अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. सोनालीने मराठी चाहत्यांमध्ये नाही तर देशभरातील प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. अलिकडेच सोनालीनं मुलाखतीदरम्यान मोठा खुलासा केला आहे. सोनालीनं सांगितले की, सावळ्या रंगामुळे तिलाही वर्णभेदाचा सामना करावा लागला होता. पहिल्यांदाच सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) रंगभेदाबाबत बोलली आहे.
ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत तिनं सांगितले की, ''मलाही वर्णभेदाचा सामना करावा लागला होता. खरंतर मला बॉलिवूडमध्ये रंग भेदाचा सामना करावा लागला नाही. पण पुण्यात मला या गोष्टीचा सामना करावा लागला. बॉलिवूडमध्ये तर माझं कौतुक झालं, मी जेव्हा पुण्यात पहिल्यांदा ऑडिशनसाठी गेले होते. तेव्हा मी गिरीश कर्नाड यांना भेटले. तेव्हा तिथे आणखी एक मुलगी तिच्या आईसोबत आली होती. त्या मुलीच्या आईने मला तू इथे का आली आहेस? असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी मला त्यांचा उद्देश समजला नाही.''
पुढे तिनं सांगितले की, ''ती महिला मला म्हणाली "तू आरशात तुझा चेहरा पाहिला आहेस का? काळ्या मुली कॅमेरात चांगल्या दिसत नाहीत.'' या महिलेच्या बोलण्याने मला त्यावेळी खूप शरम वाटली. त्यानंतर मी गिरीश कर्नाड यांना भेटली. आमच्यात चांगल्या गप्पा झाल्या. गिरिश काकांनी माझं नावं आणि माहिती विचारली. त्यांनी माझं चांगलं कौतुक केलं. त्यानंतर त्या महिलेने केलेल्या अपमानकारक वक्तव्याचं मला फारसं वाईट वाटलं नाही." हा अनुभव शेअर केल्यानं आता पुन्हा एकदा सोनाली चर्चेत आली आहे.
सध्या सोनाली टिव्ही शो क्राईम पेट्रोलमध्ये दिसून येत आहे. सोनालीनं फक्त मराठी आणि हिंदी सिनेमातच काम केलं नाही तर गुजराती, कन्नड, तामिळ, इटालियन आणि इंग्रजी सिनेमांत काम केलं आहे. मराठीत कैरी, घराबाहेर, देवराई, दोघी, मुक्ता, सखी, अगं बाई अरेच्चा -२ हे तिचे चित्रपट गाजले. तर दिल चाहता है, डरना जरुरी है, दिल विल प्यार व्यार, प्यार तुने क्या किया, सिंघम या हिंदी चित्रपटातही सोनालीनं छाप उमटविली.