दिवाळी आली की आपण कपडे, दागिने यांची जशी तयारी करतो. याबरोबरच केस हा आपल्या सौंदर्यातील सर्वात महत्त्वाचा घटक असतो. केस चांगले सेट झाले तरच आपला लूक आपल्याला हवा तसा होऊ शकतो. पण अनेकदा हे केस रुक्ष असतात, कधी त्यात खूप कोंडा झालेला असतो तर कधी खूप गळत असल्याने डोक्यावर फटी दिसत असतात. अशावेळी मुलायम, चमकदार आणि दाट केसांसाठी नेमके काय करायचे आपल्याला कळत नाही. मग पार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रीटमेंटस घेतल्या जातात. पण तुम्हाला पार्लरमध्ये जायला पुरेसा वेळ नसेल तर घरच्या घरी काही उपाय केल्यास तुमच्या केसांचा पोत नक्कीच सुधरु शकतो.
कॉफी ही आपण काम करुन थकलो की किंवा कधी मूड चांगला होण्यासाठी घेतो. हीच कॉ़फी केसांचे रुपडे पालटावे यासाठी उत्तम पद्धतीने काम करते असे कोणी म्हटले तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे, मूड बुस्टर असणारी आणि तरतरी आणणारी ही क़ॉफी केसांसाठी अतिशय चांगली असते. कॉफीमधील कॅफेन हा घटक केस मजबूत आणि लांब होण्यास मदत करतो. कॅफेनमुळे ब्लड सर्क्युलेशन वाढते आणि केसांचे फॉलिसेल्स मजबूत होतात. कॉफीमधील अँटीऑक्सिडंटस आरोग्याला उपयुक्त असतात त्याचप्रमाणे ते त्वचेच्या आरोग्यासाठीही उपयोगी असतात. त्यामुळे कॉफी ही अनेक सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरली जाते. पाहूयात केसांच्या मूळांना कॉफी लावण्याचे फायदे
१. कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंटस कॉफी पावडर केसांच्या मूळांना लावल्यास केसांचे पोषण होण्यास मदत होते. कॉफीमुळे केसांच्या अडचणी दूर होण्यास मदत होते.
२. केस आणि केसांचे मूळ हे नैसर्गिकरित्या अॅसिडीक असते. त्याचे मोजमाप pH मध्ये केले जाते. केसांचा pH ३.६७ असतो तर मूळांचा pH ५.५ असतो. ही pH व्हॅल्यू कमी असेल तर अॅसिडचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे जास्त pH व्हॅल्यू असलेली सौंदर्यप्रसाधने वापरल्यास केस रुक्ष होऊन खराब होतात.
३. कॉफी नैसर्गिकरित्या अॅसिडीक असते, त्यामध्ये pH चे प्रमाण ५.११ इतके असते. त्यामुळे कॉफी केसांच्या मूळांना लावल्यास pH लेव्हलचे संतुलन होते.
४. तुम्ही घरच्या घरी कॉफीची पावडर केसांच्या मूळांना लावू शकता, त्यामुळे तुमच्या केसांच्या बहुतांश समस्या दूर होण्यास मदत होते.
५. कॉफी पावडरने केसांच्या मूळांशी स्क्रबिंग केल्यास याठिकाणच्या मृत पेशी निघून जाण्यास मदत होते. तसेच डोक्याचा रक्तप्रवाह सुधारण्यासही यामुळे मदत होते.
६. केसांची मुळे कायम दुर्लक्षित असतात, त्यामुळे केसांच्या समस्या निर्माण होतात. याठिकाणी मृत पेशी तयार झाल्याने या समस्या उद्भवतात.
७. डोक्यावर नवीन केस येण्यासाठी जुने केस काढणे गरजेचे असते. कॉफी स्क्रबिंग केल्यामुळे डोक्यातील कोंडा आणि इतर इन्फेक्शन्स दूर होण्यासही मदत होते. डोक्यावरील त्वचा पुनरुज्जीवित होण्यासही यामुळे मदत होते.
स्क्रब कसे तयार करायचे?
साहित्य -
१. २ चमचे कॉफी पावडर
२. १ चमचा बदाम तेल
३. ९ थेंब चहाच्या झाडाचे तेल
४. चमचा कोकोनट शुगर
५. ८ थेंब पेपरमिंट तेल
कृती -
१. एका बाऊलमध्ये हे सगळे घटक एकत्र करा
२. त्याच्या गुठळ्या होऊ नयेत म्हणून ते हलवत राहा.
३. डोके ओले करा आणि केसाच्या मूळांना हे मिश्रण एकसारखे लावा.
४. हाताने गोल मसाज करत हे मिश्रण सगळीकडे लावले जाईल याची काळजी घ्या
५. १० मिनिटे तसेच ठेवा आणि साध्या पाण्याने डोके धुवून टाका
६. हा प्रयोग सतत न करता महिन्यातून एकदाच करा