काळे आणि दाट केस कोणाला नाही आवडत. दाट केस आपल्या व्यक्तिमत्त्वात सौंदर्य वाढवण्याचे काम करतात. मात्र, चुकीची जीवनशैली आणि योग्यरीत्या केसांची काळजी न घेणे यामुळे अनेक जणांचे केस कमी वयातच गळू लागतात. यासह केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर केल्याने आपले केस निर्जीव आणि कोरडे होतात. आपले केस काळे, दाट, चमकदार दिसण्यासाठी काही घरगुती उपायांचा वापर करून केसांना पोषण देऊ शकता. दुधी भोपळा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. दुधी भोपळ्याचे सेवन केल्याने अनेक आजार आपल्या शरीरापासून लांब राहतात. आज आपण दुधी भोपळ्याच्या रसाचे सेवन केल्याने आपल्या केसांवर याचा काय परिणाम होतो, याची माहिती जाणून घेणार आहोत.
दुधी भोपळ्याच्या रसामध्ये अनेक जीवनसत्त्वे आढळून येतात. ज्यात सोडियम, लोह, पोटॅशियम, फायबर, फॉस्फरस असे अनेक पोषक घटक मुबलक प्रमाणात आहे. याचे सेवन केल्याने आपल्या शरीराला त्वरित ऊर्जा मिळते यासह आपल्या शरीराला डिटॉक्स देखील करते. दुधी भोपळ्याचा रस केवळ शरीराला गुण देत नाही. तर आपले सौंदर्य वाढवण्यातही मदत करते. दुधी भोपळ्याच्या रसामध्ये व्हिटॅमिन बी असल्याने केस पुन्हा काळे होण्यास मदत होते. यासह केसं दात आणि चमकदार देखील होतात.
दुधी भोपळ्याचा रस बनवण्यासाठी लागणारं साहित्य
एक लहान दुधी भोपळा
सहा ते सात पुदिन्याची पाने
लिंबू
पाणी
काळी मिरी
मीठ
कृती
दुधी भोपळ्याचा रस तयार करण्यासाठी सर्वप्रथम, कोवळी दुधी भोपळा सोलून त्याचे तुकडे करून घ्या. त्यानंतर हे तुकडे आणि पुदिन्याची पाने मिक्सरमध्ये बारीक करा. मिक्सर मधून मिश्रण बारीक झाल्यानंतर मिश्रण चाळणीतून गाळून वेगळ्या भांड्यात ठेवा. काढलेल्या मिश्रणात चवीनुसार मीठ, लिंबू आणि काळी मिरी मिसळा. अशाप्रकारे आपला दुधी भोपळ्याचा रस तयार.
केसांवर लावा रस
हा घरगुती गुणकारी रस आपण केसांवरही लावू शकता. हा रस सर्व केसांना लावा आणि 3 ते 4 तास तसेच राहू द्या. त्यानंतर साध्या पाण्याने केस धुवा. असे केल्याने आपले केस हळूहळू काळे आणि निरोगी होतील. घरगुती बनलेला हा दुधीचा रस केसांसाठी खूप उत्तम आहे. हा रस आठवड्यातून दोन ते तीन वेळा वापरावे. जेणेकरून केस लांब आणि दाट होतील.
दुधी भोपळ्याच्या रसाचे इतर फायदे
दुधी भोपळ्याचे रसाचे सेवन केल्याने आपले शरीर हायड्रेटेड राहते. गर्मी सहन करण्याची क्षमता वाढवते. दुधी भोपळ्याचे नियमित सेवन केल्याने शरीर सुदृढ राहते.
पोटाच्यानिगडित अनेक समस्यांशी दोन हात करण्यासाठी दुधी भोपळा खूप उपयुक्त आहे. यासह पचनक्रिया देखील सुरळीत ठेवते.
वेट लॉसमध्ये ट्रेनर दुधी भोपळ्याचा रस प्यावे असे सांगतात. कारण वेट लॉसमध्ये आपली भूक नियंत्रित ठेवण्यासाठी हा रस खूप उपयुक्त आहे. यासह यातील पोषक तत्वे शरीराला खूप फायदेशीर आहे.
चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी दुधी भोपळा खूप किफायतशीर आहे. नियमित रस पिल्याने चेहऱ्यावरील डाग दूर होतात. आणि एक नवी चमक देखील येते.