Join us  

उन्हानं वाढते टॅनिंगची समस्या; पपईचे 5 प्रकारचे लेप लावा ग्लो मिळवा..स्वस्तात मस्त उपाय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2022 5:16 PM

खाण्यासाठी म्हणून घरात आणलेल्या पपईचा क्लीन्जर, स्क्रबर आणि फेस पॅक म्हणून उपयोग केल्यास टॅनिंगची समस्या सहज दूर करता येते. 

ठळक मुद्देपपईचा वापर करुन चेहऱ्यावरील मृत त्वचा काढून टाकता येते. . पपईमधील जीवनसत्वांमुळे त्वचेचं पोषण होतं. टॅनिंगची समस्या दूर होवून चेहरा उजळ होण्यासाठी क्लीन्जर, स्क्रबर , लेप या प्रकारे पपईचा वापर करता येतो.

उन्हानं आलेला काळवंडलेपणा घालवण्यासाठी विकतचे क्रीम्स, लोशन्स लावण्याची गरज नाही. टॅनिंग घालवण्यासाठी पपईचा उपयोग करता येतो. सुंदर त्वचेसाठी म्हणूनच पपई खाण्यासोबत ती कुस्करुन चेहऱ्याला लावणंही महत्वाचं आहे. पपईमध्ये अ, ब  आणि क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतात.  या जीवनसत्वांमुळे त्वचेचं पोषण होतं. पपईमध्ये पॅपिन नावाचं विकर असतं. हे विकर चेहऱ्यावरील मृत त्वचा काढून टाकतं. पपईमुळे तेलकटपणा, घाण यामुळे बंद झालेली रंध्रं मोकळी होतात.  पपईमधील गुणधर्मांमुळे चेहऱ्यावरील मुरुम पुटकुळ्या निघून जातात आणि चेहऱ्यावर ग्लो येतो. पपईमुळे त्वचेस आर्द्रता मिळून कोरड्या त्वचेची समस्या दूर होते. चेहऱ्यासाठी नियमित पपई वापरल्यास त्वचा मऊ आणि उजळ होते.  टॅनिंगची समस्या दूर होवून चेहरा उजळ होण्यासाठी क्लीन्जर, स्क्रबर , लेप या प्रकारे पपईचा वापर करता येतो.

Image: Google

चेहऱ्यासाठी पपई कशी वापरावी?

1. चेहऱ्यावरच काळ्वंडलेपणा घालवण्यासाठी पिकलेल्या पपईचा एक मध्यम आकाराचा तुकडा घ्यावा. त्यात व्हिटॅमिन ई कॅप्सूल फोडून घालावी. थोडं गुलाब पाणी मिसळावं. सर्व जिन्नस नीट एकत्र करुन हे मिश्रण चेहऱ्यावर लावावं. ते सुकल्यावर थंड पाण्यानं चेहरा धुवावा. चेहरा रुमालानं टिपून घेतल्यानंतर चेहऱ्यास माॅश्चरायझर लावावं.

Image: Google

2. पिकलेल्या पपईचा एक तुकडा घ्यावा. तो कुस्करावा. कुस्करलेल्या पपईमध्ये मध आणि दूध घालावं. हे मिश्रण चेहऱ्यास लावावं. हा लेप चेहऱ्यास लावल्यानं चेहऱ्याच काळवंडलेपणा दूर होवून चेहरा उजळ होतो. 

3. पपईमध्ये त्वचा खोलवर स्वच्छ करण्याचे गुणधर्म असतात. पपईमुळे त्वचेवरील रंध्रं स्वच्छ होतात. चेहरा स्वच्छ करण्यासाठी पपईचं क्लीन्जरही तयार करता येतं. यासाठी पिकलेल्या पपईचा तुकडा घेवून तो कुस्करावा. त्यात थोडा कोरफडचा गर घालून तो पपईत चांगला मिसळून घयवा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावावं. पपई आणि कोरफडच्या मिश्रणानं त्वचेची खोलवर स्वच्छता होते. 

4. पिकलेल्या पपईचा तुकडा घ्यावा. त्यात ओट्स आणि ब्राऊन शुगर हे समप्रमाणात घेऊन त्याचं मिश्रण करावं. हे मिश्रण हलका मसाज करत चेहऱ्यास लावावं. या मिश्रणानं त्वचा स्वच्छ होते. पपईमध्ये माॅश्चरायझिंग गुणधर्म असल्यानं त्वचेचा कोरडेपणा कमी होतो. पपईचं हे स्क्रब लावण्यापूर्वी चेहरा आधी स्वच्छ धुवावा. जिथे जिथे टॅनिंग असेल तिथे पपई स्क्रब लावल्यास काळवंडलेपणा दूर होतो.

Image: Google

5. टॅनिंग घालवण्यासाठी पपईच्या पिकलेल्या तुकड्यात  थोडी काॅफी पावडर आणि  व्हिटॅमिन ई कॅप्सूल घालावी. या तिन्ही गोष्टी चांगल्या एकत्र करुन हे मिश्रण हलका मसाज करत चेहऱ्यास लावावं. मिश्रण चेहऱ्याला लावल्यानंतर 20 मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवावा. या उपायानं चेहऱ्याचा काळवंडलेपणा कमी होतो आणि त्वचा माॅश्चराइज होते. 

टॅग्स :ब्यूटी टिप्ससमर स्पेशलत्वचेची काळजी