आपणही अभिनेत्रींप्रमाणे सुंदर दिसावं, त्यांच्यासारखे कितीही वय झाले तरी तरुण दिसावे असे प्रत्येक स्त्रीला वाटते. मग त्यासाठी या अभिनेत्री नेमके कोणते उपाय करतात हे समजून घेणे गरजेचे आहे. उत्तम आहार, नियमित व्यायाम याबरोबरच मन प्रसन्न ठेवण्यासाठीही या अभिनेत्री काही ना काही करत असतात. पण इतकेच नाही तर काही घरगुती उपाय करुन या अभिनेत्री आपले सौंदर्य टिकवण्याचा प्रयत्न करत असतात. कधी चेहऱ्याला एखादा फेसपॅक लावत तर कधी फेस मसाज करत हे सौंदर्य कायम राहण्यासाठी त्या प्रयत्न करत असतात. वय कितीही वाढले तरी त्यांची नितळ आणि मुलायम त्वचा यामुळे हे वाढलेले वय झाकले जाते. वाढत्या वयाच्या खुणा झाकण्यासाठी छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी काय करते हे पाहाणे महत्त्वाचे आहे. दोन वेळा गर्भवती राहिल्यानंतरही श्वेता तिवारीने आपली तब्येत मेंटेन केली आहे. तिचे फिटनेस आणि स्टाइल तसेच चेहऱ्यावरील निळतपणा चाहत्यांना अजूनही घायाळ करणारा आहे. वयाच्या चाळीशीत श्वेता तीस वर्षाच्या मुलीला लाजवेल इतकी तरुण दिसते. त्यामागील कारण समजून घेण्याचा प्रयत्न करुया...
- तरुण दिसण्यासाठी श्वेता तिवारी फिटनेस आणि डाएटच्या बाबतीत बरीच मेहनत घेते.
- इतकेच नाही तर आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य कायम ठेवण्यासाठी ती घरगुती उपाय वापरत असल्याचे तिने याआधीही अनेकदा सांगितले आहे. त्यामुळे तिची त्वचा नितळ तर आहेच पण त्यावर एकही डाग दिसत नाही.
- श्वेता सौंदर्यप्रसाधने वापरताना त्यांची अतिशय काळजीपूर्वक निवड करते. यामध्ये नैसर्गिक घटक असतील अशाच उत्पादनांचा ती वापर करत असते.
- चेहरा उजळ दिसावा यासाठी श्वेता तिवारी हळदीचे गुणधर्म असलेले एक उटणे वापरते. हे उटणे दूधात भिजवून चेहऱ्याला लावल्याने तिचा चेहरा खुलण्यास मदत होते.
- या उटण्यामध्ये संत्र्याची साले, गुलाबाच्या पाकळ्या, हळद, कडुलिंब, मेथी, बडीशेप, केशर, लिंबाची साल, नारळ, पिस्ता, बदाम तेल आणि शेंगदाणे यांचा समावेश असतो.
- या सगळ्या गोष्टी आपल्याला बाजारात सहज उपलब्ध होणाऱ्या असल्याने आपण घरच्या घरीही हे उटणे तयार करुन चेहरा उजळण्यासाठी त्याचा वापर करु शकतो.
- निस्तेज झालेली त्वचा आणि वांगाचे डाग यांसाठी श्वेता ऑरगॅनिक गोष्टींपासून तयार केलेल्या क्लिंजरचा उपयोग करते. जे क्लिंजर मास्कच्या रुपातही चेहऱ्यावर लावता येऊ शकते.
- चंदन, मंजिष्ठा, मेथी, गुलाबाची पाने, हळद, तुळशीची पाने, कडुनिंबाची पाने, खसखस यांसारख्या गोष्टींची पावडर करुन ती गुलाब पाण्यात एकत्र करुन चेहऱ्याला लावल्यास तुमची त्वचा दिर्घकाळ नितळ राहण्यास मदत होते.
- त्वचा खुलून दिसावी आणि वयाचा परीणाम चेहऱ्यावर दिसू नये यासाठी श्वेता चेहऱ्याला कुमकुमादी तेल लावते. भारतात अनेक वर्षांपासून या तेलाचा उपयोग केला जात असून सौंदर्या खुलवण्यासाठी हे तेल उत्तम पर्याय आहे.