ते जर नवीन, माहितीतलं नसेल तर चेहेऱ्याला लावण्याआधी मनगटाला लावून त्याची काही अॅलर्जी येत नाहीयेना याची टेस्ट घेणं आवश्यक आहे. तसेच त्वचा विकार तज्ज्ञांनी जी उत्पादनं संवेदनशील त्वचेसाठी शिफारस केलेली असतील तीच वापरावीत. मेकअप करताना थोडा जरी निष्काळजीपणा झाला, दुर्लक्ष झालं तर चेहेऱ्याची मोठी हानी होण्याची भीती असते. ती टाळायची असेल तर मेकअप करताना काही गोष्टींची दक्षता घ्यावीच लागते.
मेकअप करताना
मेकअपसाठी आधी आपल्या त्वचेला तयार करा
संवेदनशील त्वचा असणाऱ्यांनी मेकअप आधी त्वचेची प्राथमिक तयारी करणं खूप गरजेचं आहे. एकतर मेकअपसाठी जे काही वापरणार ते सौम्य स्वरुपाचंच असलं पाहिजे. तसेच त्वचा विकार तज्ज्ञांनी खास संवेदनशील त्वचेसाठी म्हणून शिफारस केलेल्या वस्तूच वापराव्यात. मेकअप आधी चेहेरा स्वच्छ धुवावा. टोनर लावावं आणि मग सौम्य स्वरुपाचं मॉश्चरायझर वापरावं. चांगल्या प्रतीचं आणि खास संवेदनशील त्वचेसाठी असलेलं मॉश्चरायझर त्वच कोरडी होण्यापासून प्रतिबंध करतं शिवाय त्वचा आरोग्यदायी ठेवते.
घन स्वरुपातील मेकअप उत्पादनं वापरावीत.
संवेदनशील त्वचा असलेल्यांनी आपल्याला जे काही खरेदी करायचंय ते घन स्वरुपातील उत्पादनंच असायला हवीत. मेकअपसाठीच म्हणून नव्हे तर रोजच्या तयारीसाठी, त्वचेची काळजी घेण्यासाठी म्हणून वापरली जाणारी उत्पादनं ही घन स्वरुपातील असायाला हवी हे पाहायला हवं. जी उत्पादनं वापरु त्यात पाण्याचं प्रमाण कमी असायला हवं. म्हणजे त्यात जीवाणूंची वाढ होण्याचा संभव नसतो. शिवाय त्यात कमी प्रमाणात प्रिझर्व्हेटिव्ह वापरलेली असतात. अशी उत्पादनं त्वचेसाठी सुरक्षित असतात.
अंतिम मुदतीकडे लक्ष द्या
सामान्यपणे मेकअप संदर्भात कोणतीही वस्तू आणली तर पुढच्या तीन चार वर्षं ती वापरायची हे डोक्यात असतं. पण संवेदनशील त्वचेसाठी हे करुन चालत नाही. कोणतंही उत्पादन मेकअपसाठी वापरताना आधी त्याची अंतिम मुदत बघावी. अनेक उत्पादनांवर ६ एम,१२ एम असं लघुरुपात लिहिलेलं असतं. त्याचा अर्थ सहा महिने, १२ महिने असतो हे समजून घ्या. काही उत्पादनांची अंतिम मुदत ही निर्मितीपासून अमूक काळापर्यंत अशी असते तर काहींची एकदा उघडल्यानंतर अमूक काळापर्यंत अशी असते. मुदतबाह्य उत्पादनं वापरल्यास त्यानं रॅशेस येणं, खाज येणं, फोड येणं असल्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे भलेही काही उत्पादनांचा वापर अगदी अल्पवेळा झालेला असणार. पण मन घट्ट करुन जर ती उप्तादनं मुदतबाह्य झालेली असतील तर ती टाकून द्यावीत.
सौम्य स्वरुपाचे लाइटवेट प्रोडक्टस वापरावेत.
रंगद्रव्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश असलेली उत्पादनं संवेदनशील त्वचेसाठी हानिकारक असतात.अशा उत्पादनांच्या वापरामुळे त्वचा कोरडी पडते. त्यामुळे मेकअप करताना फाऊंडेशन ऐवजी बीबी क्रीम वापरावं. संवेदनशील त्वचा असेल तर सौम्य स्वरुपाची उत्पादनं जितकी महत्त्वाची असतात तितकीच कमीत कमी उत्पादनं वापरणंही गरजेचं असतं. बीबी क्रीममुळे हा उद्देश साध्य होतो. तसेच पावडर लावणार असेल तर ती थोड्या प्रमाणात वापरली गेली पाहिजे. कारण पावडरच्या उपयोगानं त्वचा कोरडी पडते. खाज येते. त्यामुळे मेकअप करताना पावडर वापरली तरी ती कमीत कमी वापरतो आहोत ना याकडे लक्ष द्यावं.
मेकअपची साधनं स्वच्छ ठेवा.
मेकअपसाठी योग्य उत्पादनं निवडली हे योग्य. पण इतकंच पुरेसं नसतं. मेकअप अॅप्लिकेटर्स हे देखील स्वच्छ असणं गरजेची असतात. जर ती अस्वच्छ असतील तर त्वचा खाजण्याची, रॅशेस येण्याची शक्यता असते. मेकअपचे ब्रशेस हे आठवड्यातून किमान एक वेळा स्वच्छ करायला हवेत. मेकअपच्या साधनांनी मेकअप करताना ती साधनं हळुवार चेहेऱ्यावर वापरावीत. नाहीतरी चेहेऱ्यास आग होवू शकते.
मेकअप काढूनच झोपा
कितीही वेळ झाला तरी मेकअप काढल्याशिवाय झोपू नका. कारण मेकअप खूप वेळ किंवा रात्रभर ठेवल्यास मेकअप आडून चेहेऱ्यावर जीवाणुंची वाढ होते. त्यामुळे त्वचेला फोड, मुरुम-पुटकुळ्या येतात. तसेच त्वचेलाही मोकळा श्वास घ्यायचा असतो. त्वचेच्या पुर्ननिर्मितीसाठी हे गरजेचं असतं. त्यामुळे न विसरता चेहेऱ्यावरचा मेकअप स्वच्छ करावा. मेकअप स्वच्छ करण्यासाठी खोबरेल तेलाचा उपयोग करावा. यामुळे मेकअप काढलाही जातो आणि त्वचेला मॉश्चरायझरही मिळतं.