Join us  

केसांची वाढ खुंटली? कोंड्याच्या समस्येला कंटाळलात, एक उपाय - स्काल्प स्क्रबिंग, केसांना मिळेल नवीन जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2023 8:16 PM

Scalp Scrubbing Hair Care Tips केसांच्या वाढीसाठी स्काल्प स्क्रबिंग हा उत्तम उपाय मानला जातो. फायदे आणि पद्धत करेल मदत..

आपली त्वचा एक्सफोलिएट करणं जितकं आवश्यक आहे, तितकंच स्काल्पला देखील एक्सफोलिएट करणं महत्त्वाचं आहे. आपल्यापैकी बहुतांश लोकं केस स्वच्छ करण्यासाठी शॅम्पूचा वापर करतात, पण टाळूच्या त्वचेच्या देखभालीकडे पूर्णतः दुर्लक्ष करतात.

केसांची चांगली वाढ होण्यासाठी टाळूची त्वचा निरोगी राखणं आवश्यक आहे. टाळूची त्वचा स्वच्छ आणि निरोगी असेल तर, केसांचे आरोग्य देखील चांगले राहते. स्क्रबमुळे आपल्या टाळूची त्वचा डिटॉक्स होते.

प्रदूषणामुळे किंवा केमिकलयुक्त हेअर प्रोडक्टमुळे टाळूवर धूळ, मातीचे कण जमा होते. एक्सफोलिएशन केल्याने टाळूवरील मृत त्वचा, दुर्गंध आणि अतिरिक्त तेल स्वच्छ होते. त्यामुळे टाळूवरील मृत त्वचा दूर होते. परिणामी केसांची योग्य पद्धतीने वाढ होते.

स्काल्प स्क्रबिंगचे फायदे

मृत त्वचेची समस्या होते दूर

या धकाधकीच्या जीवनात स्वतःकडे लक्ष देण्यास कठीण जाते. बाहेरील वाढणाऱ्या प्रदूषणामुळे केसांवर धूळ जमा होते. परिणामी केसांची गळती सुरू होते. जेव्हा आपण टाळू योग्य पद्धतीने स्वच्छ करत नाही, त्यावर धूळ - माती अधिक प्रमाणावर जमण्यास सुरू होते. या कारणामुळे केसांमध्ये कोंडा देखील होतो. अशावेळी आपण महागड्या प्रॉडक्टचा वापर करतो. यामुळे टाळूच्या त्वचेवरील रोमछिद्रांवर दुष्परिणाम होतात. परिणामी केसांची वाढ खुंटते. टाळूचे स्क्रबिंग केल्यास धूळ - माती इत्यादी काढण्यासाठी मदत मिळते.

केसांच्या वाढीसाठी लाभदायक

स्काल्प स्क्रबिंगमुळे केसांना अनेक फायदे होतात. मुख्य म्हणजे याने केसांची वाढ होते. यासह टाळूवरील मृत त्वचा काढण्यास मदत मिळते. केसांचे आरोग्य निरोगी राहते. तसंच टाळूवर जमा झालेली धूळ, मातीचे कण स्वच्छ होऊन नवीन केसांची निर्मिती होते.

कोंड्याची समस्या होते दूर

हिवाळ्यात बऱ्याच लोकांची तक्रार असते, की टाळूवरील त्वचा कोरडी होऊ लागते. यामुळे कोंड्याची देखील समस्या निर्माण होते. टाळूची त्वचा एक्सफोलिएट केल्यास कोरड्या त्वचेची समस्या आणि कोंडा दूर होण्यास मदत मिळते. यामुळे केसांची देखील बऱ्याच प्रमाणावर वाढ होते.

घरगुती स्काल्प स्क्रबिंग

सामग्री:

१/४ कप ऑलिव्ह ऑइल

१/२ कप ब्राउन शुगर

स्‍काल्‍प स्‍क्रब तयार करण्याची योग्य पद्धत

एका बाऊलमध्ये दोन्ही सामग्री एकत्र घ्या चांगले मिक्स करा. हे मिश्रण टाळूवरील लावा. या मिश्रणाने आपल्या टाळूच्या त्वचेचा मसाज करा. थोड्या वेळानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.

टॅग्स :केसांची काळजीहोम रेमेडी