चेहऱ्याचे सौंदर्य टिकवण्यासाठी आपण अनेक गोष्टी करून पाहतो. त्वचेची योग्य काळजी घेणं काहींना कठीण जाते. वयोमानानुसार आपल्या त्वचेमध्ये बदल घडतात. त्वचेवर महागड्या प्रोडक्ट्सपेक्षा घरगुती उपाय अधिक प्रभावी ठरतात. मार्केटमध्येही बरीच सौंदर्य साधनं उपलब्ध आहेत. काही प्रोडक्ट्स चेहऱ्यावर सूट करतात तर काही नाही. दरम्यान, अशा स्थितीत आपण घरगुती उपायांचा वापर करून पाहू शकता.
बेकिंग सोडा आपण पदार्थ बनवण्यासाठी वापरतो. याच बेकिंग सोड्याचा वापर आपण चेहऱ्यासाठी देखील करू शकता. बेकिंग सोडा शरीरासह चेहऱ्यासाठी चांगले आहे. यामुळे त्वचेची पीएच लेव्हल संतुलित राहते. याने त्वचेमध्ये चमक आणि ताजेपणा येतो. चेहऱ्यावरील मुरुमही निघून जात त्वचा टवटवीत होते. मात्र, बेकिंग सोड्याची वापरण्याची योग्य पद्धत माहित असणं गरजेचं.
खोबरेल तेल, लिंबू आणि बेकिंग सोडा
नारळाच्या तेलात लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा मिसळल्याने चेहऱ्यावरील डाग साफ होण्यास मदत होते. यासाठी एका वाटीत एक चमचा खोबरेल तेल घ्या, त्यात चार ते पाच थेंब लिंबाचा रस आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घाला. मिश्रण चांगले मिक्स करा व चेहऱ्यावर लावा. याने चेहऱ्याला ५ मिनिटे मसाज करा. १० मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या आणि त्यानंतर चेहरा सामान्य पाण्याने धुवा.
दूध आणि बेकिंग सोडा
आपण बेकिंग सोडा आणि दुधानेही त्वचेची डीप क्लीनिंग करू शकता. दुधात 2 चमचे बेकिंग सोडा टाकून घट्ट पेस्ट तयार करा, ही पेस्ट काळ्या डागांवर लावा आणि १५ मिनिटे सुकण्यासाठी ठेवा. मिश्रण चेहऱ्यावर सुकल्यानंतर सामान्य पाण्याने धुवा.
संत्र्याचा रस आणि बेकिंग सोडा
संत्र्याचा रस त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. त्यातील व्हिटॅमिन सी चेहऱ्यावरील चमक वाढवण्यास मदतगार आहे. संत्री त्वचेतील कोलेजन प्रोटीनला प्रोत्साहन देते यासह डाग कमी करण्यास मदत करते. एका वाटीत संत्र्याच्या रसात बेकिंग सोडा मिसळून घट्ट पेस्ट तयार करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटे राहू द्या, त्यानंतर धुवा, याने चेहरा तजेलदार दिसेल.
लिंबाचा रस, गुलाबपाणी आणि बेकिंग सोडा
त्वचा तजेलदार आणि चमकदार बनवण्यासाठी लिंबाचा रस आणि गुलाब पाणी फायदेशीर ठरेल. यासाठी एका वाटीत बेकिंग सोडा, लिंबाचा रस आणि गुलाब पाणी मिसळा. हे मिश्रण मिक्स झाल्यानंतर चेहऱ्यावर लावा. मिश्रण १५ मिनिटे चेहऱ्यावर ठेवा. सुकल्यानंतर सामान्य पाण्याने चेहरा धुवा. उत्तम रिझल्टसाठी आठवड्यातून एकदा ही पेस्ट लावा.
बेकिंग सोडा वापरणे त्वचेसाठी फायदेशीर आहे, परंतु चुकीच्या पद्धतीने वापरल्याने नुकसान देखील होऊ शकते. जर तुम्हाला त्वचेच्या निगडीत कोणतीही गंभीर समस्या असेल तर, बेकिंग सोडा लावण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक.