उन्हाळ्यात नेहेमीपेक्षा जास्त घाम येतो. घाम येणं ही खरंतर चांगली गोष्ट आहे. त्यामूळे शरीराचं तापमान नियंत्रित राहातं. बाहेर पडणारा घाम शरीर थंड ठेवतं. शरीरातले विषारी घटक या घामातूनच बाहेर पडतात. पण या घामामुळे जेव्हा जीवाणूंची वाढ होते तेव्हा घामाला दुर्गंध येतो. घामाचा दुर्गंध घालवण्यासाठी आणि अति प्रमाणात येणारा घाम नियंत्रित करण्यासाठी घरगूती उपाय आहेत. स्वयंपाकघरातील लिंबू, सोडा, व्हिनेगर, टोमॅटो आणि ग्रीन टी याचा उपयोग घामावर उपाय करण्यासाठी होतो.
लिंबाचा रस
लिंबामधे त्वचेचा पी एच स्तर कमी करण्याची आणि किटाणूंना मारण्याची ताकद असते. यासाठी लिंबू चिरावं. आणि ते काखेत किंवा जिथे जास्त घाम येतो तिथे हलक्या हातानं घासावा. यामुळे घामाचा वास येत नाही.
- एका ताटलीत थोडं मीठ घ्यावं. अर्धा लिंबू घ्यावा. लिंबू मीठात बुडवून तो काखेत घासावा. दहा मिनिटानंतर पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यावा.
- दोन चमचे लिंबाच्या रसात एक चमचा कॉर्नस्टार्च मिसळावा. हा लेप काखेत लावावा. दहा मीनिटांनी धूवून टाकावा.
बेकिंग सोडा
बेकिंग सोड्यात घाम शोषून घेण्याची ताकद असते. त्याच्या या गुणधर्मामुळे घामाच्या दूर्गंधीपासून मुक्तता मिळवता येते.
- बेकिंग सोड्याचा टाल्कम पावडर सारखा उपयोग करावा. सोडा काखेत लावावा. थोड्या वेळ तो तसाच राहू द्यावा. नंतर कोरड्या रुमालानं झटकून टाकावा.
- बूट, सॉक्स, सॅण्डल्स घातल्यानंतर पायाला घाम सुटतो आणि वास येतो. त्यासाठी बुटात किंवा सॅण्डल्समधे रात्री थोडा सोडा घालून ठेवावा. त्यामुळे बूट किंवा सॅण्डल्समधील ओलसरपणा आणि वास निघून ंजातो. सकाळी हे बूट आणि सॅण्डल्स झटकून मग घालावेत.
- एक कप पाण्यात दोन चमचे बेकिंग सोडा घालावा आणि हे पाणी एका स्प्रे बॉटलमधे भरुन ठेवावं. मधून मधून घाम येतो तिथे, काखेत ते पाणी स्प्रे करावं.
- एक चमचा बेकिंग सोडा आणि एक चमचा लिंबाचा रस घ्यावा. हा लेप काखेत, पायांना लावावा. पाच मिनिटांनी तो पाण्यानं धुवून टाकावा.
ग्रीन टी
चहामधील टॅनिन या घटकामध्ये त्वचा कोरडी ठेवण्याचा, घाम रोखण्याचा गूणधर्म आहे.
- पुरेसं पाणी घेऊन ते उकळावं. त्यात ग्रीन टी घालावा. नंतर पाणी थंड झाल्यावर ते गाळून घ्यावं. आणि जिथे जिथे जास्त घाम येतो तिथे हे पाणी कापसाच्या बोळ्याचा उपयोग करत लावावं.
- एक लिटर पाणी घेऊन ते उकळावं. पाणी उकळल्यानंतर त्यात दोन टी बॅग्ज घालाव्यात. दहा मिनिटं त्या तशाच राहू द्याव्यात. नंतर हे पाणी आपल्या आंघोळीच्या पाण्यात मिसळून त्याने आंघोळ करावी.
व्हिनेगर
व्हिनेगर हे घामाची दुर्गंधी घालवण्यासोबतच घामातून निर्माण होणाऱ्या किटाणूंची निर्मिती रोखतो.
- कापसाच्या बोळा व्हिनेगर मधे बुडवून तो घाम येण्याच्या ठिकाणी लावावा. दहा पंधरा मिनिटांनी पाण्यानं त्या जागा स्वच्छ धुवून घ्याव्यात.
- एक कप पाण्यात दोन चमचे व्हिनेगर, पेपरमिण्टचे काही थेंब आणि रोजमेरी इसेंन्शिअल ऑइलचे काही थेंब घालावेत. ते एका बाटलीत भरुन त्याचा डिओडरण्ट सारखा वापर करावा.
टोमॅटो
टोमॅटोमधे किटाणूंचा नायनाट करणारे नैसर्गिक अॅण्टीसेप्टिक गूणधर्म आहे. त्याचा उपयोग घामाची दुर्गंधी घालवण्यासाठी करता येतो.
- टोमॅटोचा गर काढावा आणि तो काखेत लावावा. दहा पंधरा मिनिटांनी तो पाण्यानं धुवून टाकावा.
- दोन कप टोमॅटोचा रस काढून तो आंघोळीच्या पाण्यात मिसळावा. आणि त्या पाण्यानं आंघोळ करावी.