टोकियोमध्ये दोन ऑलिम्पिक सुवर्णपदकं पटकावणाऱ्या दक्षिण कोरियाच्या महिला तिरंदाजाला तिच्या लहान केसांवरून ट्रोलिंगचा सामना करावा लागला. केस लहान असल्यामुळे सोशल मीडियावर पुरूषांनी "ती लहान केसांची स्त्रीवादी आहे" असं म्हणत गैरवर्तवणूकीचा आरोप केला आहे. या आरोपांनंतर सोशल मीडियावरील महिला वर्गात संपातपाची लाट उसळली आणि महिलांनी पाठिंब्याच्या कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
पुरुष टिकाकारांनी म्हटले होते की, '' एन सॅनच्या केशरचनेची निवड सुचवते की ती एक स्त्रीवादी आहे'', त्यापैकी काहींनी तिनं माफी मागावी आणि तिचे ऑलिम्पिक विजेतेपद काढून टाकण्याची मागणी केली. दक्षिण कोरिया जगातील 12 व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आणि एक अग्रगण्य तांत्रिक शक्ती असताना दुसरीकडे महिलांच्या हक्कांबाबत फारच दुरावस्था पाहायला मिळते. तसंच पुरुषप्रधान समाजाची अरेरावी तिथं प्रचंड आहे. कोरियन पुरुष ऑलिम्पिक तिरंदाजांनी या महिला ऑलिम्पियनकडून सुवर्णपदकं परत घेण्याची मागणी कोरियन तिरंदाजी संघटनेकडे केली आहे.
या तरूणीनं मिश्र सांघिक तिरंदाजीमध्ये दोन सुवर्णपदके जिंकली आहेत. तिने 80 गुण मिळवून टोकियो गेम्समध्ये महिलांच्या पात्रतेमध्ये अव्वल स्थान मिळवले आणि १९९६ पासूनचा ऑलिम्पिक विक्रम मोडला. अनेक सुप्रसिद्ध दक्षिण कोरियन महिला पुरूषांच्या या कमेंट्सचा निषेध करण्यासाठी समोर आल्या आहेत.
"जरी तुम्ही तुमच्या स्वत: च्या कौशल्यांनी आणि क्षमतेने ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले तरीही, जोपर्यंत आमच्या समाजात लिंगभेद कायम आहे तोपर्यंत तुमचा अपमान होत राहणार आणि आता तुम्हाला तुमच्या पदकापासून वंचित राहण्यास सांगितले जात आहे. कारण तुमचे केस लहान आहेत." असं ट्विट कोरियन कायदेतज्ज्ञ जांग हे याँग यांनी केलं आहे.
"आम्ही एका विचित्र परिस्थितीचा सामना करत आहोत. कोरियन तिरंदाजी आता जगातील सर्वोत्तम आहे, परंतु लिंगभेदामुळे राष्ट्रीय प्रतिष्ठा जमिनीवर आदळली जात आहे." स्थानिक अहवालांनुसार एन या महिला तिरंदाजाचे समर्थन दर्शविण्यासाठी लहान केस असलेल्या महिलांची किमान 6,000 छायाचित्रे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली गेली आहेत.
" स्त्रीवादी कृत्य करण्यासाठी आम्ही तुम्हाला कराची रक्कम देणं शिकवलेलं नाही." असे एका पुरुषाने इन्स्टाग्राम अकाउंटवर लिहिले आहे. अलिकडच्या काही वर्षांत दक्षिण कोरियाच्या तरुण स्त्रियांना अभूतपूर्व प्रचारात यश मिळाले आहे. गर्भपाताचा कायदेशीर आणि व्यापक लढा , #MeToo चळवळ आयोजित करणे आणि सार्वजनिक ठिकाणी गुप्तपणे चित्रीत करण्यात आलेल्या स्पायकेम व्हिडिओंवर कारवाई करणे, ज्यामुळे कोरियन इतिहासात सर्वात मोठ्या स्तरावर महिलांना आपल्या हक्कांबाबत लढण्यासाठी बळ आले आहे.