प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रेनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत घरातील गणपती बाप्पासह सोनाली पारंपारिक भारतीय लूकमध्ये दिसत आहे. गणेश चतुर्थीसाठी सोनालीनं साडी नेसलेली तुम्ही या फोटोत पाहू शकता. गणपतीच्या बाजूला उभं राहून सोनालीनं हा फोटो काढला आहे. या डिसेंट, सिंपल लूकमुळे सोनाली पुन्ही एकदा चर्चेत आली आहे. घरी पूजेसाठी, सोनालीनं अनविला नावाच्या ब्रॅण्डची गुलाबी साडी नेसली होती.
46 वर्षीय अभिनेत्रीने चंदेरी काठ असलेली फिकट गुलाबी रंगाची जामदानी साडी निवडली. तिने लिनेन क्रॉप-टॉप ब्लाउज आणि सिंपल दागिन्यांसह साडी नेसली. यावेळी तिनं सोन्याच्या बांगड्या आणि स्मार्ट वॉच हातात परिधान केले होते. 'सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा', असं कॅप्शन या फोटोला देत तिनं सगळ्यांना गणपती उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. सोनाली बेंद्रेने परिधान केलेल्या ऑल ओव्हर चेन जामदानी साडीची किंमत अनविलाच्या वेबसाइटवर 57,000 रुपये आहे.
सोनालीने अमेरिकेत कॅन्सरवर उपचार घेतले आणि आता ती पूर्णपणे कॅन्सरमुक्त झाली आहे. हाच पॉझिटीव्ह ॲटीट्यूट सोनालीने काही दिवसांपूर्वी एक इन्स्टाग्राम पोस्ट चाहत्यांसोबत शेअर केली होती. यामध्ये तिने ती कॅन्सरचे उपचार घेत असतानाचा आणि सध्याचा असे दोन फोटो शेअर केले यामध्ये सोनाली म्हणाली की, 'वेळ अगदी अलगद उडून जातो. आज आजारातून बाहेर पडताना जेव्हा मी मागे वळून पाहते, तेव्हा मला ताकदही दिसते आणि दुर्बलताही दिसते. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला दिसते ती माझी इच्छाशक्ती.
उपचारातून बरे झाल्यानंतर कॅन्सरला माझे जगणे कसे असावे, हे ठरवू न देण्याची माझी इच्छाशक्ती. तुम्ही जे आयुष्य निवडता, तसेच तुम्ही ते तयार करता. म्हणून नेहमी लक्षात ठेवा की कॅन्सरनंतरचे उर्वरित आयुष्य कसे जगायचे आहे किंवा तुम्हाला ते कसे हवे आहे, हे तुम्हीच ठरवा, कॅन्सरला ते ठरविण्याचा अधिकार देऊ नका.'
आपल्याला कॅन्सर झाला आहे, हे ऐकूनच अनेक महिला हतबल होऊन जातात. कॅन्सर आता आपले आयुष्य संपविणार, जगण्यातली मजा, आनंद हरवून जाणार असा अनेकींचा समज असतो. केस आणि सौंदर्य म्हणजे महिलांचा विकपॉईंट. कॅन्सर नेमका याच गोष्टींवर आघात करताे. त्यामुळे कॅन्सरचे उपचार सुरू करताच आपले केस जाणार, आपण विद्रुप होणार हा विचारही अनेकींमध्ये नकारात्मकता निर्माण करतो. म्हणूनच अशा सगळ्याच महिलांसाठी सोनालीने शेअर केलेली प्रत्येक पोस्ट आणि तिचा प्रत्येक फोटो पॉझिटीव्हीटी देणारा ठरतो आहे.