Lokmat Sakhi >Beauty > केस गळतीने हैराण  झाले आणि मी टक्कल केलं ! -वाचा सौंदर्याची धाडसी गोष्ट

केस गळतीने हैराण  झाले आणि मी टक्कल केलं ! -वाचा सौंदर्याची धाडसी गोष्ट

तुम्हाला आवडतं  तसं  राहा, ज्या परिस्थितीत असता ते घेऊन सामोरे या, तुमचं असणं तुम्ही स्वीकारल ना, तर इतरांनाही ते स्वीकारावंच लागतं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 06:18 PM2021-03-12T18:18:48+5:302021-03-15T14:25:06+5:30

तुम्हाला आवडतं  तसं  राहा, ज्या परिस्थितीत असता ते घेऊन सामोरे या, तुमचं असणं तुम्ही स्वीकारल ना, तर इतरांनाही ते स्वीकारावंच लागतं..

story of a fighter girl girl who goes bald in illness and learn a beautiful lessons of life. | केस गळतीने हैराण  झाले आणि मी टक्कल केलं ! -वाचा सौंदर्याची धाडसी गोष्ट

केस गळतीने हैराण  झाले आणि मी टक्कल केलं ! -वाचा सौंदर्याची धाडसी गोष्ट

Highlightsबघते तर.. प्रतिबिंबात मी नव्हते ! ह्र्दय भरून आलं. डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या..  आता प्रश्न होता पुढे काय? 

प्रिया वाकडे  

 माझे केस सुंदर मुलायम. माझ्या चेहऱ्याला आकार देणारी, ओळख देणारी गोष्ट.  चेहऱ्याप्रमाणे केसांची निगा राखणे,  केसांना काय हवं नको त्यांची काळजी घेणे ही तर प्रत्येक स्रीची दैनंदिनी.  मीही त्यातलीच. पण एक दिवस केस विंचरता विंचरता एकदम धस्स झालं. केसांचा पुंजका हातात आला. मनाला समजावलं, होतं एखादेवळी. पण दुस-याही दिवशी तेच.  आता मात्र मी घाबरले. डोक्यावरील केस गळून तिथे गोल असा खड्डा तयार होत होता.  एक नाही, दोन नाही तर असे आठ नऊ पॅच डोक्यावर तयार झाले.  त्या ठिकाणी केस पूर्णतः गळून तेथील जागा बोथट होत होती.
का होतं असं ?
डॉक्टर म्हणाले, हॉर्मोन्सच्या  बदलामुळं. निदान झालं एलोपेशिया अरायटा. म्हणजे आपल्या भाषेत चाणी पडणे किंवा उंदरी लागणे. सतत सहा महिने ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेदिक, आणि प्रत्येकाचा वेगवेगळा सल्ला त्यांनी सांगितलेले प्रयोग.
उष्टी कढी, कांदा लसूण पेस्ट,तुळशीच्या पानांचारसात मीठ ,जमालगोटा बी, एरंडाच्या पानांचा रस असंच बरंच काही.. सर्व प्रकार मी अमलात आणले पण रिझल्ट काही मिळेना. उलट  पॅच झपाट्याने वाढत होते. एक रुपयाची जागा असणारा गोल चट्टा भला वाढत वाढत जात होता.. 
काय करावं सुचत नव्हतं.. रोज  केसाच्या लटा हातात येत होत्या. हतबल झाले. केसाने उघड्या पडलेल्या चट्ट्यांना झाकावं तरी किती? शेवटी न राहून निर्णय घेतला. टक्कल करायचं..
घरच्यांचा विरोध तो होताच नवऱ्याने बरंच समजवलं, नको काढुस होईल बरं. मी ठरवलं होतं, रोज रोज मरण्याच्या भीतीपेक्षा  एकदाच मरण बरं...
सगळ्या केसांवरून वस्तरा फिरवून घ्यायचा..
6 डिसेंबर हा दिवस, ओळखीचे सलून वाले मेजर भाऊ यांना घरी बोलवलं त्यांना सांगितलं टक्कल करायचं. त्यावर ते..एकदा परत विचार करा.. ताई.. 
माझी लेक 'साफुआ'मम्मी नको ना गं.. मी नाही थांबणार इथं म्हणून खाली निघून गेली...
केसांवरून  वस्तरा  फिरत होता. केस खाली झरझर पडत होते.  रोज केस तुटून,हातात येत होतेच  त्यामुळे मला त्या झरझर केस खाली पडण्याचं दुःख होत नव्हतं...
 पण जेव्हा माझ्या झोळीत ओंजळ भरून केस जमा झाली तेव्हा हादरले मी.. 

