Join us

केस गळतीमुळे त्रस्त आहात? आवळ्यापासून बनवा हेअर मास्क आणि तेल, केस होतील घनदाट आणि लांबसडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2022 19:16 IST

Amla Hair Growth आवळ्यात अनेक गुणधर्म आहेत जे केसांसाठी खूप उपयुक्त आहे, आवळ्याच्या वापर केल्याने केस लांबसडक आणि काळेभोर होतात

आवळा हे अत्यंत उपयुक्त फळ आहे. केसांपासून ते नखापर्यंत आवळा फायदेशीर आहे. कोणत्याही स्वरूपात जर आपण आवळ्याचे सेवन नियमित केले तर, त्याचे गुणधर्म पोषक ठरतात. आवळ्यामध्ये अधिक प्रमाणात विटॅमिन सी आढळून येते. ज्यामुळे याचा अधिक फायदा आपल्या शरीराला होतो.  केस वाढीसाठी आवळा आणि खोबरेल तेलाचे मिश्रण एकत्र लावल्याने त्याचा फायदा अधिक होतो. आवळ्यामध्ये असलेले ॲण्टीऑक्सीडेंट केस गळती कमी करते. आज आपण केस गळती कमी करण्यासाठी, यासह दाट आणि चकाकदार केस मिळवण्यासाठी लागणारे हेअर मास्क आणि तेल कसे बनवायचे हे पाहू.

मेथी आणि आवळ्याचा मास्क

मेथी आणि आवळ्याचा हेअर मास्क बनवण्यासाठी सर्वप्रथम मेथी पावडर, आवळा पावडर आणि कोमट पाणी घ्यावे. हे सर्व साहित्य एका बाऊलमध्ये(बाऊल काचेचा किंवा प्लास्टिकचा असावा) टाकून मिक्स करावे. पाणी प्रमाणात घालावे, आणि तोपर्यंत ढवळत राहावे जोपर्यंत एक घट्ट आणि चिकट मिश्रण बनत नाही. हे मिश्रण रात्रभर भिजत ठेवावे. आणि सकाळी आपल्या केसांच्या स्कॅल्पवर लावावे. हे मिश्रण केसांसहित पूर्ण डोक्यावर लावायचे. आणि २० मिनिटे ठेवावे. नंतर माइल्ड सल्फेट-फ्री शॅम्पूने केस स्वच्छ धुवून घ्यावे. आठवड्यातून एकदा हा मास्क केसांवर लावावे. जेणेकरून तुम्हाला लांब आणि चमकदार केस मिळतील. 

कडीपत्ता आणि आवळा

कडीपत्त्याचे फायदे अनेक आहेत, ते आपल्या स्कॅल्पला निरोगी ठेवण्यास मदत करते. मास्क बनवण्यासाठी सर्वप्रथम कडीपत्ता, आवळा, आणि खोबरेल तेल घ्यावे. एका पॅनमध्ये खोबरेल तेल घालावे त्यात बारीक चिरून घेतलेला आवळा, आणि बारीक चिरून घेतलेली कडी पत्ता टाकावी. हे तेल ब्राऊन होईपर्यंत गरम करावे. गरम झाल्यानंतर बाजूला थंड होण्यासाठी ठेवून द्यावे. त्यातील आवळा आणि कडीपत्ता बाजूला काढून तेलाने १५ मिनिटे मालिश करावे. हे तेल साधारणतः ३० ते ४५ मिनिटे ठेवावे आणि शेवटी माइल्ड सल्फेट-फ्री शॅम्पूने केस स्वच्छ धुवून घ्यावे. आठवड्यातून एकदा या तेलाने मालिश करावी जेणेकरून रिझल्ट लवकर दिसेल.

टॅग्स :केसांची काळजीहोम रेमेडी