 

आणि माझ्या समोर बसून असणारा माझा नवरा,सासू यांच्या डोळ्यातून अश्रू. 

माझ्या  सासूबाई तर मला कवटाळून रडायला लागल्या "माझं साजरं सुजरं लेकरू... काय झालं कुणाची नजर लागली अशी वेळ आली" म्हणून हंबरडा फोडला..
मी सासूबाईना जवळ घेतलं आणि समजावलं काय होतं आई..परत येतीलचं ना... 
त्यांची समज काढली. 
स्वतःला नव्यारुपाला बघण्यासाठी आरशाकडे गेले...
आरश्यात बघताचं.. दोन्ही हाताने स्वतःचा चेहरा  झटक्कन झाकून घेतला.. परत स्वतःला बघण्यासाठी..हात काहीसे बाजूला केले..  परत तेच.. अस दोन तीनदा चाललं शेवटी..
दोन्ही हात मोकळे करून स्वतःला आरशात बघून न्याहाळलं .
बघते तर.. प्रतिबिंबात मी नव्हते ! ह्र्दय भरून आलं. डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या.. 
आता प्रश्न होता पुढे काय? 
माझा आवडता स्कार्फ त्याची दुहेरी घडी मारली आणि बांधली डोक्याला.. 
आणि पुढला प्रवास असा सुरु झाला.. स्वफ:ला कोंडून घेतलं. चीड चीड  फार वाढली होती, संवेदनशील मन झालं होतं,आणि आत्मविश्वास, तो तर स्वताला कोंडून घेतलं तेव्हाच कोलमडून पडला होता... मला यातून बाहेर पडण गरजेचं होतं.. रोज नव्या मोटिव्हेशनल उदाहरणाने स्वतःला सावरत होते.. पण ती उदाहरणे  आरश्या समोर आली की कोलमडून पडायची.. 
इतकं महत्वाचं असतं दिसणं ? का असतं ? मी मलाच प्रश्न विचारू लागले...
आणि  चट्टे कायम वाढत राहिले  तर.. ?
माझी ओळख काय असणारं ? आरसा मला उत्तर देवून चिडवत होता. केस मागे पुढे, झटकून मिरवणे, न सुटणारे केस वारंवार बांधणे, केस चेहऱ्यावर घेत वेगवेगळ्या शक्कला करून स्वतःला आरशासमोर वारंवार बघणं हे सारं काही मिसिंग होत आता. आंघोळ करतांना पाणी झरकन खाली येत होतं. ड्रेसिंग वर ठेवलेला कंगवा खुणावत होता. आरसा नकोसा झाला होता. झोपतांना केसांचा बक्कल काढून केसांवरून हात फिरवण्याची सवय वारंवार आठवण करून देत होती.
आता तुला  टक्कल पडलंय...
पंधरा दिवस उलटून गेले. स्वतःला  कोंडून किती दिवस ठेवणार ?
जन्माला आलेल्या पक्ष्याला आभाळात भरारी मारायची जशी उत्कंठा असते अगदी तशी अवस्था माझी झाली होती. मी कोंडून राहू शकत नाही. मला यातून निघावं लागणार. स्वतःला वारंवार सांगत होते.
मग काय. डोक्याला बांधायचा मोठाले स्कार्फ मार्केट मध्ये शोधून  काढले.वेगवेगळ्या प्रकारची, रंगीबेरंगी  स्कार्फ घेवून आले. आणि तो, कसा बांधतात म्हणून यूट्यूब ला सर्च करणं सुरू केलं.. मुस्लिम राष्ट्राच्या स्त्रिया किती आवडीने  बांधतात जणू  एखादा आभूषण घालावे.
मी त्या पद्धतीने आता डोक्याला कव्हर करायला लागले होते... 
आणि दैनंदिन  जगणं सुरळीत सुरू होतं..
पण सारखं सारखं स्कार्फ मध्ये स्वतःला  कव्हर करणं अवघड होऊन जातं होतं..
एकदा तर हॉस्पिटलमध्ये मैत्रीणीचे वडील  आजारी होते त्यांना भेटायला गेले आणि स्कार्फ जरा सैल झाला. माझं डोकं उघड पडलं मग काय आजूबाजूला चर्चा. अरे..! कॅन्सर पेशंट आहे वाटतं.. एक गृहस्थ तर बेटा तू ओके आहेस ना, काही हवं आहे का तुला?  आणि दोन तीन मोटिव्हेशनल गोष्टीही  त्यांनी सांगितल्या. त्यांच्या  भावुक होण्यावरून माझ्या लक्ष्यात आलं ..की या काकांचा  भयंकर मोठा गैरसमज होतोय..हे लक्षात येताच मी तिथून कल्टी मारली आणि पक्क ठरवलं... 
प्रिया, डोक्यावरचं अजिबात सटकू द्यायचं नाही. झाकण्यातचं तुझं आरोग्य आहे. सतत काळजी घेतली की, आपला स्कार्फ अजिबात घसरू द्यायचा नाही..
आता स्कार्फ तरी कुठवर सांभाळणार होते...
म्हणून  ऑनलाइन शॉपिंग मध्ये काही मिळत का म्हणून शोध सुरू केला. मला हव्या तश्या कॅप दिसायला लागल्या आणि मनमुरादपणे ऑर्डर केल्या.. 
वेगवेगळ्या पध्दतीच्या कॅप घालून थोडं भारी फील होत होतं. 
बाबांनी औषध बनवून पाठवलं. त्याचं प्रेमानं नवरा रोज लावून देत असे. आईच्या शब्दांचा  आधार  तर तुफान होता. माझ्या ताईडीने तिच्या केसाच्या छायेत माझं टक्कल झाकून सेल्फी घेतला तेव्हा काही काळापुरतं  का असेल ताईच्या केसामुळे सेल्फीत मला मी जाणवले..
भाऊ,वहिनी, मित्रमैत्रिणी.. आम्ही केस काढू का सांग..म्हणत मला भक्कम  आधार देत होते..त्यात त्याचं माझ्यावर असणार जीवापाड प्रेम सामोरे येत होतं..
लहानग्या डुबऱ्या  भाच्याकडून शिकले, रोज टक्कलला शाम्पू लावायची गरज नाही नुसतं पाणी जरी मारली तरी जमतं. 
असं सगळं काही जमायला लागलं होतं..
बाह्य अंगाला वरवर  कव्हर करत होते खरे... 
पण आतून ढासाळले होते. मी बाह्य अंगाने स्वतःला सावरत होते खरी पण आतून तापून सुलाखून निघत होते.. 
माझं हे रूप समाजाला मान्य असो वा नसो पण ते, मीच अजूनही स्वीकारल नव्हतं..
बाह्य अंगाचा आपल्या जीवनावर होणारा परिणाम मला नवनवीन शिकवण देत होतं.. 
मी, पुरुषांच्या केसाचं फार बारकाईने निरीक्षण करायचे. आता यानंतर, माझे केस एवढे वाढणार, मी अशीच स्टाईल करणार. काही पुरुषांना तर, ही आपल्याकडे बघतेय म्हणून बिचारे  सुखावत होते. आता माझं जळणं त्यांच्यावर नसून त्यांच्या केसावर होतं हे माझं मला माहित होतं.. 
टक्कल केल्यामुळे औषध डोक्यावर नीट लावता येत होतं.  उडालेले केस परत येत होते. तसतसा माझा आत्मीवश्वास ही वाढत होता. खरे पण, तो आलेल्या प्रसंगावरून भक्कम झाला होता..
आता मला स्कार्फ, कॅप यांची गरज वाटत नाही. बाहयअंगाबद्दल माझी असणारी ओढ मी जाणली होती. माझं खुजेपण माझ्या नजरेत आलं होतं आणि मी त्यावर मात करायला लागले होते..
या 93 दिवसात मला एक उमजलं. तुम्हाला आवडतं  तसं  राहा, ज्या परिस्थितीत असता ते घेऊन सामोरे या, तुमचं असणं तुम्ही स्वीकारल ना, तर इतरांनाही ते स्वीकारावंच लागतं..
मला कुणी जरी विचारलं, आत्ता या सांजसमयी, विरहाच्या क्षणी तुला काय आठवतं?
मी म्हणेन, असंख्य आठवणी. लांबसडक केशसंभार आणि डोळ्यांमधले टपोरे थेंब.

Web Title: story of a fighter girl girl who goes bald in illness and learn a beautiful lessons of life.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.